Home > नॉन स्टॉप लता > लता मंगेशकर आणि कामिनी कौशल

लता मंगेशकर आणि कामिनी कौशल

लता मंगेशकर आणि कामिनी कौशल
X

लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला यंदा तब्बल 75 वर्ष पूर्ण होत आहेत. कोट्यवधी रसिकांच्या मनावर आजही मोहिनी असलेल्या लतादीदींच्या कारकिर्दीचा आढवा घेणारं विशेष सदर

आज जवळ जवळ विस्मृतीत गेलेली ही अभिनेत्री ... आजच्या पिढीला हिची ओळख सांगायची तर " चेन्नई एक्सप्रेस " मध्ये शाहरुखच्या आज्जीचं काम जिने केलय ती कामिनी कौशल....

पण ४० च्या दशकात ती एवढी लोकप्रिय होती की एकेकाळी फक्त अशोक कुमार सोडून, अगदी दिलीप कुमार आणि देव आनंद असले तरीही त्यांच्या बरोबर केलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या नामावलीत तिचं नाव सर्वात पहिलं येत असे.....

लताने "जिद्दी" मध्ये कामिनी कौशलला आवाज दिला होता. खरंतर लताने सर्वप्रथम ज्या व्यावसायिक नायिकेसाठी गीत गायले ते होतं " जिद्दी " मध्ये कामिनी कौशल साठी.... त्याआधी लताची सगळी गाणी एखाद्या side actress किंवा दुय्यम characters साठी होती. पण " जिद्दी " चित्रपटाच्या गाण्यांवर मात्र गायिकेच नाव " आशा " असं दिलं आहे. कारण "महल" चित्रपटाच्या आधी गाण्यांच्या रेकॉर्ड्स वर गायकांच नाव द्यायची पद्धत नव्हती.....म्हणून " जिद्दी " चित्रपटाच्या गाण्यांवर गायिकेच नाव " आशा " असच आहे .... आशा हे " जिद्दी " मध्ये कामिनी ने जी भूमिका केली आहे त्या character च नाव आहे .... " जिद्दी " देव आनंदचाही पहिलाच व्यावसायिक रित्या यशस्वी ठरलेला चित्रपट.

झांझर, पूनम, नादिया के पार, आस, जिद्दी, आरजू, नमूना, शायर अशा अनेक चित्रपटात लताने कामिनी साठी अनेक अप्रतिम गीतं गायली आहेत.....अत्यंत बोलके डोळे , नाजूक, भावदर्शी चेहरा आणि कमनीय बांधा असलेल्या कामिनीने लताच्या सर्वच गाण्यांना योग्य न्याय दिला आणि सिनेरसिकांच्या मनात या गाण्यांना एक वेगळंच स्थान मिळवून दिलं...खरतर तिची बहुतेक सर्वच गाणी अप्रतिम आहेत. पण मी त्यातल्या त्यात कामिनीची लताने गायलेली ही पाच गाणी निवडली जी मला जास्त आवडतात....

१) एक नाजूक फूल हळुवारपणे उमलतय...... आम्रवृक्षावर कोकीळ कुहू कुहू गातेय.... मग कुणाचं मन थाऱ्यावर राहील?

अशात तिचे डोळे देखील तिला फितूर आहेत... तिची अधीरता हसत हसत सांगतात ....

आणि तिची आतुरता बघून हवा देखील तिची छेड काढते.....

आणि पायातले पैंजणही तिला न जुमानता छुन छुन च्या तालावर वाजू लागतात

मग ती आपल्या बालमाची मनोहर छबी डोळ्यात साठवून त्याची मनधरणी करते....

कारण अशा या नाजूक क्षणी एकटेपणा दूर करण्यासाठी साजण हवाच हवा.....

आणि म्हणूनच ती त्याला बोलावत आहे

" ओ भोले बालमा, ओ मोरे साजना, आ ऽ ऽ आ ऽ ऽ

घुँगर बाजे छुन छुन, डुंगर बाजे डुम डुम

अम्बुवा की डाल पे कोयल का शोर,

सपनों की छाँव में नाचे मनमोर

ऐसे में अखियाँ भी बोलने लगी,

हँस हँस के राज़ दिल के खोलने लगी

आते जाते छेड़ती है चंचल हवा,

बैरी तेरे बिना, सूना है ये समाँ, आ ऽ ऽ आ ऽ ऽ

घुँगर बाजे छुन छुन " ...

या गीतातील कामिनीचे हावभाव खूप निरागस आणि गोड आहेत

यात घुंगर बाजे छुन छुन नंतर डुंगर बाजे डुम डुम म्हणतानाचा लताचा आवाज जेवढा अवखळ आहे तेवढीच कामिनी देखील पडद्यावर अल्लड दिसते

" पूनम " मधलं हे अतिशय गोड गाणं ... यात कामिनीचा बलमा त्या काळचा सुपरस्टार अशोक कुमार होता....

२) इतक्या आर्जवाने तिने बोलावल्यावर तिचा बलमा येणार नाही असं होईल तरी का ?

तिच्या लाडिक आग्रहाला पाहून, तिच्यावर भुलून तिचा बलमा आलाच आणि त्याला पाहून ती देखील मनोमन आनंदली आहे

आकाशात तर चंद्र आहेच पण तिचा चंद्र देखील आत्ता या घटकेला तिच्या समोर आहे.......

चहूकडे त्यांच्या प्रेमाचं चांदणं पसरलं आहे आणि त्या प्रेमाच्या चांदण्यात ती मदहोश होऊन गातेय, नाचतेय....

" मैं नाचू , प्यार नाचे , मेरा सिंगर नाचे

तारो ने साज छेडा, दिल की पुकार नाचे " ....

मदमस्त रात्र , त्याने छेडलेला साज आणि त्यावर तिचं तनमन डोलतंय ...

कामिनीच्या रोमरोमातून जाणवणारा अवखळपणा लताच्या गोड गळ्यातून पुरेपूर उतरला आहे ...

आपला बालम ( अशोक कुमारच ) सोबत असल्याने कामिनीच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता ओसंडत आहे..

" झुमे झुमे दिल मेरा, झुमे झुमे दिल मेरा

चंदा की चांदनी में झुमे झुमे दिल मेरा " ....

" पूनम " चित्रपटातल हे आणखीन एक सुरेल गाणं

३) प्रेमात हरवलेले ते दोघंजण .... एक जण जरी काही करणानिमित्त दूर गेला तर दुसरा किती हवालदिल होत असेल ना ... विचार सुद्धा सहन होत नाही विरहाचा आणि म्हणूनच ती विनविते आहे की नजरे समोरून गेलास पण हृदयातून दूर जाऊ नकोस ....

" जाना ना दिल से दूर आँखों से दूर जाके

नाज़ूक बहुत है देखो, नाज़ूक बहुत है देखो

दिल हो न ग़म से चूर आँखों से दूर जाके " ...

बिचारी स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत घालते आहे ....

आपण लांब जरी असलो ना तरी मनाने एकमेकांच्या जवळच आहोत .....

जग निर्दयी आहे... कधी घाला घालेल काहीच भरवसा नाही....

आणि म्हणूनच रुसवे फुगवे दूर ठेवून विश्वास ठेवायचा आहे एकमेकांवर

की आपण आज जरी एकमेकांपासून लांब असलो तरी परत नक्कीच भेटणार आहोत .....

" उल्फ़त को तुम निभाना मुझसे न रूठ जाना

ज़ालिम है यह ज़माना, दिल तो है बेक़सूर

जाना ना दिलसे दूर आँखों से दूर जाके " ....

लताच्या आवाजातील आणि कामिनीच्या चेहऱ्यावरील आर्जवामुळे आपणही हे गाणं ऐकता ऐकता त्यांची ताटातूट होवू नये म्हणून मनोमन प्रार्थना करतो.... " आरजू " चित्रपटातल हे माझ अतिशय आवडत गीत .... यात कामिनी बरोबर दिलीप कुमार आहे .

४) प्रेमात विरह आला की मग हातात उरत फक्त वाट पाहणं.....

त्याच्या आठवणींमध्ये रमायचं आणि स्वत:चीच समजूत घालत बसायचं.....

" तेरे खयाल को दिल से लगाये बैठे हैं

हम इंतजार की घड़ियाँ सजाये बैठे हैं

मुहब्बत पर बहार आती जहाँ गुलझार हो जाता

अगर बेताब नजरों को तेरा दीदार हो जाता ".....

त्याच्याबरोबर अनुभवलेले ते धुंद क्षण, तो काळ परत परत आठवायचा आणि आयुष्यात परत एकदा जरी नजरे समोर आपला प्रियकर दिसला तरी आयुष्य परत एकदा रंगतदार होईल अशी जर तर ची स्वप्नं पहात एक एक दिवस पुढे ढकलायचा ......

" मेरे दिल की ख़ुशी बनकर अगर तुम सामने आते .. सामने आते

मिला है दिल से दिल ये भी सहारा कम नहीं मुझको .... कम नहीं मुझको

नजर से जब नजर मिलती तो बेडा पार हो जाता

मुहब्बत पर बहार आती जहाँ गुलझार हो जाता " .....

आज जरी एकटेपणा असला तरी कोणे एके काळी दोघांच मिलन झालेलं हे सुखही अशावेळी खूप दिलासा देतं ...पण तेच सुख आता परत हवं असत....खरंच अशावेळी त्याच्या परत भेटीच्या आशेमुळेच वाट्याला आलेला विरह सुसह्य होतो ..... " शायर " मधलं हे गीत तुम्हालाही नक्कीच आवडेल ....

५) पण कितीही ठरवलं तरी अखेर कायमची ताटातूट झालेलीच असते...... किती आणि कुठवर वाट पहायची.....या प्रतीक्षेला अंत आहे का ?

नशिबालाच मग प्रश्न विचारला जातो की जगायचं की मरायचं ते तरी कळू देत...

कधी कधी एका आशेवर माणूस पूर्ण आयुष्य काढतो... कोणाच्या तरी येण्याची अशा....

शेवटच एकदा डोळे भरून त्याला बघण्याची आशा

पण जर तो येणारच नसेल तर मग हा वसंत तरी का आलाय?

हा बहर सुकून का जात नाहिये माझ्या सारखा?

" कहाँ तक हम उठाएं ग़म जियें अब या के मर जाए

अरे ज़ालिम मुक़द्दर ये बता दे हम किधर जाए.....

हम उनका नाम लेकर काट देंगे ज़िंदगी अपनी

न वो आए मगर मिलने का कर वादा तो किधर जाए.....

पपीहे से कहो गाये न वो नग़मे बहारों के

कहो गुलशन उजड़ जाए कहो कलियाँ बिखर जाए".....

कामिनीचा व्याकूळ चेहरा आणि लताचा काळजाचा ठाव घेणारा आवाज.... गाणं ऐकताना कधी डोळे भरून येतात कळतंच नाही.... " आरजू " मधलंच आणखीन एक सदाबहार गीत ....

आज जरी कामिनी विस्मृतीत गेलेली अभिनेत्री असली तरी त्याकाळची तिची लोकप्रियता पाहता सुरुवातीच्या काळात लताला लोकप्रियता मिळवून देण्यात कामिनीवर चित्रित गाण्यांचा फार मोठा हात होता हे नाकारता येण शक्यच नाही.

.

© नयना पिकळे

Updated : 24 Feb 2017 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top