Home > हेल्थ > ओव्हरी (Ovary) कॅन्सर

ओव्हरी (Ovary) कॅन्सर

ओव्हरी (Ovary) कॅन्सर
X

महिलामध्ये प्रजननासाठी आवश्यक बीजे अंडाशयामध्ये (ovary) बनवली जातात. महिलांच्या शरीरात दोन अंडाशय असून ती गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला असतात. अंडाशयाच्या आतमध्ये बीजे बनवणाऱ्या पेशी (germ cell) तसेच त्यांना अवशक्तेनुसार पुरवठा करणाऱ्या पेशीं (sex cord- stromal cell) असतात. अंडाशायाला बाहेरून एपिथेलीयाल (epithelial cell) पेशींचे आवरण असते. या सर्व गोष्टी यासाठी उलगडून सांगत आहे कारण वर सांगितलेल्या तिन्ही पेशीपासून ओव्हरीचा कॅन्सर होऊ शकतो. आजच्या लेखात आपण एपिथेलीयल (epithelial cell) पेशीं पासून उदभवणाऱ्या कॅन्सर बद्दल माहिती घेऊ. एपिथेलीयल ओव्हरी कॅन्सर (epithelial ovarian cancer): दरवर्षी जगामध्ये अडीच लाख रुग्णांची नोंद होते तसेच जवळपास दिड लाख रुग्ण ओव्हरीयन कॅन्सर मुळे मृत होतात, हेच प्रमाण भारतामध्ये अनुक्रमे ३० हजार व २० हजार आहे. वरील आकडेवारी पाहता भारतामध्ये मृत्यूचे चे प्रमाण अधिक आहे आणि याचे मुख्य कारण रोग नंतरच्या टप्प्यात माहिती पडणे हे होय. मागील काही वर्षांचा विचार केल्यास प्रगत देशामध्ये (अमेरिका/ युरोप) ओव्हरीयन कॅन्सर रुग्णांचे आयुष्यमान वाढल्याचे आढळते त्याचे मुख्य श्रेय रोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माहिती पडणे, शत्रक्रियेमध्ये झालेल्या सुधारणा व नवीन नवीन किमोथेरपीची औषधे यांना जाते. साधारणपणे एपिथेलीयल ओव्हरी कॅन्सर हासाठी ओलांडल्यानंतर उद्भवणारा आजार आहे. ८० टक्के रोग स्त्रियामध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो.

एपिथेलीयल ओव्हरी कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

वाढते वय, मासिक पाळी लवकर सुरु होणे किंवा फार उशिरा बंद होणे, मुल नसणे तसेच बदलत्या राहणीमानमुळे जसे व्यायाम न करणे, मुल होऊ न देणे, लठ्ठपणा, डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि estrogen चे उपचार घेणे इत्यादी मुळे ओव्हरीयन कॅन्सरचे प्रमाण वाढते. मुल होऊ नये म्हणून प्रतिबंधक गोळ्या घेणे, नसबंधी करून घेणे, गर्भाशय काढणे, मुलाला दुध पाजणे (breast feeding )इत्यादी गोष्टी कॅन्सर ला दूर ठेवतात. साधारणपणे ५ते १०टक्के ओव्हरीयन कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो. परिवारात आई, मावशी, बहीण यापैकी कोणाला कॅन्सर असल्यास अनुवंशिकतेसाठी तपासण्या कराव्यात. BRCA १ आणि BRCA २ जनुकेय मुटेशन असल्यास ३० ते ७० टक्के व १० ते ३० टक्के अनुक्रमे ओव्हरीयन कॅन्सर आढळतात.

ओव्हरीयन कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

  • ओटी पोटात दुखणे
  • मासिक पाळीसारखा रक्तस्त्राव होणे
  • पोटात दुखणे
  • पोट सुमारणे व पोटात पाणी होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • पाठीत दुखणे
  • भूक न लागणे
  • वजन कमी होणे

( मासिक पाळीमध्ये अनियमितता किंवा पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांना दाखवून तपासण्या करणे गरजेचे असते. तसेच रक्तस्त्राव होतो किंवा सोनोग्राप मध्ये अंडाशायला गाठ दाखविली म्हणून आपल्याला कॅन्सर झाला असे लगेच मानू नये. कारण रक्तस्त्रावची बरीच करणे असू शकतात किंवा गाठ साधीही असू शकते.)

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, सी.टी. स्कॅन, व CA१२५ करावे. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही ते पाहण्यासाठी पोटातील पाणी कडून तपासावे किंवा तुकडा काढून तपास करावा.

ओव्हरीयन कॅन्सरचे उपचार कसे करावे?

ओव्हरीयन कॅन्सर साधारणपणे ६० ते ७० टक्के स्त्रियांमध्ये दुसऱ्या किवा तिसऱ्या टप्प्यामध्ये माहिती पडतो त्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होण्याचे प्रमाण कमी आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओथेरपी आणि हार्मोनल थेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती ओव्हरीयन कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात.

शस्त्रक्रिया (Debulking):

रोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया गरजेची असते. त्यामुळे शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शत्रक्रिया करून गर्भाशय, दोनी अंडाशय, ऑमेनटम व लिम्फ नोड तसेच कॅन्सरच्या सर्व पेशी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पॅथोलोजीस्ट कडे पाठवून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे इतर उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते. साधारणपणे शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला एक दीड आठवडा रुग्नालायत थांबावे लागते व एक ते दीड महिना टाके जुळून येण्यास अवधी दिला जातो.

केमोथेरपी:

केमोथेरपीचे उपचार दुसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या रोगसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर तीन आठवड्याने दिले जातात. शस्त्रक्रियाचे टाके भरून येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा अवधी देऊन जखम भरल्यास किमोथेरेपीचे उपचार सुरु करावे. किमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर तसेच रक्त पेशी, केस, अन्न नालीकेच्या पेशीना देखील अटकाव करते त्यामुळे रोग बरा होण्या बरोबर काही दुष्परिणाम देखील होतात. किमोथेरपीचे उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडाला छाले येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.

ओव्हरीयन कॅन्सर परत उदभवू शकतो त्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतर दर तीन ते चार महिन्यांनी रुग्णास तपासण्यासाठी बोलाविले जाते व गरज असल्यास सोनोग्राफी व CA १२५ ची तपासणी डॉक्टरांच्या सल्याने करावी. तसेच परत परत उदभवणाऱ्या रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या किमोथेरपीचे उपचार अथवा टार्गेटथेरपीचे उपचार केले जातात. हार्मोनल थेरपीचा आजपर्यंत म्हणावा तसा वापर केला गेलेला नाही परंतु आताशी तिचे महत्त्व लक्ष्यात येत आहे.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 20 April 2017 7:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top