Home > मॅक्स कल्चर > दुख्तर - एक बोचणारी गोष्ट

दुख्तर - एक बोचणारी गोष्ट

दुख्तर - एक बोचणारी गोष्ट
X

आपल्या मुलीसोबत घराबाहेर पडलेल्या अल्लाहरखीला सोहेल प्रश्न विचारतो.

तुझी कहाणी काय आहे?”

माझी कहाणी?

वयाच्या पंधराव्या वर्षी माझं लग्न झालं. आणि माझी कहाणी तिथंच संपली.हे सांगताना अल्लाहरखी काहीशी हसते. पण हे हसणं खुप अस्वस्थ करणारं आहे. तिला ही आणि दुख्तर हा पाकिस्तानी सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही. कारण एव्हाना प्रेक्षक अल्लाहरखी आणि तिची 10 वर्षांची मुलगी झेनाबच्या कहाणीत पुरते गुरफटलेले असतात. 10 वर्षांच्या झेनाबचं तिच्या आजोबांच्या वयाच्या माणसाशी लग्न ठरलंय. हे लग्न नव्हे एक सौदा आहे. झेनाबच्या वडीलांना मिळणाऱ्या जीवदानाच्या बदल्यातला. काही वर्षांपूर्वी अल्लाहरखी बरोबरही असंच घडलंय. तिला आपल्या मुलीची कहाणी संपू द्यायची नाहीए. म्हणूनच की जीव धोक्यात घालून झेनाबला घेऊन लाहोरला जायला निघालेय.

दुख्तर(2015) हा दिग्दर्शक अफिया नथानिलचा पहिलाच सिनेमा. पण तिनं पाकिस्तान-अफगाणिस्तानाच्या सिमेवरचा भाग ज्या पध्दतीनं चितारलाय, सामाजिक आणि सिनेमॅटीक . दोन्ही पध्दतीनं, त्यानं जगासमोर अस्वस्थ पाकिस्तानातल्या आतल्या भागातली गंभीर परिस्थिती लक्षात येते. खास करुन पाकिस्तानातल्या स्त्रियांची स्थिती. आजही एखाद्या वस्तूसारखी होणारी त्यांची देवाणघेवाण, असंख्य शारिरीक आणि मानसिक अत्याचार हे सर्वकाही दुख्तरमध्ये पहायला मिळतं. त्यामुळं सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसा जास्त अस्वस्थ करायला लागतोय. कारण या सिनेमात पाकिस्तानातली सामाजिक परिस्थिती जशी आहे तशी मांडण्यात आलीय.

ही घटना अगदी अलीकडची आहे.जेमतेम सात-आठ महिन्याअगोदरची. पाकिस्तानात मुलींचं लग्नाचं वय 16 वरुन 18 करण्याचा प्रस्ताव नॅशनल असेंब्लीत (म्हणजे तिथल्या लोकसभेत) आला होता. काऊंसिल ऑफ इस्लामिक आयडॉलॉजीच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला धर्मविरोधी ठरवलं. या नंतर पाकिस्तानात मानवी हक्क खासकरुन महिलांसाठी लढणाऱ्या संघटनांनी जाहिर जाहिर निषेध केला. 2016 मध्ये बुरसटलेले विचार असलेल्या आयआयसीच्या प्रमुखाला बडतर्फ करा अशी मागणी झाली. पण धर्माकडे जास्त झुकलेल्या पाकिस्तानात हे होणं शक्य नव्हतं. स्त्रियांना समान हक्क मिळावेत यासाठी सुरु झालेल्या सफ्रागेट लढ्याला आता शंभरी वर्षे पूर्ण झालीयत. युरोपातल्या या लढ्याचं लोण जगभरात पसरलं होतं. जगभरातल्या महिला आपल्या हक्कासाठी जागृत झाल्या. खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरल्या, प्रसंगी तुरुंगात गेल्या. पण आंदोलन यशस्वी झालं. त्यांना समान अधिकार मिळाले. पण जगाच्या एका कोपऱ्यात अजूनही जंगल राज आहे. पाकिस्तानात ही परिस्थिती फार भयावह आहे. खासकरुन अजूनही जुन्या रुढी परंपरेचा बडगा असलेल्या सीमांत भागात. तिथं अजूनही आधुनिक जगाच्या हवेचा स्पर्श झालेला नाही. अजूनही कबिल्याचं राज्य चालतं. कबिल्याचा प्रमुख जे ठरवेल तेच होतं. कबिल्यांमध्ये अजूनही तश्यात मारामारी होतात. जुन्या हत्यारांच्या जागी ऑटोमॅटीक मशिनगन आल्यात. अगदी आधुनिक. तिथल्या स्त्रियांची परिस्थितीतर 100 वर्षापूर्वी जशी होती तशीच आहे. नाही म्हणायला थोडासा काहीतरी बदल झाला आहे. पण अजूनही ती तशीच पडद्या आड. अजूनही ती फक्त एक वस्तू आहे. उपभोगण्याची आणि दाव लावण्याची.तिची खरेदी विक्री ही होते. तेही तिला न विचारता. मुलीला पाळी येण्यापुर्वीच अनेकदा त्यांची लग्न होता. आपल्या बाबतीत हे काय होतंय याची त्या मुलीला जाणीवच नसते. आपल्या आईलाही अश्याच परिस्थितीतून जाताना तिनं पाहिलंय. त्यामुळं हे आपलं नशीब आहे असंच तिला वाटतं.

पाकिस्तानात 15 व्या वर्षापर्यंत लग्न होणाऱ्या मुलींची संख्या ही स्त्रियांच्या एकूण संख्येच्या 22 टक्के इतकी आहे. यापैकी 3 टक्के मुलीतर 9 व्या किंवा 10 व्या वर्षीच या गर्तेत लोटल्या जातात. त्यांचा प्रचंड लैंगिक छळ होतो. हे युनेस्कोच्या अहवालातून स्पष्ट झालंय. दुख्तर सिनेमातली अल्लाहरखी ही अश्याच लैंगिक छळाचा शिकार बनलेली. झेनाब अश्याच संबंधातून झालेली मुलगी. अल्लाहरखीला तर पळवून आणलेलं. त्यामुळं तिच्यावर झालेला अन्याय जास्त होता. यामुळंच झेनाबवरही अशीच पाळी येणार हे दिसल्यावर ती पळून जाते. झेनाबला घेऊन.

या दोन्ही मायलेकींचा प्रवास निसर्गरम्य सिंध प्रांतातला. त्यांना मदत करणारा सोहेल पुर्वाश्रमीचा तालीबानी पण आता सुधारलेला. जिहाद हा जगण्याचा मार्ग असू शकत नाही. म्हणून त्यानं आपला वेगळा मार्ग निवडलेला. अश्याच मार्गावर अचानक त्याची या दोन मायलेकींशी भेट होते. यानंतरचा दुख्तर सिनेमा सिंधप्रातातल्या निसर्गात घडतो. जसजशी गोष्ट पुढे जाते तसतसं पाकिस्तानातल्या आतल्या भागात नक्की काय चाललंय. याचा खुलासा व्हायला लागतो. पुरुषप्रधान संस्कृती इथं ठासून रुजलेली. म्हणूनच की संपूर्ण प्रवासात अल्लाहरखी आणि झेनाब शिवाय कुठलीच बाई दिसत नाही. या दोघीही प्रचंड दहशतीत आपला प्रवास करतायत. एका एका संकटातून मार्ग काढत लाहौरकडे निघाल्यात. तिथं थोडी परिस्थिती वेगळी असेल या अपेक्षेत.

या संपूर्ण प्रवासात अल्लाहरखी आणि झेनाबच्या प्रश्न उत्तरातून पाकिस्तानातल्या सीमाभागातली स्त्री आपल्याला भेटते. 9 वर्षाच्या झेनाबचे प्रश्न अगदी निरागस असतात. छानसं घर असण्यासाठी लग्न करणंच गरजेचं आहे का ? हा त्यापैकीच एक. शिवाय लग्नानंतर काय घडतं हे ही तीनं आपल्या मैत्रिणीकडून जाणून घेतलंय. तिच्यापेक्षा एखाद-दोन वर्षांनी मोठी असलेल्या मैत्रिणीनं दिलेलं स्पष्टीकरण धक्क करणारं आहे. अजाणत्या वयात जिथं स्त्री आणि पूरुष संबंधाबद्दल जी जिज्ञासा असते त्यातून आलेलं आहे. पण पुढे झेनाबचे प्रश्न अगदी काळजाचा ठाव घेतात. तिच्या अनेक प्रश्नांची उत्तर अल्लाहरखीकडे नसतात. लग्नाच्या पेहरावावर रक्ताचे डाग का पडतात, माझ्या पेहरावावर ही असेच डाग पडणार का असे साध्या प्रश्नातून दिग्दर्शिका आफियानं तिथल्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची गोष्ट अगदी नेमकी सांगितली आहे.

दुख्तर सिनेमा पुढे कसा जातो किंवा त्याचा शेवट काय होतो यापेक्षा इथं महत्त्वाचं आहे ते तिथल्या समाजानं केलेला दुख्तरचा स्विकार. मागच्या वर्षी म्हणजे 2015 ला पाकिस्ताननं हाच सिनेमा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला. पुरस्काराच्या स्पर्धेत तो टिकला नाही. पण पाकिस्तानातल्या या सामाजिक स्थितीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. मागच्या वर्षी उत्कृष्ठ माहितीपटाचा ऑस्कर मिळालेल्यागर्ल इन द रिवर – प्राईस ऑफ फरगिव्हनेसनं तिथल्या ऑनर किलिंगच्या समस्येवर लक्षे वेधलं. पण दुख्तर आणि गर्ल इन द रिवर पर्यंत पाकिस्तानातल्या महिलांची गोष्ट थांबत नाही. अफगाण युध्दानंतर पाकिस्तानातल्या सिमा प्रांतात पळून आलेल्या तालीबान्यांनी हळूहळू इथल्या समाजाला जास्तीत जास्त बुसरटवायला सुरुवात केलीय. धर्माच्या नावाखाली इथला समाजात पुन्हा अश्मयुगाचे नियम लादले जाऊ लागलेत.पाकिस्तानात तालीबान्यांची नवी पिढी जन्माला येऊ लागलेय. चॅनल 4 वरच्या डिस्पॅचेस या मालिकेतल्या पाकिस्तान तालीबान जनरेशन (2012) या डॉक्युमेन्ट्रीतून तिथं गंभीर होत चाललेली परिस्थिती दिसते.

सफ्रागेटचळवळीच्या यशाला 100 वर्षे पूर्ण होत असताना पाकिस्तानातल्या स्त्रीहक्क संघटना आजही झीना आणि कझाफ सारख्या कायद्यांविरोधात लढत आहेत. हे पाकिस्तानाच्या सामाजिक मागासलेपणाचं लक्षण आहे. म्हणूनच दुख्तरमधली अल्लाहरखी खऱ्या अर्थानं लढवय्यी ठरते. म्हणूनच तिची आपल्या मुलीला या रुढी परंपरापासून वाचवण्याची लढाई एकटीची राहत नाही तर ती संपूर्ण पाकिस्तानातल्या स्त्री हक्काच्या लढाईचं प्रतिनिधीत्व करते.

नरेंद्र बंडबे

Updated : 25 Jan 2017 11:38 AM GMT
Next Story
Share it
Top