Home > हेल्थ > थायरॉइड (Thyroid) कॅन्सर

थायरॉइड (Thyroid) कॅन्सर

थायरॉइड (Thyroid) कॅन्सर
X

थायरॉइड ग्रंथी घश्याच्या खाली, श्वासननलिकेच्या तसेच अन्ननलीकेच्या समोर व गळ्याच्या खालच्या भागात असते. अन्न गिळताना थायरॉइड ग्रंथी वर-खाली होताना आपण पाहू शकतो. थायरॉइड ग्रंथीचे डावा व उजवा असे दोन भाग (लोब) असतात. ते एकमेकांना इस्थमसने जोडलेले असतात. दोन्ही लोबच्या वरच्या भागात पॅरा-थायरॉइड ग्रंथी आढळतात. ज्या पॅरा-थायराइड हार्मोन्स बनवतात. थायरॉइड ग्रंथीमध्ये प्रामुख्याने फॉलीकुलर (Folicular) पेशी असतात. ज्या आयोडीन असणारी हार्मोन्स T३ व T४ बनवण्याचे कार्य करतात. (या कार्यासाठी लागणारे आयोडीन रक्तामधून शोषून घेऊन ते पेशीमध्ये साठविले जाते), तसेच कमी प्रमाणात पॅरा-फॉलीकुलार (Para-Folicular) पेशी देखील असतात. ज्या कॅलसिटोनीन हार्मोन्स बनवतात. थायरॉइड T३ व T४ हार्मोन्स पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त असून ती मेटाबोलिक रेटवर नियंत्रण करतात. तर कॅलसिटोनीन हार्मोन्स रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण नियंत्रित करतात.

जगामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण थायरॉइड कॅन्सरने पिडीत असून दर वर्षी साधारणपणे तीन लाख नवीन रुग्णांची त्यात भर पडते. तसेच ४० हजार रुग्ण या रोगाने दरवर्षी दगावतात. भारतामध्ये ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण थायरॉइड कॅन्सरने पिडीत असून दर वर्षी साधारणपणे १५ हजार नवीन रुग्णांची भर पडते. या रोगाचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा तीन पटीने जास्त आढळते. तसेच दिवसेंदिवस याचे प्रमाण भारतात देखील वाढत आहे.

थायरॉइड कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

बहुतांशी या रोगाची करणे अनभिज्ञ असून हा रोग स्त्रियांमध्ये, ४० वर्षानंतर उदभवतो. रेडीएशन एक्स्पोजर झाले असल्यास थायरॉइड कॅन्सरचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ जपान येथील फुकूशिमा शहरात न्यूक्लियर अॅक्सीडेन्ट झाल्यानंतर तेथे थायरॉइड कॅन्सरचे प्रमाण वाढले. भविष्यात न्यूक्लियर अॅक्सीडेन्ट किंवा अणुबॉम्ब हल्ला झाल्यास पोटॅशियम आयोडाईड घेतल्यास थायरॉइड कॅन्सरपासून संरक्षण होऊ शकते. परंतु त्या हल्ल्यातून आपण जिवंत रहायला मात्र हवे.

थायरॉइड कॅन्सरची लक्षणे व तपासणी :-

मानेला सूज / गाठ येणे

आवाज बदलणे

अन्न गिळता न येणे / दुखणे

घश्यात दुखणे

श्वास घेण्यास त्रास होणे

खोकला येणे

वजन कमी होणे

(वयाची ८० वर्षे होईपर्यंत, एकूण लोकसंखेच्या ७५ टक्के लोकांमध्ये थायरॉइडची किमान एखादी तरी गाठ येते. मात्र, त्यातील केवळ १ टक्केच गाठी कॅन्सरच्या असू शकतात, उरलेल्या ९९ टक्के थायरॉइडच्या गाठी साध्याच असतात. त्यामुळे सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये थायरॉइडला गाठ असल्यास लगेच कॅन्सर झाला म्हणून काळजी करू नये. तसेच त्याच्याकडे दुर्लक्षही न करता तज्ञ डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.)

तपासणी :- रक्त तपासणी, T३, T४ व TSH हार्मोन्स, (आवशक्यता असल्यास PTH, clacitonin) इत्यादी तपासण्या कराव्यात, छातीचा एक्सरे, गळ्याची सोनोग्राफी किंवा सी. टी. स्कॅन करावा. एफ. एन. ए. सी करून खरोखरीच कॅन्सर असल्याची खात्री करावी.

थायरॉइड कॅन्सरचे उपचार कसे करावे?

थायरॉइड कॅन्सर उपचारांती बरे होण्याचे प्रमाण अतिशय चांगले असून ते प्रामुख्याने हिस्टोपथोलोजी रिपोर्ट, थायरॉइड कॅन्सरचा प्रकार, रोगाचे आकारमान, रोगाची स्टेज, रुग्णाचे वय, स्त्री/पुरुष भेद व शस्त्रक्रिया केल्यानंतर रोग पूर्ण काढला की नाही इत्यादी गोष्टींवरती अवलंबून असतो.

थायरॉइड कॅन्सरचे प्रकार व प्रमाण :

पॅपीलरी कार्सिनोमा (Papillary carcinoma)- ८०%

फॉलीकुलर कार्सिनोमा (Folicular carcinoma)- १५%

अनाप्लास्टिक कार्सिनोमा (Anaplastic carcinoma)- ०२%

मेडूलरी कार्सिनोमा (Medullary carcinoma)- ०३%

शस्त्रक्रिया :

शस्त्रक्रिया ही मुख्य उपचार पध्दती असून शक्यतो संपूर्ण थायरॉइड ग्रंथी तसेच सोबत आजूबाजूच्या गळ्यातील लिम्फ नोडच्या गाठी काढल्या जातात. जर पॅपालरी कार्सिनोमा किंवा फॉलीकुलर कार्सिनोमा प्रकारचा रोग असल्यास व रुग्णाचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असल्यास रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके प्रचंड आहे. मात्र, अनाप्लास्टिक कार्सिनोमा व मेडूलरी कार्सिनोमा हे अॅग्रेसिव रोग असून उपचारांती रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण कमी आहे.

रेडीओ-आयोडीन थेरपीचे उपचार :

काही अपवाद वगळता जवळपास सर्वच पॅपीलरी कार्सिनोमा किंवा फॉलीकुलर कार्सिनोमा रुग्णांना रेडीओ-आयोडीन थेरपी उपचारांची गरज असते. तसे पहिले तर हा टार्गेट थेरपीचा प्रकार आहे. याचे कारण शरीरात केवळ थायरॉइड ग्रंथीमधील पेशीच आयोडीन घेऊ शकतात. इतर कुठल्याही दुसऱ्या पेशी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे उपचाराकरिता नॉर्मल आयोडीन न वापरता रेडीओ थायरॉइड अॅक्टीव आयोडीन रुग्णास दिला जातो. शस्त्रक्रियेनंतर शरीरात काही थायरॉइड पेशी असल्यास केवळ त्याच पेशी रेडीओ-आयोडीन घेतात आणि त्यातून निघणाऱ्या रेडीएशनमुळे केवळ कॅन्सर पेशी नष्ट केली जाते आणि इतर नार्मल पेशींना कुठलीही इजा होत नाही. मात्र फार कमी ठिकाणी या रेडीओ-आयोडीन थेरपीचे उपचारांची सोय उपलब्द आहे. त्यातील एक टाटा रुग्णालय होय. शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे एक ते दीड महिन्यांनी रुग्णास रेडीओ-आयोडीन थेरपीच्या उपचारासाठी पाठवावे.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे पुनर्वसन :

पेशींच्या वाढीसाठी थायरॉइड T३ व T४ हार्मोन्स उपयुक्त असून मानवास जिवंत राहण्यासाठी अत्यावशक असतात. शस्त्रक्रिया करून संपूर्ण थायरॉइड ग्रंथी काढल्यानंतर शरीरात थायराइड T३ व T४ हार्मोन्स बनवली जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर बाहेरून गोळ्यांच्या स्वरुपात घ्यावी लागतात. उपचारानंतर सर्व कॅन्सर रुग्णांना इंडोक्रायनोलोजीस्टकडे होर्मोन्स उपचारासाठी पाठवावे.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 22 Jun 2017 6:50 PM GMT
Next Story
Share it
Top