Home > हेल्थ > "कुठेय कोरोना..?"

"कुठेय कोरोना..?"

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग महाराष्ट्रात वायू वेगाने सुरू झाल्यानंतर शासनाकडून लॉकडाऊनसारखे उपाय पडताळून पाहिले जात आहेत. लॉकडाऊनला विरोध करणारे देखील अनेक जण आहेत. कोरोना काळात जवळचे गेलेल्यानांच कोरोनाची दाहकता समजते, असं सांगत आपण नियम-शिस्त पाळूया आणि ते नसेलच होत तर मग लॉकडाऊनला तयार राहू या..! असे सांगताहेत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पोखरकर...

कुठेय कोरोना..?
X

मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे दोन अत्यंत जवळचे मित्र गमावले. स्नेही-आप्तेष्ट-परिचित यामधील तर तब्बल सहा लोकांना गमावलेय आणि यांमधील कोणीही वयाने साठीच्या पुढील वा गंभीर आजारी नव्हते. आपल्यापैकीही अनेकजण थोड्याफार फरकाने अशी आकडेवारी सांगू शकतील याची मला खात्री आहे. कोरोनाने कहरच तेवढा केलाय. प्रश्न असा आहे की आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात इतक्या उत्पातानंतरही आपण काय धडा घेतलाय ? दोन तीन महिन्यांच्या गॅपनंतर आज पुन्हा सर्व रुग्णालयांचे बेड भरलेत. अनेक ठिकाणी तर रुग्णांना जमिनीवर ठेवून इलाज सुरु आहे. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची लक्षणे दिसू लागलीत. रुग्ण मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय आणि या सगळ्या भीषणतेकडे डोळेझाक करून अजूनही अनेक लोक "कुठेय कोरोना..?" असं कसं म्हणू शकतात तेच मला कळत नाही.

काही राज्यांमध्ये टेस्टच अपुऱ्या संख्येने केल्या जाताहेत. रिपोर्ट दडपले जाताहेत, मृत्यूंची संख्या कमी दाखवली जातेय. तर काही राज्यांमध्ये नैसर्गिकरित्या प्रसार मर्यादित आहे. पण म्हणून तिकडे बोट दाखवून "..मग तिकडे का नाही कोरोना ?' असे प्रश्न उपस्थित करणे शहाणपणाचे नाही. तिकडेही भडका उडू शकतो आणि परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते किंवा सध्या दडपले जाणारे वास्तव नंतर समोर येऊ शकते. मग तेव्हा आपण शहाणे बनणार काय ? पांडे म्हणून माझा मित्र आहे युपीच्या गोरखपूरचा. नुकतीच मुंबईतून तिकडे पोहचलेली त्याच्या घरातील काही ज्येष्ठ माणसे सध्या कोरोना संसर्गित आहेत अशी त्याला शंका आहे. गेले दोन दिवस टेस्टसाठी तो तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागे लागलाय. परंतु ते ढिम्म आहेत ! तिकडे मृत्यू होत नाहीत असे नाही.दडपले जाताहेत. फैलाव निसर्गतःच मर्यादित आहे. पण प्रश्न असा आहे की आपण आपल्या आजूबाजूचे भीषण वास्तव पाहायचे सोडून तिकडे युपी,बिहारकडे,बंगालकडे का पाहायचे ?

त्या राम कदमकडे दिवंगत प्रमोद महाजनांचा अनधिकृत पैसा खच्चून पडलाय. त्या प्रवीण दरेकरकडे मुंबई बँकेचा ओरपलेला पैसा खच्चून पडलाय. मागील सत्ताकाळात तमाम भाजप नेते मालामाल झालेत. यांच्यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली तर उपचारासाठी पाण्यासारखा पैसा ते खर्च करू शकतात. प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा आहे. ट्रेन सुरु करा,मंदिरं उघडा,मॉल उघडा..जिथे जिथे गर्दी होते त्या सगळ्या बाबी उघडण्याची मागणी यांचीच..काहीही तारतम्य नसलेली आणि आता रुग्णसंख्या वाढल्यावरही पुन्हा हेच लोक बोंबा ठोकताहेत !

आपण मास्क वापरणार नाही, सुरक्षित अंतराचे नियम पाळणार नाही, सॅनिटायझरचा आवश्यक तिथे वापर करणार नाही, कोणतीच शिस्त पाळणार नाही आणि मग या सगळ्यामुळे द्रुतगतीने रुग्णसंख्या वाढत असताना आपल्याला लॉकडाऊनही नकोय ! मग अशा लोकांनी कोरोना नियंत्रणासाठी किमान काही जादूचे प्रकार किंवा चमत्कार तरी शोधून सरकारच्या हवाली करावेत ! विकसित आणि सुधारित-प्रगत युरोपीय व अन्य खंडातील देशांनाही अखेर लॉकडाऊनचा मार्ग पुन्हा पुन्हा अनुसरावा लागतोय ,तो का ?

एकतर इकडे तिकडे बोट दाखवण्याऐवजी आपण नियम-शिस्त पाळू या आणि ते नसेलच होत तर मग लॉकडाऊनला तयार राहू या..!

रवींद्र पोखरकर

[email protected]

Updated : 2021-03-29T10:24:39+05:30
Next Story
Share it
Top