Home > मॅक्स ब्लॉग्ज > अहिराणी संस्कृती आणि भाषा 

अहिराणी संस्कृती आणि भाषा 

अहिराणी संस्कृती आणि भाषा 
X

खान्देश हा अतिशय प्राचिन संस्कृती,परंपरा,इतिहास,भुगोल लाभलेला महाराष्ट्राचा मोठा भुभाग आहे. भारताचा इतिहासात आणि नकाशात तो आजही आपले स्थान टिकवून आहे. इतिहासाच्या अनेक प्रवाहातून निघून वादळांचा सामना करत खान्देशाने आपला भुभाग टिकवलाय तेही आपल्या वैशिष्ट्यांसह. या भुभागावर अनेक परिवर्तनाच्या पावुलखुणा ठळकपणे दिसतात. नव्या अश्मयुगापासून या भुप्रदेशाच्या इतिहास सुरु होतो. सावळदा, उत्तर सिंधु, माळवा, जोर्वे अशा संस्कृती पचवत आणि मिरवत हिंदु, जैन, बौद्ध संस्कृतीशी हात मिळवत हा प्रदेश इथपर्यंत पोहोचला आहे. दरम्यानच्या काळात मुस्लीम, सुफी आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा धर्माचा पंथाचा येथे खोलवर वापर झाला. ऋषीकदेश, कंददेश, खांडदेश, खांडवदेश, खान्देश, कन्नदेश, अभिरदेश, अशा वेगवेगळ्या नावानं या प्रदेशाचा प्रवास चालू झाल. कोणी याला कान्हाचा देश म्हणून कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश म्हणतात. तर कोणी खानाच्या राजवटीवरुन खान्देश म्हणतात की, काननदेवावरुन खान्देश की अजून कशावरुन खान्देश संबोधले जाते हा प्रश्न तसा आजही लोंबकळलेला आहे.

इ.स. 240 ते 419 अभिरांचे राज्य या भुभागावर होते. खान्देश प्राचीन काळापासुन अभिरांचे म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या बदल प्रा.गियर्सन प्रो. के. एम. मुन्शी, टैले मी, डॉ. बेवर, श्री. वैद्य यांनी विविध मते मांडली आहेत. मार्केडेय पुराणात अभिरांना दक्षिणदेशाचे रहिवासी म्हंटले आहे. नाशिक जवळील अंजनेरी अभिरांची राजधानी होय.

अहिराणी भाषाही महाराष्ट्र संस्कृतीला अहिरांनी दिलेली मोठी देणगी होय. अभिरांची किंवा अहिरांची बोली ती अहिराणी हा सिद्धांत सर्व संशोधक मान्य करतात. या अहिरांचा उल्लेख महाभारतातही आला आहे. अभिरानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरीस, यादव राजवटींनीही येथे सत्ता प्रास्थापित केली. त्याचे पुरावे देणारे विविध कालखंडातील तामपट, शिलालेख सापडले आहेत.

तापी म्हणजे खान्देशाची गंगा, तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा शोध उत्खननीय पुराव्यावरुन लागला. खान्देशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण गोष्ट म्हणले सावळदा (शिरपूर-पुणे मार्गावर) येथे उत्तर हरपन काळात संस्कृती विकसीत झाले ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ.स. 2200 ते 1800) उदयास आले. खान्देशात एका स्वतंत्र संस्कृतीच्या त्या काळात उद्य झाला असा एतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबारस लाभले आहे. उत्तर हरप्पन संस्कृती 4 ते 5 हजार वर्षापूर्वी येथेच विकसीत झाली. त्या पुरातनीय अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले. सार्की येथील अश्मयुगीन हत्यार आजही मुंबईच्या वस्तुसंग्राहलयात प्रथम दर्शनी भागात काचेच्या शोकेसमध्ये ठेवले आहे.

तापी नदीच्या तिरावर मध्ययुगीन कालखंडातील खान्देशाच्या राजधानीचे गाव म्हणजे थाळनेर, प्राचिन मध्ययुगीन काळापासून समृद्ध असलेला निसर्ग रम्य परिसर थाळनेर हे मोठे व्यापारी केंद्र होते. थाळनेरचा किल्ला आजही प्राचीन इतिहासाची साक्ष देत प़डक्या अवस्थेतील अवशेष घेऊन उभा आहेत. तापी ,पुर्णा, गिरणा, बोरी, पांझरा, अंजना, वधुर, भोगावती, मोर, सुकी, भोकर, हरकी, आदी नद्यांच्या अवती भवती एक दिड लाख वर्षापुर्वीचा माणसांचे अस्तित्व होते असे संसोधनातून सिद्ध होते त्यामुळे अर्थातच खान्देशाला अतिप्राचीनत्व बहाल होते. संस्कृत्यांशी त्यांच नाते जोडते. चोपडा तालुक्यात वाहणारे उनबदेव, सुनबदेव आणि माझदेव या गरम पाण्यांच्या झऱ्यांनांही देवत्व बहाल करते. महाकाव्यात आणि इतिहासात खान्देशाने मोठी आणि लांब पल्ल्याची जागा व्यापली आहे. खान्देशाचे समाजशास्त्रही खूप संपन्न आहे. इतरत्र असलेल्या आणि नसलेल्या जाती जमाती येथे वास्तव्यात होत्या. गुजरात, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्रातून तसेच परकीय सत्तेबरोबर आलेले वेगवेगळे समूह सुद्धा येथे राहत होते. या साऱ्यांनी मुळ संस्कृतीत आपआपल्या संस्कृतीची भर घातली. त्या संस्कती वाढत राहिल्या, टिकत राहिल्या. त्यात ब्राम्हण, मराठा, जैन, तेली, तांबोळी, माळी, साळी, भिल्ल, पावरा, बांजरा, पारधी, भाट जसे आहेत तसे महारांच्या साडे बारा जातीही होत्या. आता हे सर्व बौद्ध झाले आहेत. वेगवेगळे धर्म, पंथ, जाती, संस्कृती या सर्वांची एक सुंदर वीण म्हणजे खान्देशाचे संस्कृती होय.

हा प्रदेश परकिय राजवटीत टिकून राहीला आणि इंग्रजी राजवटीत कडवा स्वातंत्र्य योद्धा झाला. 1857 च्या उठावात तर हा प्रदेश खूपच क्रांतीकारी ठरला, या विषयावरही खूप लिहिण्यासारखे आहे.

मानवी जीवनाच्या सर्वंच क्षेत्रात खान्देशाने आपला सहवास नोंदवला आहे. लौकिकास नेला आहे. प्रसिद्ध गणितीतज्ञ भास्कराचार्य, कवी नारो आणि व्यास, बालकवी फोंबरे, बा.सी.मर्ढेकर, केशवसुत पुरुषोत्तम पाटील, ग.ह.पाटील, गजमल माळी, इंद्रराव पवार, गणेश चौधरी, डॉ. किसन पाटील, डॉ. विश्वास पाटील, म. ना. उदावंत, दि. के. देशपांडे, मो. द. कुंदे, धोंडु वेडु जोगी, नजुबाई गावीत, डॉ. पितांबर सरोदे, कवि वाहरु सोनवणे, डॉ. उषा सावंत आदी अनेकांनी साहित्यक्षेत्र समृद्ध केले आहे. खान्देशमध्ये ज्ञानपिठ आणणारे भालचंद्र नेमाडे, सत्यशोधक कम्युनिष्ठ पक्षाची स्थापना करुन महाराष्ट्रातील विचार आणि चळवळींना नवी दिशा देणारे कॉ. शरद पाटील, कवि ना.धो. महानोर या सर्वांनी खान्देशच्या भुमीत आपल्या कर्तुत्वाच्या मुद्रा कोरल्या आहेत. आणखी ही नामावली वाढवता येईल.

खान्देशाला कृषी संस्कृती, वस्त्र संस्कृती, नृत्य-कला संस्कृती, तसेच खाद्य संस्कृती आहे. प्राचीन काळातील मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणारी संस्कृती आजच्या आधुनिक काळात सुद्धा पहायला मिळते. मातीच्या खापरावरच्या पुरण पोळ्या आजही खान्देशात आवडीने केल्या जातात. वांग्याचे भरीत खावं ते खान्देशातच. दाळबट्टीचा आस्वाद घ्यावा तो खान्देशातच. शेवभाजी नंतर, कळण्याची भाकर तसच उन्हाळी वाळवण केलेले खास कुरुड्या, बिबळ्या-पापडचे विविध प्रकार हात शेवया पाटांवरच्या शेवया हे पदार्थ आजही खान्देशात पारंपारीक पद्धतीने करतात.

खान्देशाची अहिराणी भाषेला स्वतंत्रा लिपी नाही. पण येथील लोक आपले साहित्य मौखिक स्वरुपात जतन करत आले आहेत. तसंच येथील कला संस्कृती पारंपारिक चालीरिती सणवार जोपासली आहे. परंतु आधुनिक काळातील बदलत्या वातावरणाची झळ या खान्देश अहिराणीलाही बसत आहे. भाषा हा संस्कृतीचा आधार असतो. ती संस्कृतीची वाहकही असते. पण जागतिकीकरणात संस्कृत्या आणि भाषा यांची घुसमट होत आहे. महाराष्ट्रातील एक तरुण भाषाशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अविनाश पांडे यांनी जागतीकीकरणातील सांस्कृतिक संघर्ष (संपादक उत्तम कांबळे ) या ग्रंथात “धुमसतोयभाषिक संघर्ष” या शिर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. युनिस्कोच्या संकेत स्थळावरील माहितीचा आधार घेऊन त्यांनी म्हटले आहे की, आज बोलल्या जाणाऱ्या 6700 भाषांपैकी निम्या भाषा लोप पावण्याचा मार्गावर आहेत. हे प्रमाण इतके गतिमान आहे की, दर दोन आठवड्याला एक भाषा लोप पावते. जगातील नव्वद टक्के भाषा इंटरनेटवर नाहीत आणि ऐंशी टक्के भाषांना लिपी नाही. जागतिकीकरणाच्या माऱ्यात केवळ बोलीभाषाच नव्हे तर मराठी सारख्या केंद्रीय भाषाही चक्रव्युहात वाटचाल करणा आहे किंवा करत आहेत. आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा या राष्ट्रीय संपत्ती आहेत. जागतिकीकरणाच्या तडाख्यात –हास होत असलेल्या आपल्या या भाषाचं संगोपन करत त्यांना आत्मसातही केले पाहिजे. बोली भाषांना प्रतिष्ठा दिली पाहिजे.

अहिराणीचा विचार या सर्व जागतीक पार्श्वभूमीवर करायचा आहे. ही भाषा बोलणारा मोठा समुह आहे. त्यापैकी घरात अहिराणी बोलणारे जास्तीतजास्त लोक आहेत. घरात आणि घराबाहेर बोलणारे खेड्यात अधिक लोक आहेत. शहरात स्थलांतरीत झालेले लोक घरात अहिराणी तर बाहेर मराठी आणि इंग्रजी या व्यवहारातील भाषा बोलतात. परदेशात स्थायिक झालेल लोकसुद्धा आपापल्याघरात अधूनमधून अहिराणी बोलतात. काही जणांना आपली भाषा आणि त्यातही लिपी नसलेली बोलीभाषा अन्य प्रतिष्ठित भाषांच्या तुलनेत कनिष्ठ वाटते. परिणामी घराबाहेर ते अशी भाषा बोलायचे टाळतात. काही जण आपला वर्गीय विकास होईल तसे बोलीभाषा वापरायचे टाळतात.

परंतू आपल्या मुळभाषेत आपली संस्कृती आहे. ती टिकवणं ही सुद्धा काळाची गरज आहे. अन्यथा आपण परकीय भाषेचे इतके गुलाम बनू का आपला इतिहास आपले अस्तित्व पुसलं जाईल. ज्यात हजारो वर्षाची परंपरा, संस्कृती, साहित्य आहे. त्या भाषा ज्ञानभाषा, व्यवहारभाषा म्हणून जास्तीतजास्त प्रचलित करणे आवश्यक आहे. या बोलीभाषांना राजाश्रय मिळायला हावा. संशोधन करण्यासाठी तरूण वर्गाने पुढाकार घ्यायला हवा.

मौखिक साहित्य लिखित स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. अहिराणीचा अभ्यासक्रमात समाविष्ठ होणे गरजेचे आहे. यांचे या साहित्याची निर्मिती प्रचार प्रसार होवून लोकांमध्ये आपले साहित्य संस्कृतीची आवड निर्माण होणे, संवर्धनासाठी पुढे येणे आवश्यक आहे. भाषा आणि साहित्य संस्कृतीचे महत्त्व कळण्यासंदर्भात विविध उपक्रम आणि जनजागृती होणे आवश्यक आहे.

खान्देशात पर्यटन विकासासोबत खाद्यसंस्कृती, वस्त्र संस्कृती, सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळायला हवी. जर रोजगार व्यवसायाची संधी जास्ती प्रमाणात या भागात उपलब्ध झाली तर यातून अर्थाजन होऊन खान्देशातील तरुणांना बेरोजगारांना काम मिळेल. त्यातून खान्देशातून स्थलांतर होणाऱ्यांची संख्या आटोक्यात येईल. अहिराणी भाषेतील नाटक चित्रपटांनाही थिएटर-नाट्यगृह सहज उपलब्ध होईल अशी तरतुद होणे आवश्यक आहे. त्यासाठी खान्देशातील चारही जिल्ह्या व्यतीरीक्त पुणे मुंबई सारख्या शहरात सांस्कृतीक भवनांच्या निर्मितीची दखल शासनाने घ्यायला हवी. आकाशवाणी दुरदर्शनवर अहिराणीतील कार्यक्रम प्रसारीत करायला हावेत. या माध्यमातून नव्या पिढीला आपली भाषा साहित्य संस्कृती सहज कळेल. कलाकारांना काम मिळेल, लेखकांना अहिराणीतून लिहिण्याची चालना मिळेल. अहिराणी भाषेचे अभ्यास केंद्र उभारायला हावे. अहिराणीसाठी ग्रंथालय व्हायला हावे. आपल्या राज्यातील अतिप्राचिन अशी ही अहिराणी भाषा टिकवली तीचे संवर्धन सर्वोतोपरीने केला तर नक्कीच मराठी-महाराष्ट्र समृद्ध होण्यास मदतच होईल. या उद्देशानेच खान्देश “अहिराणी कस्तुरी” साहित्य संस्कृती कला क्रीडा मंच महाराष्ट्राभर कार्यरत आहे. या मंचच्या पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षण आणि सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. खान्देशाच्या-हाराष्ट्रच्या इतिहासात प्रथमच असे घडले, की सांस्कृतीक मंत्रीनी अहिराणी साहित्य संमेलनाची दखल घेऊन उद्घाटनाला आले आणि अस्सल अहिराणीत भाषणाची सुरूवात करून पुणेकर (खान्देशींना) आनंदाचा धक्का-उत्साह दिला. त्यांनी अहिराणी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्याचे सुतोवाच केले. तसेच अहिराणी साहित्य प्रकाशनाला अनुदान देण्याची घोषणा केली. अहिराणीवर संशोधन करणाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. सांस्कृतीक मंत्र्यांनी केलेली ही घोषणा, राजाश्रय नक्कीच खान्देशातील अहिराणीला संजिवनी ठरेल. हे उपक्रम योग्य प्रकारे राबविण्यात यावे व अहिराणीसाठी कार्य करणाऱ्यांपर्यंत पोहोचवायला हावेत. त्यासोबतच अहिराणी साहित्य संस्कृती संर्वधन करण्यासाठी व्यक्तींनी आणि संस्थांनी पुढाकार घ्यायला हावेत.

सौ. विजया सेरेश मानमोडे

Updated : 9 Jun 2017 12:20 AM IST
Next Story
Share it
Top