Home > हेल्थ > कॅन्सर आणि आहार काय आहे नातं?

कॅन्सर आणि आहार काय आहे नातं?

जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून पाळला केला जातो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कॅन्सर हा महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला 25 लाख कॅन्सर पीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कॅन्सरची दरवर्षी मोठी वाढ होत आहे.आजारावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे याविषयी जागरूकता .. कॅन्सर आणि आहार याविषयी मार्गदर्शन केलं आहे बॉम्बे हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ज्ञ व रेडीओथेरेपी विभाग प्रमुख, डॉ. दिलीप निकम ....

कॅन्सर आणि आहार काय आहे नातं?
X

आरोग्य आणि शारीरिक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नाची तजवीज करणे किंवा गरज भागविणे म्हणजेच न्यूट्रीशन (Nutrition ). सकस आहार शरीराच्या वाढीसाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो. सकस आहार न मिळाल्यामुळे कुपोषण होवून लहान मूले मृत झाल्याच्या घटना आपण नेहमी वर्तमान पत्रातून वाचत असतो. शरीरातील पेशीच्या वाढीसाठी लागणारी उर्जा, मेद, प्रथिने, क्षार इत्यादी गोष्टी अन्नामधून पुरविल्या जातात. कॅन्सर आणि आहार यामध्ये शास्त्रीय दृष्टीकोनातून तपासणी केली असता असे लक्षात येते की, काही अन्नपदार्थ कॅन्सर जन्य आहेत तसेच कॅन्सर रुग्णांमध्ये वजन कमी होणे, भूक कमी लागणे इत्यादी गोष्टींमुळे उपचारावर परिणाम होतो.

कॅन्सर जन्य पदार्थ कुठले आहेत?

थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३५ टक्के कॅन्सर आहाराशी निगडीत असून आहारामध्ये बदल केल्यास तेव्हड्या प्रमाणात कॅन्सर कमी करता येवू शकतो.

आहार आणि लट्ठपणा:

असंतुलित आहार, जंक फूड, खाण्याच्या वेळा न पाळणे आणि व्यायाम न करणे इत्यादी कारणांमुळे वजन वाढायला लागून लट्ठपणा वाढतो. लट्ठपणा वाढला की, इच्छा असली तरी व्यायाम करता येत नाही. मग हे दुष्टचक्र सुरु होते, ज्यातून बाहेर पडता येत नाही. मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांमध्ये १०किलो पेक्षा जास्त वजन वाढल्यास शरीरातील estrogen मध्ये वाढ होते. त्यामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा (endome-trium ) कॅन्सर चे प्रमाण वाढते. लट्ठपणामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा (endome-trium ), सर्वायकल (cervical ), स्वादुपिंड व पित्ताशय इत्यादी कॅन्सर होतात.

मेद / चरबी

शरीराला लागणाऱ्या कॅलरीज् या कार्बोहायड्रेट्स, मेद व प्रथिने यापासून मिळतात. मेद किंवा चरबीतून मिळणाऱ्या कॅलरीज् चे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असले पाहिजे. आहारात चरबीचे प्रमाण जास्त, तेही प्राण्यांच्या चरबीचे असेल तर स्तन, कोलोन, प्रोस्टेट व गर्भाशयाच्या (endometrium ) कॅन्सर चे प्रमाण वाढते.

मांसाहार विरुद्ध शाकाहार

शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा ८ टक्के कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आहार केंव्हाही उत्तम.

पश्चिमात्य आहार विरुद्ध भारतीय आहार

पश्चिमात्य आहारामध्ये चरबीयुक्त अन्न मांस, मटण, अंडी,डेअरी प्रोडक्ट चीज, बटर, तसेच स्वीट्स, चॉकलेट इत्यादी रिफायनरी कार्बोहायड्रेट्स् चे प्रमाण खूप असते. त्यामुळे कॅन्सरचे त्यातल्या त्यात अन्न नलीकेच्या कॅन्सर चे प्रमाण जास्त आहे.

भारतीय आहारमध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे, पोल्ट्री चिकन इत्यादी गोष्टी असतात. त्यामुळे कॅन्सर चे प्रमाण कमी आहे.

कॅन्सरचा रुग्ण पहिल्यांदा डॉक्टर कडे तपासणीस येतो, तेव्हा ४० टक्के रुग्णांमध्ये वजन कमी झाल्याचे आढळते. रोगाची व्याप्ती जशी वाढेल तसे ते प्रमाण ८० टक्क्यापर्यंत जाते. एकूण वजनाच्या १० टक्के वजन कमी झाले असेल किंवा महिन्याला अडीच ते तीन टक्के वजन कमी होत असेल, तर उपचाराच्या दृष्टीने काळजी करण्यसारखी गोष्ट आहे. वजन कमी होणे हे फक्त उपचारासाठी त्रास दायक नसून त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा येतो, चिडचिड, एकलकोंडेपणा वाढतो या सर्वांचा परिणाम म्हणून जीवन नकोसे वाटते.

कॅन्सर मध्ये वजन कमी होण्याची काय करणे आहेत?

भूक न लागणे, पौष्टिक अन्न न खाणे, अन्ननलिकेत बिघाड होणे, शरीरातील संतुलन बिघडणे, उपचाराचे दुष्परिणाम- जसे चव बदलणे, उलटी होणे, मळमळणे, तसेच मानसिक संतुलन ढळून जेवण न करणे इत्यादी कारणांमुळे वजन कमी होते. कॅन्सर पेशींकडून काही पदार्थ तयार होतात. या सर्वांचा परिणाम म्हणून देखील वजन कमी होते.

कॅन्सर झाल्या नंतरचा आहार

अरे काही होत नाही रे... झाला तर पाहूया... या आपल्या भारतीय मानसिकतेनेच आपले जास्त नुकसान केले आहे. पौष्टिक आहार घ्यावा, दररोज फिरायला जावे असे कितीही डॉक्टरांनी सांगितले तरीही कोणी मनावर घेत नाही. एखादा डॉक्टर फारच मागे लागला तर आपण डॉक्टर बदलू पण स्वत:ला नाही बदलणार. परंतु एकदा का कॅन्सर झाला की, मग रुग्ण काहीही करायला तयार होतात, डॉक्टर सांगेल ते पथ्य पाळतात. या सर्व मानसिकतेचा विचार करून कॅन्सरचे उपचार चालू असताना आहारामध्ये बदल करून कॅन्सर पूर्ण पणे बरा करता येवू शकतो का? या प्रश्नाची उकल करण्याकरिता बऱ्याच पश्चिमात्य देशांनी संशोधन केले असून त्याचे उत्तर दुर्दैवाने नाही, असे आहे.

आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की पडेल की, पौष्टिक आहाराची गरज नाही का? इथे अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही. पौष्टिक आहार कॅन्सर उपचाराचा अविभाज्य घटक आहे. शत्रक्रिया, किमोथेरपी, रेडीओथेरेपी उपचार शरीरास हानिकारक असतात. त्यामुळे उपचारादरम्यान पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

काय पथ्य पाळावे?

बऱ्याच रुग्णांची तक्रार असते की, उलटी होणार असल्यासारखे वाटते, भूक लागत नाही, पोट भरल्या सारखे वाटते. मी माझ्या रुग्णांना नेहमी एकच पथ्य सांगतो. ते म्हणजे "भरपूर जेवण घ्या, तळलेले तेलकट, तिखट पदार्थ्य वर्ज्य करा. आपल्याकडे बऱ्याच रुग्णांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा जेवण्याची सवय असते. ती उपचारादरम्यान थोडीशी बदलून दर दोन तीन तासांनी छोटी छोटी जेवणे घेतल्यास रुग्णांना फायदा होतो".

अहो डॉक्टर आम्ही नेहमी जेवणासाठी मागे लागतो. पण हा / ही जेवत नाही, अशी नातेवाईकांची प्रेमळ तक्रार असते. ते खरेही आहे परंतु, आपण रुग्णाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा रुग्णांची इच्छा असून देखील त्रास होत असल्याने त्यांना खाता येत नाही. अशा वेळी रुग्ण आणि नातेवाईक या दोघांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असते. माझा नातेवाईकांना इतकाच सल्ला आहे की, रुग्ण म्हणजे लहान मुल समजावे व त्याच्या कलाने घ्यावे.

किमोथेरपीचे उपचार घेताना आहार बदलावर विषेश लक्ष द्यावे व उपचाराच्या सुरुवातीलाच आपल्या डॉक्टरशी बोलून काही पथ्ये असल्यास विचारून घ्यावीत. किमोथेरपीच्या काही औषधांसोबत विशिष्ट आहार चालत नाहीत.

रेडीओथेरेपी चे उपचार घेताना काही विषेश पथ्याची गरज नसते. भरपूर जेवण घ्यावे. तळलेले तेलकट, तिखट पदार्थ्य वर्ज्य करावे. प्रमाणापेक्षा थंड किंवा गरम खावू नये.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहार तज्ञाकडून आहाराचे वेळापत्रक बनवून घ्यावे व त्याचे पालन करावे. उपचारादरम्यान बऱ्याच रुग्णांना नाकातून किंवा पोटातून नळी टाकलेली असते. अशा वेळी मिक्सर मध्ये अन्न बारीक करून दोन अडीच लिटर दिवसाला रुग्णास द्यावे.

वजन वाढविण्यासाठी काय उपचार करावे?

कॅन्सरचे उपचार सुरु करण्यापूर्वी आहाराचे महत्व रुग्णांनी व नातेवाईकांनी समजून घेणे फार गरजेचे आहे. वजन कमी होण्याचे नेमके कारण माहित झाल्यास त्याप्रमाणे उपचार करता येवू शकतात. उपचारादरम्यान पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

काय खावे?

आहारमध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे इत्यादी गोष्टी खाण्यास प्राधान्य द्यावे. या मध्ये कॅन्सरजन्य गोष्टींवर मात करणारे अॅटी ऑक्सिडन्टस्, मिनरल्स, फायबर, पोटॅशियम, कॅरोटिन, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे कॅन्सर चे प्रमाण कमी असते.

डॉ. दिलीप निकम

कॅन्सर तज्ज्ञ व रेडीओथेरेपी विभाग प्रमुख,

बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

www.drdilipnikam.com



Updated : 4 Feb 2021 4:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top