Home > हेल्थ > सोचके देखो फिर करके देखो

सोचके देखो फिर करके देखो

सोचके देखो फिर करके देखो
X

करके देखो या मथळ्याची डॉ. जगन्नाथ दिक्षित यांची एक पोस्ट अनेकांनी मला पाठवली. यांत डॉ. दीक्षित यांनी प्रचंड लोकप्रिय केलेल्या, ‘दोनच वेळा खाणे’ या जीवनशैलीवर आलेल्या अनेक प्रतिक्रिया आहेत. त्यात क्र. चारचा मुद्दा माझ्या लोकप्रभामधील ‘‘तुम्हाला काय व्हायचयं, कैफ, धोनी की पठाण...’’ या लेखाशी संबंधीत आहे, म्हणून मी हे लिहायला घेतले. तो लेख दोन आठवड्यापूर्वी लोकसत्तामध्ये छापून आला होता. माझा लेख वाचून दिक्षितांनी मला ‘‘डॉक्टर तुम्ही तीन महिने तरी प्रयोग करून पहा,’’ असा मेसेज पाठवला. मात्र तीन महिने होण्याच्या आतच त्यांचा काल एक लेख व्हॉटसअपवर आला. त्यात त्यांनी मी कोणतेही उत्तरच दिले नाही असे लिहीले आहे. तीन महिने प्रयोग न करताच मी कसे उत्तर देणार होतो? मला कळत नाही...!

दोन वेळा खायचे की अनेक वेळा असा माझ्या लेखाचा मुद्दाच नव्हता. दोन वेळा खाणे हे रोजच्या दैनंदिन कामकाजात कठीण होते असे अनेकांनी मला सांगितले त्यावर मी माझे मुद्दे मांडले होते.

अनेक वेळा खाऊ नये हे माझे पहिल्यापासूनचे मत आहे. पाच सहा वर्षांपूर्वी मी ‘‘खाण्याची खिडकी’’ असा एक लेख लोकमत मध्ये लिहिला होता. त्यावेळी तुम्ही फोन करून, तो लेख कसा पटला, आपली मते कशी जुळतात हे सांगितले होते. "व्हॉटसअप ग्रूप बनवून या कमी वेळा खाण्याचा प्रचार मी करत आहे, तसेच डायबेटीस आणि स्थूलता टाळण्यासाठी मी काम करत आहे पण मी कोणत्याही पेशंटला ट्रीटमेंट करत नाही, त्यामुळे कोणी मधुमेह झालेली व्यक्ती ठाण्याच्या आसपास असेल तर तिला तुम्ही मॉनिटर कराल का?" असेही मला त्यावेळी डॉ. दिक्षीत म्हणाले होते.

आपल्या दोघांमधील हे संभाषण आपल्याला आठवत असेल. तुमचे काही शोधिनबंध तेव्हाच प्रसिध्द झाले होते. तेव्हापासून आपल्या दोघांचे विचार बऱ्याच अंशी जुळतात हे मी येथे स्पष्टपणे नमूद करतो.

किती वेळा खावे यासंबंधी आपल्या दोघांच्या मांडणीत वेगळेपणा आहे. तुम्ही दोन वेळा खा असे सांगता. मी नाष्टा, व दोन वेळा जेवा असे सांगतो. या तीनही खाण्याच्या वेळांमध्ये किमान ६ तासांचे अंतर असावे व त्या वेळा निश्चित असाव्यात, ज्यामुळे खाण्याची एक लय तयार होते, अशी मी सांगितलेली पध्दती आहे.

मी रोज डायबेटीस आणि ओबेसिटीचे अनेक रुग्ण तपासतो व त्यांना ट्रीटमेंटही देतो. अनेक पेशंटना तपासताना दिसून आले आहे की दिवसांतून फक्त दोन वेळा खाऊन जे काही फायदे होतात तेच फायदे ब्रेकफास्ट व दोन वेळा जेवणाने होतात. तीन वेळा खाणे हे बहुतेकांना सोपे जाते, अनेक वर्ष या पध्दतीने रहाता येऊ शकते. ब्रेकफास्ट आणि दोन जेवण या पूर्वापार चालत आलेल्या जीवनशैलीशी हे मिळते जुळते आहे, यात दोनच वेळा खाण्याच्या फायद्यांसोबत होणारे तोटे ही पहायला हवेत. तेव्हा दोन ऐवजी तीन हा पर्याय हवा असे माझे मत आहे. मी हा निष्कर्ष अनेक वर्ष पेशंटना पर्सनली तपासून त्यांच्यावर उपचार करुन काढलेला आहे.

दोनदाच खाउन खूप अ‍ॅसिडटी झाली, उलट्या झाल्या वगैरे तक्रारींचा सामना करावा लागत नाही. म्हणून मेडिकल प्रॅक्टिस मधले जे सर्वात प्रमुख तत्व आहे ते म्हणजे ‘‘प्रायमम नॉन नॉसिएर कॉज नो हार्म’’ (‘जे काही कराल त्यातून पेशंटचा त्रास वाढू नये’ असा त्याचा अर्थ आहे. आता जे काही करता ते तात्कालिक चांगले वाटेल पण भविष्यात त्याचा त्रास रुग्णांवर होऊ नये असा या विधानाचा दुसरा अर्थ आहे.)

हे तत्व क्लिनिकमधे बसून पाळावेच लागते. तुम्ही लोकांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करत आहात. मी फायदा देताना कमीत कमी त्रास कसा होईल हे पहात आहे. तुम्ही विनामूल्य सल्ला देता, त्यामुळे फायदा झालेले लोक आपल्या अभियानाशी जोडले जात आहेत. पण ज्यांचा फायदा होत नाही किंवा त्रास होतो ते कुठच्या तोंडाने सांगायला येणार?

पुन्हा सांगतो की तुमची थियरी उत्कृष्ट आहे पण सातत्याने करत रहायला कठीण आहे. यात नको त्या गोष्टी घडण्याची शक्यता जास्त आहे. दोनच वेळा खाणे थांबवले तर ‘‘रिबाउंड इफेक्ट’’ येतात हे ही लक्षात घ्यायला हवे.

आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा

एकीकडे आपण आयुर्वेदिक डॉक्टरांना म्हणता की ‘‘माझ्यासारख्या आधूनिक वैद्यक शास्त्रातील डॉक्टरने तुमच्या थिअरीवर विश्वास ठेवावा’’ तुमचा हा हट्ट अनाठायी वाटतो. त्या पुढे जाऊन तुम्ही लिहिता की, ‘‘हा लढा आहे. आम्हाला काहीही विकायचे नाही, विचार करुन कोणाचे वजन कमी झाल्याचे ऐकिवात नाही, तर्क आणि बुध्दी इतकाच अनुभवही महत्वाचा आहे. सारांश रुपाने सांगायचे तर हा लढा स्वत:चे आरोग्य स्वत:च्या ताब्यात ठेवू पाहणाऱ्या सर्वसामान्य लोक तसेच त्यांना मदत करु पाहणारे डॉक्टर्स विरुध्द कायम लोकांना स्वत:वर अवलंबून ठेवू पाहणाऱ्या तज्ञ तसेच आरोग्याविषयी उदासिन अशा लोकांमधील आहे.’’ या तुमच्या विधानाचे अनेक गंभीर अर्थ निघतात. पेशंट कायम डॉक्टरांवर अवलंबून रहावेत असा थेट आरोप आपण केलेला आहे. रुग्णांना व्यक्तीगत तपासून तुम्ही औषधोपचार करता म्हणजे आणि त्याचे पैसे घेता म्हणजे तुम्ही स्वार्थी, त्यातून तुम्ही लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवायला लावता असा त्याचा अर्थ होतो. हा सरळ सरळ तमाम डॉक्टरांवर केलेला हेत्वारोप आहे. मोफत सल्ला दिला की जबाबदारीतून सुटका सहज होते पण रुग्णांना प्रत्यक्ष तपासून उपाचार करण्याचे पैसे घेतले की त्याची जबाबदारीही घ्यावी लागते हे मी नव्याने सांगायची गरज नाही.

तुम्ही जे चार पॅरामीटर्स दिले आहेत त्यातील (फक्त एकच उदाहरण म्हणून सांगतो) एचबीएवनसी मधील घट हा साखरेच्या व्हॅल्यू खूप वर जाऊन खूप खाली आल्या तरी होऊ शकते. जसे एकदाच काहीही व कितीही खाल्ले आणि नंतर १२ तास उपास घडला तरी हे होऊ शकते. तसेच फास्टिंग इन्सुिलन कमी होणे हे इन्सुिलन संपत चालल्याचे पण लक्षण असू शकते. अत्यल्प फास्टिंग इन्सुलिन असताना सिविअर इन्सुलिन रेसिस्टन्स असू शकतो, अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात. सरसकटपणे सगळ्यांना एकच जीवनपद्धती लागू होऊ शकत नाही. तुम्ही डॉक्टर असल्यामुळे मी हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

आता इतर काही आक्षेपांवरील आपल्या प्रतिक्रिया बद्दल -

डॉक्टरांना न्यूट्रिशन हा विषय पूर्णपणे माहिती असतो असे आपल्या लेखात आहे. मात्र चार ते पाच वर्षे जे काही शिकले जाते त्यात न्यूट्रिशन हा विषय नगण्य असतो. आम्हीच मान्य करत आहोत. तुमचे स्वत:चे उदाहरण घ्या ना, जिचकरांचे विचार ऐकण्याआधी आणि ऐकून झाल्यानंतर आहाराच्या बाबतीत आपले ज्ञान आणि दृिष्टकोण किती बदलला ते ही तुम्हीच नमूद केले आहे. तुम्ही एक वेगळा, फायदेशीर रिसर्चबेस्ड प्रोग्रॅम दिला आहे. बाकी जाउदे. अनेकांचे, जाता येता काहीतरी चिटुकमिटुक खाणे आपल्यामुळे पूर्ण बंद झाले आहे. हे ही आपलेच यश आहे. दर दोन तासाने चरत राहण्याच्या व्यसनांतून आपण लोकांना बाहेर काढले आहे हे फार मोठे सामाजिक काम आहे. अभियान, लोक जुळत जाणे वगैरे जरा रामदेव स्टाईल वाटू लागले आहे. ते असो. आपल्या कामात शुभेच्छा देऊन नव्हे तर खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. फक्त तुमच्या लेखातील त्या पोस्टचा उल्लेख डॉ. नितीन पाटणकरांची पोस्ट असता तर ते न्यायोचित वाटले असते. माझेही नाव तुमच्या ३७ देश, ४०,००० अभियानशी जुळलेले लोक आणि लाखो फॉलोअर्सपर्यंत आपोआप गेले असते. नाहीतर एवढी प्रचंड पब्लिसटी माझ्या सारख्या रोज पेशंटना व्यक्तीगत तपासून त्यांच्याकडून फी घेणाऱ्यास कुठून मिळणार?

डाॅ. नितीन पाटणकर

एम्. डी. (इंटरनल मेडिसीन ॲंड थेरप्यूटिक्स)

Updated : 26 Sep 2018 11:02 AM GMT
Next Story
Share it
Top