Home > पर्सनॅलिटी > प्रदीप लोखंडे, पुणे – 13

प्रदीप लोखंडे, पुणे – 13

प्रदीप लोखंडे, पुणे – 13
X

प्रदीप लोखंडे, पुणे - 13 हा केवळ पत्ता नाही. तर ही ओळख आहे एका अवलियाची. महात्मा गांधींचे 'खेड्याकडे चला' हे वाक्य ज्यांनी केवळ अंगीकारलंच नाही तर, इतरांनाही खेड्याकडे घेऊन चला असं म्हणत त्याची प्रत्यक्ष कृती देखील केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामिण भारताला खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर आणण्याचा प्रदीप लोखंडे यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी 'रूरल रिलेशन्स' या त्याच्या संस्थेमार्फत 'Gyan- Key' (ग्यान की) आणि 'villagewiKY' (व्हीलेज विकी) हे त्यांचे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत.

प्रदीप लोखंडे यांच्या ज्या कार्यालयातून 'रुरल रिलेशनशन्स' या संस्थेचं काम चालतं त्याला मी भेट दिली. मी या कार्यालयात जाण्याआधी त्यांची वेबसाईट पाहिली होती. वेबसाईटचा लूक ऍन्ड फिल पाहून या संस्थेचं भलं मोठं कार्यालय, भला मोठा स्टाफ, कर्मचाऱ्यांची वर्दळ, बॉसची केबिन असं साधारण चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. पण, प्रत्यक्षात मला ते कार्यालय कमी आणि कुटुंबच जास्त वाटलं. एका वन बीएचके फ्लॅटमध्ये हे कार्यालय आहे. इथं कोणतीही औपचारीकता नाही. बॉसची खास केबिन नाही. सुटाबुटातला स्टाफ नाही. की टिपिकल कार्यालयीन वातावरण नाही. इथं आहेत ती पुस्तकांच्या सानिध्यात राहून देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी धडपडणारी माणसं. याठिकाणी काम करणारी सर्वच मंडळी ही साधारण शिक्षण झालेली आहेत.

उच्च शीक्षितांना कुठेही काम मिळेल, पण आमच्या संस्थेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा समाजाला बांधील आहे असं प्रदीप लोखंडे अभिमानाने सांगतात. विविध प्रादेशिक भाषांमध्ये काम असल्यामुळे त्या त्या भाषा बोलणारी माणसं या संस्थेत आहेत. आणखी एक गोष्ट या कार्यालयात पदोपदी दिसते ती म्हणजे पत्र प्रदीप लोखंडे पुणे-13 या त्यांच्या एवढ्याशा पत्त्यावर त्यांना दिवसाला सरासरी 100 पत्रं तरी महाराष्ट्रासह देशभरातल्या 10 राज्यातून येत असतात. ज्यात असते वेगवेगळ्या गावांची इत्यंभूत माहिती.

ही संस्था गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण भारतातल्या खेड्यापाड्यात पोहचली आहे. भारतातल्या हजारो खेड्यांची माहिती घेउन संकलित करण्याचं काम ही संस्था करते. भारतातली 70 टक्के लोकसंख्या ही ग्रामिण भागात रहाते. खेड्यात रहाते. ग्रामीण भाग हाच खरा भारताचा कणा आहे. ग्रामीण जीवनशैली आणि त्यांची अर्थव्यवस्था समजून घेऊन 'रूरल रिलेशन्स' ही संस्था 'villagewiKY' (व्हिलेज विकी) निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. विकिपीडियाच्या धर्तीवर भारतातल्या प्रत्येक खेड्याची मूलभूत माहिती या villagewiKY वर उपलब्ध असणार आहे. गावाची लोकसंख्या, गावाची भौगोलीक, आर्थिक स्थिती, प्रमुख मंडळी, तिथला निसर्ग, त्यानुसार गावाची पीक पद्धती, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, रस्ते, वीज, पाणी, गावातली बाजारपेठ, गावाच्या जवळची मोठी बाजारपेठ ही सगळी माहिती या प्रकल्पामुळे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागात साधारणपणे मोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. त्या गावाच्या आसपासची अनेक खेडी ही आर्थिकदृष्ट्या या आठवडी बाजारावर अवलंबून असतात. त्यांचा अनेक कारणाने त्या गावाशी संपर्क येत असतो. त्यामुळे अशा दोन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाची मूलभूत माहिती मिळवल्यास त्या गावावर अवलंबून असणाऱ्या इतर गावांचीही माहिती सहजरीत्या मिळू शकते. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून रूरल रिलेशन्स या संस्थेने देशभरातल्या ६० हजार गावांचा 'डेटाबेस' मिळवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा गावांवर अवलंबून असणाऱ्या इतर गावांशी जोडलं जाणं शक्य होणार आहे. या मोठ्या खेड्यांचा विकास झाला म्हणजेच परिणामी आसपासच्या छोट्या गावांचा विकास होईल असं सिद्धांत लोखंडे मांडतात.

महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गोळा केलेली ही सगळी माहिती नंतर सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे आणि ती ही मोफत. त्यामुळे शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्था यांना खेड्यापाड्यात काम करणं अगदी सहज आणि सोपं होणार आहे. ही सर्व माहिती वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर त्यात नंतर आवश्यकतेनुसार बदलही करता येणार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी त्या त्या गावातल्या तरुणांनी घ्यावी असं प्रदीप लोखंडे यांना वाटतं.

व्हिलेज विकी सोबत 'Gyan- Key' (ज्ञान की) (ज्ञानाची गुरुकिल्ली) ही एक वाचन चळवळ रूरल रिलेशन्स चालवते. यामध्ये माध्यमिक शाळांमध्ये वाचनालय उघडण्याचे काम केले जाते. आजघडीला संस्थेनं ३६४० वाचनालयं ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये उघडली आहेत. ज्याचा फायदा १० लाखांहून अधिक विध्यार्थ्यांना होत आहे. शिवाय आजही प्रत्येक कामाच्या दिवशी (वर्किंग डेज्) तीन नवीन वाचनालय नव्याने सुरु होत आहेत.

एनआरआय (NRI) प्रमाणे एनआरव्ही (NRV) म्हणजे अनिवासी गाववासी यांच्या माध्यमातून प्रत्येक वाचनालयात विविध विषयांची २०० पुस्तकं दिली जातात. आजवर सुमारे २ कोटी १७ लाख रुपये किंमतीची ७ लाख १५ हजार पुस्तकं ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात देण्याचं काम या संस्थेनं केलं आहे. भविष्यात ९४ हजार ज्ञान की वाचनालय सुरु करण्याचं उद्दिष्ट संस्थेचं आहे.

आपण दिलेल्या देणगीचा योग्य उपयोग होणार नाही. किंवा ती गरजूंपर्यंत पोहचणार नाही अशी भिती अनेकांना असते. यावर 'रुरल रिलेशन्स'नं जालीम उपाय शोधून काढलाय. प्रत्येक वाचनालयाच्या किटसोबत काही पोस्टकार्ड दिली जातात. त्यावर वाचनालयासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांची नावं आणि पत्ते असतात. विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचल्यानंतर त्याविषयीचा अभिप्राय त्या पोस्टकार्डाद्वारे कळवावा म्हणून ही क्लुप्ती. यामुळे अभिप्राय मिळाल्यानंतर आपण दिलेलं ज्ञानाचं दान योग्य ठिकाणी पोहचलं आहे याचं समाधान देणाऱ्याला मिळतं. यामुळेच Gyan- Key चं बोधवाक्य असलेलं "वाचा-लिहा-बोला" हे सार्थकी ठरते.

ठिकठिकाणी शाळांमध्ये पोस्टकार्ड पाठवायची असल्यानं लोखंडे यांनी हजारांवर पोस्टकार्ड लागतात. ती सातत्याने पोस्टातून खरेदी करावी लागतात. त्यामुळेच त्यांची गणणा पोस्टाच्या मोठ्या ग्राहकांमध्ये होते. शिवाय त्यांना रोजच देशाच्या निरनिराळ्या भागांतून विद्यार्थी पुस्तकांविषयीचा अभिप्राय लिहून पाठवत असतात. त्यामुळे पोस्टमन काकांची रोज एक चक्कर त्यांच्या कार्यालयात होतेच होते. आजपर्यंत लोखंडे यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांनी पाठवलेले 1 लाख 20 हजार 550 अभिप्राय आहेत. त्यासोबत 1 लाख 30 हजार 360 अभिप्राय हे विविध देणगीदारांकडे आलेले आहेत. हे सर्व अभिप्राय रुरल रिलेशन्सच्या कार्यालयात पहायला मिळतील. हे सर्व अभिप्राय दाखवत असतांना आपण करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहचत असल्याचं समाधान वाटतं असं ते सांगतात. मी आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही, मी वास्तविक आहे म्हणूनच मी हे करु शकतो असं त्यांचं ठाम मत आहे.

यासोबतंच गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी Gaon-key ही अभिनव संकल्पना त्यांनी आणली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने चार प्रकार आहेत. Fit-key, Bhraman-key, Skill-key आणि MaD-key या चतु:सुत्रीच्या वापराने गावातली प्रत्येक वयोगटातली व्यक्ती सर्व बाबींमध्ये स्वयंपूर्ण होऊ शकेल.

चतु:सुत्री कार्यक्रमात Fit-key (फिट-की) मध्ये आरोग्यच्या दृष्टीने आवश्यक मैदानी खेळ, सुर्यनमस्कार, योग साधनेच्या माध्यमातून मन आणि शरीर तंदरुस्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. Bhraman-key (भ्रमण-की) मध्ये गावाजवळचा निसर्ग, डोंगर, नदी, ओढा, किल्ला, वनराई यांच्याविषयी जागृती करुन गावकऱ्यांना निसर्गाच्या सानिध्यात अधिकाधिक रहाण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून निसर्ग आणि पर्यांवरण यांच्याविषयी आपुलकी निर्माण होऊन जैवविविधता जोपासण्यात आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होईल.

आपल्यातल्या कौशल्याचा वापर जर उदरनिर्वाहासाठी केला तर त्यातुन रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणुनच Skill-key (स्किल-की) च्या माध्यमातून इलेक्ट्रीशन, सुतार, प्लंबर, मेकॅनिक, न्हावी, माळी, फोटोग्राफर, रिपोर्टर, पेंटर, गवंडी यांसारख्या व्यवसायातून अनेकांचे भविष्य उभं रहाणार आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय मुलांसाठी MaD-key (मॅड-की) ची संकल्पना आहे. यामुळे मुलांच्या वैयक्तीक आवडी-निवडी आणि गायन, वादन. संगीत, नृत्य, हस्तकला यांसारखे छंद जोपासण्यात मदत होणार आहे.

प्रदीप लोखंडे हे उत्तम व्यावसायिक आहेत. भारतात अनेक गोष्टी या केवळ देणगी स्वरूपात किंवा दान म्हणून केल्याने त्याचं हवं तसं 'आउटपुट' मिळत नाही असं त्यांचं ठाम मत आहे. याउलट एखाद्या गोष्टीचं योग्य बिझनेस मॉडल तयार केलं तर तीच गोष्ट अधिक परिणामकारक ठरते. यामुळेच की काय जगविख्यात मार्केटींत तज्ञ फिलिप कोटलर यांच्या व्यवस्थापनाच्या पुस्तकात 'रूरल रिलेशन्स'ची नोंद आढळते. व्यवस्थापन शिकणाऱ्या जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची केस स्टडी अभ्यासावी लागते.

देशातल्या सर्व मोठ्या ब्रँड बरोबर त्यांनी आतापर्यंत रुरल रिलेशन्सच्या माध्यमातून सीएसआर प्रोजेक्ट राबवले आहेत. आरबीआय सारखी संस्था सुद्धा त्यांचं कार्य ग्रामिण भागातील तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी प्रदीप लोखंडे यांच्या संस्थेची मदत घेते यातच सर्व काही आलं.

  • अजिंक्य गुठे सालेगांवकर

Updated : 5 May 2017 6:41 AM GMT
Next Story
Share it
Top