Home > हेल्थ > फुफ्फुसाचा (Lung) कॅन्सर

फुफ्फुसाचा (Lung) कॅन्सर

फुफ्फुसाचा (Lung) कॅन्सर
X

विधात्याने शरीराची रचना इतकी सुंदर केलेली आहे की समस्त वैज्ञानिक त्याची उकल करण्यात गुंतले असून जी माहिती बाहेर येत आहे त्यावरून आणखीनच आश्चर्यचकित होण्यास होते. बाहेरचा ऑक्सिजन शरीरात घेऊन रक्त शुद्धीकरण करण्याचे काम फुफ्फुस करते आणि इतक्या महत्वाच्या अवयवाला छाती आणि बरगड्या ने सुरक्षित केले आहे पण मानव जमात फुफ्फुसाला कधी विकासच्या नावाने तर कधी मॉडर्न असण्याच्या बहाण्याने इजा करण्यासाठी फार उतावीळ झाली आहे. जर विधात्याला फुफ्फुस आणि नाक सिगारेट/विडी चा धूर काढण्याचे यंत्र बनवायचे असते तर त्याने नाकाची रचना समोर तोंडाकडे ठेवण्या ऐवेजी कारखान्यामध्ये दिसणाऱ्या चिमणी सारखी डोक्यावर केली असती, असो आज आपण फुफुसाच्या कॅन्सरची माहिती घेऊया.

जगामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून साधारणपणे १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १३ रुग्ण फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत तसेच फुफुसाच्या कॅन्सर मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी ७० हजारपेक्षा जास्त रुग्णाची नोंद होते तर ६० हजारपेक्षा जास्त रुग्ण या रोगामुळे दगावतात. भारतीय पुरुषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरनंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरची संख्या जास्त आहे हेच प्रमाण स्त्रियांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

फुफुसाचा कॅन्सर होण्याची काय करणे आहेत?

स्मोकींग:

२० वे शतक सुरु होण्या पूर्वी फुफुसाच्या कॅन्सर चे प्रमाण केवळ ५ टक्के होते. तंबाखू व तत्सम पदार्थांच्या सेवनाच्या प्रमाणानुसार रोगाचे प्रमाण देखील वाढत गेले. तसे सध्या सगात सत्तर प्रकारच्या तंबाखूच्या वनस्पती अस्तित्वात आहेत. ज्यापासून विडी, सिगार, सिगारेट आण इतर वस्तू तयार केल्या जातात. फुफुसाच्या कॅन्सरच्या १० पैकी ८ रुग्णांमध्ये विडी, सिगारेट, सिगार तथा इतर पदार्थ ओढण्याच्या सवयी आढळतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनं तंबाखूमधील १९ प्रकारच्या कार्सिनोजन शोधले आहेत ज्यांचा प्रतक्ष कॅन्सरशी संबंध आहे. नवीन नॉर्मल पेशीं बनत असताना हे कार्सिनोजन डी.न.ए.मध्ये गुंतून राहतात व चुकीच्या पेशी म्हणजेच कॅन्सर पेशी बनण्यास मदत करतात.

ऑक्युपेशनल/एन्व्हायरनमेंटल

ओधोगीक क्रांतीमुळे उद्योगधंदे वाढीला लागले त्यामुळे हवेचे प्रदुषण वाढले तसेच अस्बेस्तॉस, क्याडमियम, बेरिलियम, क्रोमियम, निकेल, रडोन इत्यादी पदार्थानमुळे १० टक्के फुफुसाचा कॅन्सर होतो.

फुफुसाच्या कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

  • खोकला येणे
  • कफमध्ये रक्त येणे
  • छातीत दुखणे
  • पाठीत दुखणे
  • चक्कर येणे
  • डोकेदुकी, उल्टी होणे

फुफुसाचा कॅन्सर अतिशय जलद गतीने पसरणारा असून तो हाडामध्ये, लिवर मध्ये तसेच मेंदूमध्ये पसरू शकतो. रुग्ण जेंव्हा डॉक्टरकडे प्रथमतः तपासणीस येतो तेंव्हा ३० टक्के रुग्णामध्ये रोग मेंदू पर्यंत पोहचलेला आढळतो. त्यामुळे तपासणी लवकरात लवकर करून उपचार सुरु करण्यास प्राधान्य दयावे.

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, ब्रोन्कोस्कोपी व सी. टी. स्कॅन इत्यादी तपासण्या कराव्या. कॅन्सर किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी पेट-सी.टी. स्कॅन अतिशय उपयोगी ठरतो पण बऱ्याच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही, तसेच असल्यास फार खर्चीक आहेत. तुकडा काढून इमिनोहिस्टोकेमिस्ट्री ची सुविधा असणाऱ्या पथोलोजी लॅब तपासणीस पाठवावा जेणे करून EGFR, Alk, kras सारख्या तपासण्या करता येतील. रोग मेंदू पर्यंत गेल्याची शक्यता वाटल्यास सी.टी. किंवा एम.आर.आय. स्कॅन करून घ्यावा.

फुफुसाच्या कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत का?

फुफुसाच्या कॅन्सरचे स्माल (SCLC ) आणि नॉन स्माल (NSCLC ) कॅन्सर असे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण १५ टक्के फुफुसाच्या कॅन्सर रुग्णांमध्ये SCLC कॅन्सर प्रकार आढळतो, हा अतिशय अग्रेसिव असून ८० टक्के पेक्षा जास्त रुग्णांमध्ये पसरलेल्या अवस्थेत माहिती होतो. उरलेल्या ८५ टक्के फुफुसाच्या कॅन्सर रुग्णांमध्ये NSCLC रोग आढळतो. स्क़्यमस ( squmous) आणि अडीनो कार्सिनोमा ( adenocarcinoma) असे उपप्रकार आढळतात.

फुफुसाच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?

फुफुसाचा कॅन्सर साधारणपणे नंतरच्या टप्प्यामध्ये माहिती होतो त्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होण्याचे प्रमाण कमी असून केवळ १७ टक्केच रुग्ण तेही अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जिथे साऱ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात तेथे ५ वर्षापर्यन्त जगू शकतात. भारतामध्ये तर त्याचे प्रमाण फार कमी आहे.

फुफुसाचा कॅन्सर एखादया लोबमध्ये सुरु होऊन तो त्याच्या बाजूच्या किंवा दुसऱ्या बाजूच्या फुफुसात अथवा मेडियास्टीनम मधील नोडमध्ये पसरतो. ऍडव्हान्स टप्प्यात तो छातीच्या बाहेर हाडामध्ये, मेंदूमध्ये किंवा लिवरमध्ये पसरतो. उपचार सुरु करण्यापूर्वी रोग कुठे आहे, किती प्रमाणात पसरला आहे, हे पाहून उपचार केले जातात. फुफुसाचा कॅन्सर नष्ट करण्यासाठी मुख्यतः शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, तसेच केमोथेरपी व टार्गेट थेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती वापरल्या जातात.

लिमिटेड फुफुसाचा कॅन्सर:

सुरुवातीच्या टप्प्यातील रोग असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून मुख्या रोग तसेच मेडियास्टीनम मधील नोड काढणे गरजेचे असते. पथोलोजी रिपोर्ट नुसार गरज असल्यास किमोथेरपीचे उपचार केले जातात.

ऍडव्हान्स फुफुसाचा कॅन्सर:

न पसरलेला रोगामध्ये जेंव्हा शस्त्रक्रिया करता येत नाही अशा रोगास किमोथेरपीचे उपचार करून रोग कमी केला जातो व नंतर रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. रुग्ण सहन करू शकल्यास केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने रेडीओथेरपी सोबत दिले जातात.

पसरलेला फुफुसाचा कॅन्सर:

अश्या रुग्णांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा अंदाज घेऊन, उपचार सहन करू शकत असल्यास केमोथेरपीचे उपचार किंवा EGFR, Alk च्या तपासण्या नुसार टार्गेटथेरपी दिली जाते. रोग पसरलेला असल्यास कधी कधी रुग्णाची प्रकृती फारच खालावलेली असते अशा वेळी रुग्णाला केवळ त्रास होऊ नये म्हणून फक्त पॅलिएटीव उपचार करावेत.

रुग्णांनी, नातेवाईकांनी आणि डॉक्टरांनी देखील हे लक्षात ठेवले पाहिजे की कॅन्सर उपचारामध्ये फक्त रोगाचे नव्हे तर रोगासाहित रुग्णाचे उपचार करायचे असतात. त्यामुळे रुग्णाची शारीरिक, मानसिक स्तिथी लक्षात घेणे गरजेचे असते, दरवेळी करू इच्छिणाऱ्या उपचारासाठी रुग्णाचे शरीर साथ देईल असे नव्हे.

या सर्व त्रासातून मुक्ती हवी असेल तर तंबाखू व तंबाखूजन्ये पदार्थ खाणे किंवा स्मोकिंग करणे बंद करावे.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 14 April 2017 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top