Home > हेल्थ > तोंडाचा कॅन्सर

तोंडाचा कॅन्सर

तोंडाचा कॅन्सर
X

आजच्या लेखात आपण तोंडाच्या कॅन्सर बद्दल माहीती घेऊ या. तोंडामध्ये ( Oral Cavity) ओठ, गाल, जीभ, हिरड्या, अशा भागात विभाजन केले जाते. भारतीय पुरुषामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय जास्त असून त्यातल्या त्यात गालाच्या कॅन्सर चे प्रमाण जास्त आहे. साधारणपणे दर १०० पुरुष कॅन्सर रुग्णांमध्ये ११ रुग्ण तोंडाच्या कॅन्सरचे आढळतात तर हेच प्रमाण स्त्रियांमध्ये ४ रुग्ण असे आहे. तसंच जगामध्ये हेच प्रमाण ३ रुग्ण असे आहे. यावरून असे लक्षात येते की भारतीय पुरुषामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण चार पट जास्त आहे.

तोंडाचा कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

सध्या जगात सत्तर प्रकारच्या तंबाखूच्या वनस्पती अस्तित्वात आहेत. यापासून खैनी, मावा, गुटखा, सिगारेट, मशेरी असे प्रकार बनवले जातात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनं तंबाखूमधील १९ प्रकारच्या कॅर्सिनोजेंस शोधले आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कॅन्सरशी संबंध आहे. तोंडाच्या कॅन्सरच्या १० पैकी ८ रुग्णांमध्ये तंबाखू तथा तत्सम पदार्थ खाण्याच्या सवयी असतात. तंबाखू आणि मद्यपान दोन्ही सोबत घेतल्यास साधारणपणे १५ टक्क्यांनी कॅन्सरची शक्यता वाढते. काही अंशी HPV इन्फेक्शन देखील कॅन्सर करू शकते.

साधारणपणे तोंडाचा कॅन्सर पुरुषामध्ये चाळीस वर्षानंतर तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान किंवा दोन्ही करणाऱ्यांमध्ये उदभवणारा आजार आहे.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

  • तोंडात जखम होणे
  • जखम लवकर न भरणे
  • जखमेतून रक्त स्त्राव होणे
  • सूज/ गाठ येणे
  • मानेला गाठी येणे
  • दुखणे

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, व शक्य असल्यास एम. आर. आय / सी. टी. स्कॅन करावा. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही व तो किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी भूल देवून पाहून तसंच तुकडा काढून तपास करावा.

तोंडाच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?

तोंडाचा कॅन्सर साधारणपणे नंतरच्या टप्प्यामध्ये माहिती पडतो याच सर्वात मोठ कारण म्हणजे रुग्णांकडून दुर्लक्षित करणे. तोंडामध्ये जखम भरून येत नसेल तर लगेच तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. यामध्ये रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण कमी असून केवळ ५० टक्केच रुग्ण ५ वर्षापेक्षा जास्त जगू शकतात. त्यासाठी उपचार योग्य वेळी, योग्य ठिकाणीच आणि योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरकडे होणे गरजेचे असते.

तोंडाचा कॅन्सर नीट करण्यासाठी मुख्यतः शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, तसेच काही प्रमाणात केमोथेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती वापरल्या जातात. शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रीया करून मुख्या रोग तसेच मानेच्या गाठी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पाथोलोजी कडे पाठवणे गरजेचे असून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे रेडीओथेरपी/ किमोथेरपी उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते. शस्त्रक्रिया केल्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होऊ शकतो परंतु प्लास्टिक शस्त्रक्रिया करून देखील चेहरा पूर्ववत करता येत नाही तसेच खाण्या पिण्याच्या सवयी मध्ये फरक पडू शकतो.

रोग सुरुवातीच्या टप्पात असल्यास रेडीओथेरपी उपचारांची गरज नसते. तिसरा टप्पा आणि पुढील टप्प्यात ई. बी. आर. टी रेडीओथेरपीची गरज लागते. आय. एम. आर. टी. उपचार पध्दती अधिक सोयीस्कर असून रेडीओथेरपीशी संबंधित दुष्परिणाम कमीत कमी ठेवता येतात. ते शक्य नसल्यास किंवा त्याची सोय उपलब्ध नसल्यास किमान ३डी- सी. आर. टी उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दीड महिन्यापर्यंत चालते तसेच रेडीओथेरपी दरम्यान तोंडाला छाले येणे, गिळताना त्रास होणे, थुंकी येणे, तोंड कोरडे पडणे, चव बदलणे, इत्यादी त्रास होतात. हे सर्व त्रास टाळण्यासाठी तोंडाची निगा राखणे गुळण्या करणे तसेच पौष्टिक अन्न घेणे गरजेचे असते.

केमोथेरपीचे उपचार तिसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या रोगसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने रेडीओथेरपी सोबत किंवा दरतीन आठवड्याने दिले जातात. तसंच परत परत उदभवणारया रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या किमोथेरपीचे उपचार तसेच टार्गेटथेरपी उपोयोगात आणली जाते.

या सर्व त्रासातून मुक्ती हवी असेल तर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे बंद करावे तसेच ४० वर्षे वयानंतर कॅन्सर स्क्रिनिंग करावी.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 16 March 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top