Home > भारतकुमार राऊत > `जाईन विचारीत रानफुला...!'

`जाईन विचारीत रानफुला...!'

`जाईन विचारीत रानफुला...!
X

गान सरस्वती किशोरीताई अमोणकर गेल्याची बातमी आली, तेव्हा सकाळ झालेली होती. रात्रीच्या अंधारातच शास्त्रीय गायकीतला हा लखलखता तारा निखळून गेला. त्यांनी वयाची संध्याकाळ अनुभवली होती. तरी सर्वत्र काळोख दाटलेला असतानाच, त्यांच्या रुपाने 'घन तमी शुक्र बघ राज्य करी', सारखा त्यांच्या असितत्वाचा शुक्र दिमाखात राज्य करत होता. आयुष्याची अखेर आली, हे किशोरीताइंर्ना जणु जाणवलेच नव्हते. त्यामुळेच त्यांची एका बाजूला नवनव्या बंदिशींची तयारी चालूच होती. गाण्यांच्या मैफिलींची निमंत्रणेही त्या स्वीकारत होत्या आणि शिष्यगणांना त्यांचे मार्गदर्शनही चालूच होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती, हे खरे, पण त्यामुळे नियती त्यांना आपल्यातून घेऊन जाईल आणि वाढदिवसाला जेमतेम आठवडाल उरलेला असताना त्यांची 'जयंती' साजरी करण्याची वेळ येईल, असे कुणालाच, कदाचित त्यांना स्वत:लाही वाटले नसणार. म्हणूनच की काय सोमवारी पाठ दुखतेय, म्हणून मी पडते, मला उठवू नको असे आपल्या सहायिकेला सांगून त्या निजल्या, त्या कायमच्याच. शांत सूर आळवत अख्खी हयात केवळ संगीत सेवा करता करता त्यांची अखेरही तितक्याच शांतपणे झाली.

किशोरीताईंची शास्त्रीय संगीतावरील हुकुमत, त्यांचे गाण्यातील जयपूर घराणे, आई मोगुबाई कुर्डुकर यांच्याकडून यांच्याकडून मिळालेले गायकीचे बाळकडू, घराण्याच्या बंधनापासून थोडे स्वातंत्र्य घेऊन त्यांनी बांधलेल्या बंदिशी, गाण्यावर त्यांनी केलेले स्वत:चे संशोधन या साऱ्याविषयी गेल्या चार दिवसांत बरेच काही बोलले, लिहिले गेले. किशोरीताईंना पद्मभूषण व पद्मविभूषण हे किताब मिळाले. त्या गेल्यानंतर मंगळवारी त्यांचे अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडले. त्यातूनही त्यांची महती सर्वांच्या समोर आली. त्यामुळे त्याबद्दल आता फारसे काही लिहावे, असे नाही. पण या गायकीच्या तपश्चर्येमागे एक माणूस, एक प्रेमळ पण शिस्तबद्ध माता आणि तितक्याच कडक शिस्तीची शिक्षिका दडलेली होती. आपल्या शिष्यांना आपल्याकडे जे काही आहे, ते सारे काही द्यावे व त्यांनी सर्वोत्तम व्हावे, ही त्यांची तळमळ होती. आपल्याकडे जे आहे, ते हंड्यांमध्ये भरून शिष्यांना द्यावे, अशी त्यांची दुर्दम्य इच्छा होती, त्यासाठी त्यांची शिष्यपरंपराही तयार होती. पण त्यांनी हंडा भरून देण्याची तयारी दाखवली, तेव्हा ती घेणाऱ्यांच्या हाती केवळ द्रोणच होते. बहुतेक ज्ञानी गुरुजनांचे हे असेच होते. 'अनंत हस्ते कमलाकरांने देता किती घेशील दोन करांनी' अशी या ज्ञानसाधनेची अखेर अवस्था असते.

किशोरीताई कमालीच्या मनस्वी होत्या. अनेक कलावंतांचा मानसिक पिंड असाच असतो. किशोरीताईंच्या याच स्वभावाला अनेकांनी मीतभाषी असे संबोधन दिले, तर काहींनी त्यांची लहरी, हेकेखोर व तुसड्या अशा शेलक्या विशेषणांनीही संभावना केली. आपल्याला दिली जाणारी ही दूषणे किशोरीताईंना समजत होतीच. कारण त्या मुळातच चाणक्ष होत्या, पण त्यांनी या साऱ्याकडे दुर्लक्ष केले, कारण अशा टीकेची पर्वा करण्याची त्यांना कधी गरजच वाटली नसावी. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गानसेवा हाच त्यांचा दिनक्रम असायचा. त्यामुळे आपल्याविषयी कोण काय बोलते, हे जाणून घ्यायची त्यांना कधी उत्सुकताच नव्हती. त्यामुळेच कदाचित आपल्याबद्दल बाहेर काय प्रवाद आहेत, त्यांच्या कधी कानीही आले नसणार. त्या कायमच स्वत:च्या गानसमाधीत रममाण राहिल्या. अशा आत्ममग्न कलावंतांना जगाची काय फिकीर?

या आत्ममग्नतेमुळेच त्यांनी अनेक संधी नाकारल्या. त्या काळात अनेक शास्त्रीय संगीतातील उपासकांनी चित्रपटांत गाणी गायली. किशोरीताईंनाही तशी संधी आली व त्यांनी 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटाचे शीर्षक गीत गायलेसुद्धा. ते कमालीचे लोकप्रिय झाले. पण आई मोगुबाई चिडल्या. चित्रपट संगीतात वेळ घालवू नकोस, संगीत साधना कर, असा सल्ला त्यांनी कन्येला दिला व व्यवहाराचा विचार बाजूला ठेवून त्या पुन्हा शुद्ध संगीत साधना करू लागल्या. नंतर त्यांनी 'दृष्टी' या चित्रपटाला संगीत दिले. पण आत्ममग्नतेमुळे पुढे त्या चित्रपट-नाटकाकडे वळल्या नाहीत. चित्रपट व नाटक ही आपली कला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी साधन असेल, तर त्याकडे पाठ का फिरवलीत? या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्या मंद हसल्या व म्हणाल्या, 'पाठ फिरवणारी मी कोण? या माध्यमांनीच माझ्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या अटी व अडचणींबरोबर तडजोड करून गाणे मला मान्य नव्हतेच म्हणा. ती कसली संगीत सेवा व साधना?' त्यांचा सवाल बिनतोड होता.

मला थोडी फार समजूत येत होती, त्या काळात महाराष्ट्रात एका बाजूला पंडित भीमसेन जोशी होतेच, दुसऱ्या बाजूला हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डुकर यांच्या नावांचा बेलबाला होता. पण गाण्यातले काही समजण्याचे ते वाय नव्हते. नंतर किशोरीताईंचे नाव ऐकू येऊ लागले. हातात स्वरमंडल घेऊन तान घेणाऱ्या किशोरीताई खरे तर जयपूर घराण्याच्या अनभिषिक्त सम्राज्ञी. त्यांच्या उभारीच्या काळात जितेंद्र अभिषेकी, पंडित कुमार गंधर्व ही मंडळीही शास्त्रीय गान पंरपरा पुढे घेऊन जातच होती. कुमार गंधर्वांनीसुद्धा मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात संशोधन करुन काही बंडखोर सिद्धान्त मांडले व स्वत:चे रागही बांधले. किशोरीताईंनीसुद्धा अशीच काही मंडणी आपल्या जीवनाची केली. त्या उत्तम तयारीच्या गायिका तर होत्याच, शिवाय त्यांनी आपल्याच संगीतावर खूप संशोधन केले. त्यातील शिक्तस्थळे व कमकुवत धागेही शोधून काढले, त्यावर उपाय सांगितले. आपल्या जयपूर घराण्याशी असलेली बांधिलकी न तोडता त्यांनी त्याच घराण्याच्या गायकीचा विस्तार केला. संगीतातील कोणत्याही घराण्यापेक्षा संगीत श्रेष्ठ आहे. मी त्याच्याशी प्रामाणिक आहे, हे त्यांनी ठासून सांगितले. या बाबतीत त्यांची मनोभूमिका वैज्ञानिकाची होती. कोणत्याही गान परंपरेला एका घराण्याच्या नियमांच्या चौकटीत बांधून ठेवणे योग्य नाही, तसे करणे शक्यही नाही. तसे केले तर कला मरूनच जातील, हे त्या ठासून सांगत. ही त्यांची मोठी संगीतसेवा होती.

किशोरीताईंना कधी फोन केला, तर पलिकडून आवाज येई, 'मी किशोरी बोलतेय'. त्यांच्या कोकणी नासिकायुक्त आवाजावरूनच त्यांचा कलाकाराचा पिंडही ध्यानात येई. एकदा त्यांची मुंबईत एक मैफल होती. मला त्या म्हणाल्या, 'तुम्ही या'. मी म्हटले, 'ताई, मला शास्त्रीय संगीतातले काहीच कळत नाही, मी सीट अडवून काय करू?'. त्या तात्काळ उद्गारल्या, 'शुद्ध स्वर आणि शुद्ध कान असतील, तर संगीत कुणालाही कळतं, भावतं सुद्धा. तुम्ही अवश्य या'. ती मैफल माझ्या मनावर कायमची कोरली गेली. त्यांचे सूर शुद्ध व त्यामुळे कर्णमधूर तर होतेच, पण त्यापलिकडे ते प्रावाहिक व व चैतन्यमय होते. ही त्यांच्या गानतपस्येची किमया होती. त्यांच्या शुद्ध सुरांतून साक्षात सरस्वती दर्शन देते, असा भास होऊ लागला. त्यातच त्यांनी 'अवघा रंग एकचि जाला', हा संत चोखा मेळा यांच्या पत्नी सोयराबाई यांनी रचलेला दुर्मीळ अभंग आळवायला सुरुवात केली आणि डोळ्यासमोर ती सातशे वर्षांपूर्वीची 'चोखयाची महारी' उभी राहिली. 'हे श्यामसुंदर राजसा' हे विराणीच्या वळणाने जाणारे भिक्तगीत व 'कानडा कानडा विठ्ठल' हा अभंगही त्याच जातकुळीतले. किशोरीताईंनी त्यांची शुद्ध सूर आळवावेत आणि आपल्या जीवाचा कान व्हावा, असे त्यांच्या लाखो चाहत्यांसारखे माझेही होतच राहिले.

अशा किशोरीताई. त्या गेल्या; केवळ एक गाणेच संपले असे नव्हे, तर शास्त्रीय संगीतातील एक विद्यापीठ कायमचे बंद झाले. त्या कुठे गेल्या? त्या असत्या तर 'जाईन विचारीत रानफुला', असे गात त्या शांता शेळकेंचे गाणे पुटपुटत साजनाला शोधत फिरल्या असत्या. पण आता त्या नाहीत. याच कवितेतील शेवटचे चरण ओठावर येतात:

वाहत येईल पूर अनावर

बुडतील वाटा आणि जुने घर

जाईल बुडून हा प्राण खुळा

भेटेल तिथे गं सजण मला ।।

किशोरीताईंना आदरांजली!

-भारतकुमार राऊत

Twitter: @BharatkumarRaut

Updated : 6 April 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top