Home > भारतकुमार राऊत > सन्मान एका `खेळिया'चा!

सन्मान एका `खेळिया'चा!

सन्मान एका `खेळियाचा!
X

गेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचे नाव पद्मविभूषण विजेत्यांच्या यादीत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या घटनेला आता पंधरवडा उलटला, तरी अनेकजण त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पवारांनी आतापर्यंत सर्वांना अनेक धक्के दिले. पण या धक्कातंत्रात त्यांच्याबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सामील असल्याचे दिसते. खरे तर मोदी हे सध्याच्या राजकीय वर्तुळातील सर्वात चाणाक्ष व चतुर खेळाडू. स्वपक्षीयांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणातील भल्याभल्यांना त्यांनी आतापर्यंत असे काही गुंगवले की, कोळ्याच्या तलम जाळ्यात किडे अवचित सापडावेत, तशी ही मंडळी मोदींच्या जाळ्यात सापडत गेली. पवारांना पद्मविभूषणाने सन्मानित करणे, ही मोदींची नेहमीची लांब पल्ल्याची चाल की, पवारांनी टाकलेली आणखी एक भूल हे समजायला आणखी काळ जावा लागेल. इतके मात्र खरे की, पद्म पुरस्काराचे इतक्या मोठ्या संख्येने मानकरी असले, तरी पवारांना मिळालेले पद्मविभूषण हेच चर्चेच्या मध्यभागी राहीले आहे. शरद पवार या नावाचा महिमाच तसा आहे.

पवारांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास मी स्वत: 1970च्या अखेरीपासून नीट पाहात आहे. 1967च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले व त्यांचा वैधानिक प्रवास चालू झाला. तो गेली 50 वर्षे अव्याहतपणे चालूच आहे. इतका काळ वैधानिक क्षेत्रात राहिलेले आणखी आमदार, खासदार असतीलही. पण पवारांचे स्थान त्यापेक्षा खूप वेगळे व महत्त्वाचेही आहे. युवक काँग्रेस चळवळीत कै. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आज 'किंगमेकर' म्हणून चालू आहे. ते व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही राजकारणाच्या पटलावर एकाच वर्षी म्हणजे 1967 मध्ये आले. ठाकरेंनी वैधानिक जीवनात केव्हाही भाग घेतला नाही. ते कायम संघटना व संघर्ष या क्षेत्रातच राहिले. त्यात त्यांनी यश व नावही मिळवले. दुर्दैवाने प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही व शेवटचा काही काळ ते प्रभावी राजकीय जीवनापासून दूर राहिले. मात्र पवारांनी आपले असितत्त्व कायम जागते ठेवले व आता वार्धक्याच्या उंबरठ्यावर येऊनसुद्धा व कर्करोगासारख्या व्याधीशी झुंज देऊनही पवारांचा उत्साह ओसंडून वाहतोच आहे. त्यामुळेच शरद पवार हे एक वेगळेच 'रसायन' आहे, यावर अनेकांचा विश्वास आहे.

देशाचे केंद्रीय पातळीवरील राजकारण करत असतानाच पवारांची नजर इतर अनेक क्षेत्रांवर असतेच. ते महाराष्ट्रात आधी मंत्री व नंतर मुख्यमंत्री होते, तेव्हा ते महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष होते. ते कुस्तिगीर परिषदेचे राजकारणही चालवत होते. शिवाय मराठी नाट्य परिषदेत त्यांना स्वारस्य असायचे. मराठी पत्रकार संघटनांच्या कारभारावर ते लक्ष ठेवायचे आणि व्यापारी संघटनेचा कारभारही लीलया हाकायचे. शिवाय साहित्य-संस्कृती मंडळ, विश्वकोष मंडळ या सरकारी संस्थाच्या अध्यक्षपदी कोण असावे, याबाबत ते जगरुक असायचे. पुढे ते दिल्लीत गेले आणि आता 'महाराष्ट्र'च्या जागी 'राष्ट्र' आले. ते क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात जातीने लक्ष घालू लागले, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या सर्वोच्चपदीही ते बसले. त्याच वेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी 'आपलाच' माणूस बसेल, याची काळजी ते घ्यायला लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेतून निवृत्त झाल्यावर पुन्हा मुंबई क्रिकेटच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत उतरायला त्यांता संकोच वाटला नाही.

असे हे बहुआयामी व्यिक्तमत्त्व. राजकारणात तर ते 'खेळिया'सारखेच वावरले. सर्कसमध्ये दोन हातांनी एकाच वेळी चार-सहा चेंडू उंच भिरकावत ते सहजपणे झेलण्याची कसरत करणाऱ्या खेळियासारखे ते एकाच वेळी दहा दिशांना दहा खेळ खेळत व जिंकत राहिले. 1978 मध्ये वसंतदादा पाटीलांच्या सरकारातून त्यांनी एका रात्री अचानक राजीनामा दिला व काय होतेय ते कुणाला समजायच्या आत तेव्हाच्या जनता पक्षाच्या साथीने त्यांनी पुलोद स्थापन करून स्वत:चे सरकारही बनवले. त्यांचे 'राजकीय गुरू' असलेल्या यशवंतराव चव्हाणांची त्यामुळे मोठीच गोची झाली. पण पवारांनी आपली खेळी पूर्ण केलीच. अखेर गुरूच शिष्याला शरण गेला, हे चित्र देशाने पाहिले.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींची सत्ता येताच पवारांनी त्यांच्याशी जवळीक साधली व औरंगाबादला वाजत-गाजत त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही केला. ते पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले खरे, पण राजीव गांधींच्या निधनानंतर ते सोनिया गांधीबरोबर जुळवून घेऊ शकले नाहीत. ते पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस'च्या नावाखाली आपली वेगळी चूल मांडली. ती आजही चालू आहे. या काळात काँग्रेस व त्यांचे संबंध 'तुझे-माझे जमेना व तुझ्यावाचून करमेना' असेच राहिले. 1999मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या विरोधात लढवली. पण काँग्रेसबरोबर तह करण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यानंतर 2009पर्यंत ते काँग्रेसच्या बरोबरीने केवळ निवडणुका लढवत बसले नाहीत, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते सलग दहा वर्षे कृषीमंत्री राहीले.

शेती व शेतकरी हा आपल्या राजकारणाचा कणा आहे, असे ते बोलत राहिले. पण ते कृषिमंत्री असतानाच त्यांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या. शेतकऱ्याचे पेकाटच मोडले. तरी पवारांचे राज्य सुखात चालू होते. दरवर्षी ते शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या देशांना भेट देतात, तिथले अद्यायाव तंत्रज्ञान शिकतात. त्याचा उपयोग देशात किती झाला हा आणखी एका संशोधनाचा विषय आहे. इतके मात्र खरे की, या सर्व क्षेत्रांत गेली किमान चाळीस वर्षे पवारच केंद्रस्थानी राहिले.

प्रश्न हा निर्माण होतो की, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही (अर्थात त्यातील एकही सिद्ध झालेला नाही) पवारांची निवड पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या किताबासाठी का झाली? यातील पवारांच्या वैयिक्तक गुणवत्तेचा भाग बाजूला ठेवला, तरी महाराष्ट्र व देशातील राजकीय स्थिती व त्यामुळे निर्माण झालेली पवारांची गरज हे मुद्दे आहेतच. महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना कोणत्याही क्षणी भाजपची साथ सोडेल, अशी स्थिती आहे. किंवा भाजपला सेनेला सरकारपासून दूर करावे लागेल. तसे होईल, तेव्हा साहजिकच शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल व देवेंद्र फडणवीस सरकार अल्पमतात येईल. तसे होईल, तेव्हा सरकार वाचवण्यासाठी भाजपला भक्कम पाठिंब्याची गरज लागेल. तो पाठिंबा आता राष्ट्रवादीकडून आपसूक मिळेल. राष्ट्रवादीने मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तरी त्यांच्याकडे 44 मते असल्याने सरकार 'स्थिर' बनेल, असा भाजपचा हिशेब आहे. शिवाय दिल्लीत राज्यसभेत भाजप आजही अल्पमतात आहे व पुढील दोन वर्षे तरी बहुमताची आशा नाही. अशा वेळी जर राष्ट्रवादीचे आठ सदस्य सरकारच्या बाजूने उभे ठाकले, तर मोदी सरकारला तो मोठा आधार ठरेल. असा पाठिंबा मिळावायचा, तर त्यासाठी पवारांना खूष राखायला हवे. त्यासाठीच त्यांना पद्मविभूषण मिळाले का? ही शंका काहींच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

पण पवारांच्या आतापर्यंतच्या चाली पाहता, पवार आपली दिशा व वेग केव्हा बदलतील, याचा नेम नाही. ते कबड्डी संघटनेत कार्यरत होते. कबड्डीत चाणक्ष खेळाडू एका बाजूने चाल करता करता अचानक दिशा बदलतो व प्रतिपक्षाचे दोन-तीन मोहरे एकाच फटक्यात गारद करतो. पवारांनी ही कलाही आत्मसात केलेली आहे. त्यामुळेच या खेळियाचा बहुमान केल्याने आपल्याला दीर्घकालीन राजकीय फायदा होईल, अशी गणिते मांडणे फसवे आहे. पवार पुढची चाल कोणती व केव्हा खेळतात, हे समजण्यासाठी पवारच व्हायला हवे. तशी गुणवत्ता सध्या तरी कुणात दिसत नाही.

ता. क. : पुढील वर्षी 2017च्या ऑगस्टमध्ये देशाच्या भावी राष्ट्रपतीची निवड व्हायची आहे. देशाच्या राज्या-राज्यांतील राजकीय परिस्थिती पाहता, मोदींनी पवारांचेच नाव या सर्वोच्च घ्घ्टनात्मक पदासाठी पुढे आणले, तरी आश्चर्य वाटायला नको. 'पद्मविभूषण' किताब ही त्याचीच तर पूर्वतयारी नसेल?

-भारतकुमार राऊत

Twitter: @BharatkumarRaut

Updated : 10 Feb 2017 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top