World Hepatitis Day: ‘हेपेटायटीस’पासून दूर राहण्यासाठी काय कराल?

53

‘हेपेटायटीस’ म्हणजे काय?

‘हेपेटायटीस’ हा यकृताचा एक विकार आहे. या आजारात यकृताला सूज येते. ‘हेपेटायटीस’ विषाणूच्या संसर्गामुळे हा आजार होतो. विशेषतः यकृतास लागण झालेल्या बऱ्याच विषाणूंपैकी भारतीय लोकांमध्ये ‘हेपेटायटीस’ ए, बी, सी आणि ई विषाणूंची लागण सर्वांधिक झालेली पाहायला मिळते. हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग कमी काळ टिकतो. पण ‘हेपेटायटीस’ बी आणि सी विषाणूंचा संसर्ग झाल्यास तो अधिक वर्ष तग धरून राहू शकतो. वेळीच निदान व उपचार न झाल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हेपेटायटीस या विकाराला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, सध्या जगभरात ३२५ दशलक्ष लोक हेपेटायटीस बी आणि सी या विकाराने पिडित आहेत. परंतु, यातील फक्त १० ते २०% लोकांना या आजाराबद्दल पुरेशी माहिती असल्याचं समोर येतं आहे.

हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग कसा होतो?

दुषित अन्नपदार्थांचे सेवन आणि अस्वच्छ पाणी पिण्यामुळे लोकांना हेपेटायटीस ए आणि हेपेटायटीस ई संसर्ग होतो. या आजारात पोटात दुखणं, मळमळ, उलट्या, कावीळ, लघवी पिवळी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. हे दोन्ही संक्रमण अल्पकाळ टिकतात. साधारणतः एक ते दोन आठवड्यात रूग्ण बरा होतो. महत्त्वाचं म्हणजे, गर्भवती महिलांमध्ये हेपेटायटीस ई या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे या काळात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

हेपेटायटीस बी मध्ये काय फरक आहे?

हेपेटायटीस बी संसर्ग यकृतमध्ये बराच काळ राहून यकृताला नुकसान पोहोचवतो. यामुळे यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. विशेष म्हणजे, वीर्य, योनिमार्गातील द्रव आणि रक्तासारख्या शरीरातील द्रव्यांशी संपर्क आल्यास व्यक्तीला हेपेटायटीस बी व्हायरसची लागण होऊ शकते. याशिवाय प्रसूतिदरम्यान, रक्त संक्रमणातून, असुरक्षित लैंगिक संबंध आणि आईपासून नवजात बाळाला हा आजार होऊ शकतो. त्यामुळे जर एखाद्यास हा संसर्ग झाला असेल तर त्याने लगेचच यकृत तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.

इतर विषाणूंपेक्षा हेपेटायटीस सी घातक ठरतो का?

या आजारात हेपेटायटीस बी सारखीच लक्षणे असतात. परंतु, हा आजार अधिक काळ टिकून राहतो आणि हळुहळु यकृताला इजा करतो. यामुळे यकृताचा सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या आजारावर औषधोपचार उपलब्ध असून ही औषधे तीन ते सहा महिन्यांमध्ये घ्यावी लागतात. हेपेटायटीस सी आजाराची लक्षणे ओळखणे आणि यकृताचे नुकसान होण्यापूर्वी तातडीने निदान व उपचार करणे आवश्यक आहे.

या आजारापासून स्वतःचा बचाव कसा कराल?

  • पौष्टिक आहाराचे सेवन आणि शुद्ध पाणी प्यावे
  • शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी असल्याची खात्री करून घ्या
  • हेपेटायटीस ए या आजारावर लस उपलब्ध असून वयाच्या १ वर्षांनंतर ही लस कोणीही घेऊ शकतो
  • हेपेटायटीस बी आणि सीचा संसर्ग होऊ नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत
  • हेपेटायटीस बीसाठी लस उपलब्ध असून जन्मानंतर ती बाळाला द्यावी लागते.
  • काविळची लागण झाल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा
  • नियमित आरोग्य चाचणीत हेपेटायटीस बी आणि सी संसर्गाची लागण झालेली आहे का हेसुद्धा तपासून पहा

-डॉ. विभोर बोरकर
बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटॉलॉजिस्ट

Comments