किडनी कॅन्सर
X
माणसाच्या शरीरात दोन किडनी/ मूत्रपिंडे असून ती पोटामध्ये यकृत व जठराच्या खालच्या भागात, उजव्या व डाव्या अश्या दोन्ही बाजूंना असतात. किडनी हाताच्या मुठीच्या आकारासारख्या असून साधारणपणे ८ ते १२ सें.मी. लांब व ३ सें.मी. रुंद असतात. दोन्ही किडनी कॅप्सूलच्या आवरणाने संरक्षित केलेल्या असतात. किडनीमध्ये कॉरटेक्स, मेडूला व पेल्व्हिस असे तीन भाग असतात व त्यामध्ये असंख्य नेफ्रोनचे जाळे विणलेले असते.
रक्ताचे शुद्धीकरण करणे, रक्तदाबाचे नियंत्रण करणे, लघवी बनविणे, शरीरातील टाकाऊ पदार्थांचे लघवीवाटे विसर्जन करणे, इलेक्ट्रोलाईट, अॅसिड-बेस यांचे नियंत्रण करणे, तसेच एरीथ्रोपोईटिनसारखे महत्त्वाचे हॉर्मोन्स बनविणे इत्यादी महत्त्वाची कार्ये किडनी करते. त्यामुळे मनुष्यास जिवंत राहण्यासाठी किमान एक तरी किडनी काम करणारी असली पाहिजे.
किडनी (Kidney) कॅन्सर
लहान मुलांमध्ये किडनीचा विकास होत असताना नॉर्मल पेशी बनण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाल्यास विल्म ट्यूमर नावाचा किडनीचा कॅन्सर होऊ शकतो परंतु इथे आपण केवळ अॅडल्ट किडनी कॅन्सर बद्दल माहिती घेऊ.जगामध्ये ९ लाखापेक्षा जास्त रुग्ण या आजाराने बाधित असून दरवर्षी जगामध्ये ३ लाख ३० हजार नवीन रुग्ण किडनीच्या कॅन्सरने पीडित होतात. तसेच जवळपास १ लाख ४० हजार रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो, या कॅन्सरमुळे भारतामध्ये ९ हजार व्यक्ती पीडित होतात अशी नोंद आढळते तर जवळपास ६ हजार रुग्ण दर वर्षी मृत्यू पावतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.
किडनी कॅन्सर होण्याची करणे :
तंबाखू सेवन, धूम्रपान, अतिरक्तदाब, स्थूलपणा, व्यायाम न करणे, लाइफस्टाइल मधील बदल, किडनीचे दीर्घ आजार व डायालीसीस तसेच अनुवंशिक इत्यादी कारणामुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे २ ते ४ टक्के कॅन्सर हे अनुवंशिक आहेत. व्हिएचल सिंड्रोम, बीएचडी सिंड्रोम, ट्यूबरस स्कलेरोसीस व हेरेडीटरी पॅपिलरी रीनल कार्सिनोमा इत्यादी अनुवंशिक आजारांमध्ये किडनी कॅन्सर आढळतो.
किडनी कॅन्सरमध्ये साधारणपणे ८० टक्के क्लिअर सेल (clear cell RCC), १० टक्के क्रोमोफोब (chromophobe RCC), ५टक्के पॅपिलरी (papillary) पॅथोलोजीचे उपप्रकार आढळतात. किडनी कॅन्सरमध्ये सार्कोमॅटोइड (sarcomatoid) किंवा रहाब्डोमॅटोइड (rhabdomatoid) पेशी आढळतात.
किडनी कॅन्सरची लक्षणे व तपासणी :
१. लघवी मध्ये रक्त येणे
२. पोटात / पाठीत दुखणे
३. पोटात गाठ/ सूज येणे
४. पोट सुमारणे व पोटात पाणी होणे
५. पाय सुमारणे/ इडिमा होणे
६. भूक न लागणे व वजन कमी होणे
७. रक्तदाबाचा त्रास होणे
८. अॅनिमिया होणे
तपासणी :
रक्त व युरीन तपासणी, छातीचा एक्स रे, सी.टी. स्कॅन, बोन स्कॅन, रीनल अँजिओग्राफी इत्यादी तपासण्या कराव्यात. तसेच सी.टी. स्कॅन किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनखाली किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे तुकडा काढून रोग असल्याची खात्री करावी.
केवळ ३० टक्केच रुग्ण सुरुवातीच्या स्टेजमध्ये आढळतात तेही रुग्ण जेव्हा दुसऱ्या कारणासाठी पोटाची सोनोग्राफी किंवा सी.टी. स्कॅनसारख्या तपासण्या करतो तेव्हा किडनीमध्ये गाठ निदर्शनास येते. जवळपास ७० टक्के रुग्ण अॅडव्हान्स स्टेजमध्ये लक्षात येतात. कारण पोटामध्ये किडनीच्या कॅन्सरला वाढण्यासाठी अडथळा कमी होतो त्यामुळे तो बऱ्याच वेळा वेगाने वाढल्यानंतर समजतो. साधारणपणे किडनीचा कॅन्सर ५० वर्षे वयानंतर होतो त्यामुळे अशा रुग्णांमध्ये पोटात दुखत असल्यास किंवा लघवीमध्ये रक्त येत असल्यास लगेच तपासण्या कराव्यात.
किडनी कॅन्सरचे उपचार :
शस्त्रक्रिया, टार्गेट थेरपी आणि इम्युनोथेरपी या सर्व प्रकारच्या उपचारपध्दती किडनीचा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. किडनीच्या कॅन्सरचे उपचार, रोग फक्त एका किंवा दोन्ही किडनीमध्ये आहे का ते पाहून ठरवले जातात. तसेच रोगाचा टप्पा, रोगाच्या पॅथोलोजीचा प्रकार, रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता, व शस्त्रक्रियेद्वारे रोग संपूर्णपणे काढला जाऊ शकतो की नाही या बाबींवर विचार करून उपचार ठरवले जातात.
शस्त्रक्रिया :
रोग संपूर्णपणे बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया ही मुख्य उपचारपध्दती असून रोग सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास किंवा रोग आकाराने लहान असल्यास किंवा शस्त्रक्रिया करून रोग पूर्णपणे काढता येत असल्यास रोगाने बाधित झालेली किडनी व आजूबाजूच्या लिम्फ नोडच्या गाठी काढणे गरजेचे असते. या शस्त्रक्रियेला नेफ्रेक्टमी असे म्हणतात.
काही वेळा शस्त्रक्रिया करून कॅन्सर पूर्णपणे काढता येत नसल्यास दुखणे कमी व्हावे म्हणून पॅलिएटिव नेफ्रेक्टमी केली जाते.
टार्गेट थेरपी :
शत्राक्रियेद्वारे कॅन्सर संपूर्णपणे काढणे शक्य नसल्यास किंवा रोग पसरलेला असल्यास टार्गेट थेरपीचे उपचार केले जातात. टार्गेट थेरपीमध्ये सुनीटीनिब (sunitinib) हे ड्रग वापरले जातो. सुनीटीनिब PDGFR, VEGF, KIT, FLT३ सारखे रिसेप्टरद्वारे काम करून कॅन्सर पेशींची वाढ रोखते तसेच कॅन्सरला होणारा रक्तपुरवठा बंद करून रोग कमी करते. सुनीटीनिब तोंडानी घेण्याची गोळी असल्याने सुरुवातीला रुग्णाची या उपचारपद्धतीला पसंती असते परंतु अतिरक्तदाब, हँड-फूट सिन्ड्रोम, त्वचेवर रॅश, थकवा, रक्तस्राव होणे, जुलाब होणे इत्यादी दुष्परिणामांमुळे रुग्ण उपचार अर्धवट सोडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे उपचार दोन आठवड्यांसाठी देऊन एक आठवडा सुट्टी दिली जाते. जेणेकरून दुष्परिणाम कमी करता येतील.
इम्युनोथेरपी :
कॅन्सर रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे कॅन्सर पेशींची भरमसाट वाढ होते. इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सरप्रती शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सर पेशी मारल्या जातात. निवोलुमॅब (nivolumab) हा ड्रग PD1 रिसेप्टर बंद करून कॅन्सर पेशी मारतो. निवोलुमॅबचे दुष्परिणाम फार कमी असतात केवळ ज्या रुग्णांना अॅलर्जीचा त्रास होतो त्यांना ही उपचारपध्दती दिली जात नाही.
रेडीओथेरपी :
किडनीचा कॅन्सर हाडामध्ये, फुप्फुसात, किंवा मेंदूमध्ये पसरू शकतो. अशा वेळी रुग्णाला केवळ त्रास होऊ नये म्हणून पॅलिएटिव रेडीओथेरपीचे उपचार करावेत. रुग्णांच्या शारीरिक तंदुरुस्ती चा अंदाज घेऊन, उपचार सहन करू शकत असल्यास पॅलिएटिव रेडीओथेरपी साधारणपणे पाच किंवा दहा दिवस दिली जाते. कधी कधी रुग्णाची प्रकृती फारच खालावलेली असते अशा वेळी एक दिवसाचे उपचार दिले जातात.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई