Home > हेल्थ > #WorldCancerDay : किडनी (Kidney) कॅन्सर

#WorldCancerDay : किडनी (Kidney) कॅन्सर

#WorldCancerDay : किडनी (Kidney) कॅन्सर
X

शरीरातील दोन किडनी/ मूत्रपिंड असून त्यांची ठेवण पोटामध्ये लिव्हर व जठरच्या खालच्या भागात, उजव्या व डाव्या अश्या दोन्ही बाजूला असते, तसेच त्या हाताच्या मुठीच्या आकारा सारख्या असून साधारणपणे ८ ते १२ से.मी लांब व ३ से.मी. रुंद असतात. दोन्ही किडनीज कॅप्सूलच्या आवरणाने संरक्षित केलेल्या असतात. किडनीमध्ये कॉरटेक्स, मेडूला व पेल्व्हीस असे तीन भाग असतात व त्यामध्ये असंख्य नेफ्रोनचे जाळे विणलेले असते. रक्ताचे शुद्धीकरण करणे, रक्त दाबाचे नियंत्रण करणे, लघवी बनविणे, शरीरातील टाकाऊ पदार्थांचे लघवी वाटे विसर्जन करणे, इलेक्ट्रोलाईट, असिड-बेस यांचे नियंत्रण करणे, तसेच एरीथ्रोपोईटिन सारखे महत्वाचे होर्मोन्स बनविणे इत्यादी महत्वाची कार्ये किडनी करते त्यामुळे मनुष्यास जिवंत राहण्यासाठी किमान एक तरी किडनी काम करणारी असली पाहिजे.

किडनी (Kidney) कॅन्सर

लहान मुलामध्ये किडनीची डेव्हलपमेंट होत असताना नॉर्मल पेशी बनण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाल्यास विल्म टूमर नावाचा किडनीचा कॅन्सर होऊ शकतो परंतु इथे आपण केवळ अडल्ट किडनी कॅन्सर बद्दल माहिती घेऊ.

जगामध्ये ९ लाखापेक्षा जास्त रुग्ण या रोगाने बाधीत असून दर वर्षी जगामध्ये ३ लाख ३० हजार नवीन रुग्ण किडनीच्या कॅन्सरने पिडीत होतात तसेच जवळपास १ लाख ४० हजार रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो, या रोगामुळे भारतामध्ये ९ हजार रुग्ण पिडीत होतात अशी नोंद आढळते तर जवळपास ६ हजार रुग्ण दर वर्षी मृत्यू पावतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

किडनी कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत ?

तंबाखू स्मोकिंग, अतिरक्तदाब, स्थूलपणा, व्यायाम न करणे, लाइफस्टाइल मधील बदल, किडनीचे दीर्घ आजार व डायलिसिस तसेच अनुवंशिक इत्यादी कारणांमुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे २ ते ४ टक्के कॅन्सर हे अनुवंशिक आहेत. व्हीएचल सिंड्रोम, बीएचडी सिंड्रोम, टूबरस स्कलेरोसीस व हेरेडिटरी प्यापिलरी रीनल कार्सिनोमा इत्यादी अनुवांशिक रोगामध्ये किडनी कॅन्सर आढळतो.

किडनी कॅन्सर मध्ये साधारणपणे ८० टक्के क्लिअर सेल (clear cell RCC), १० टक्के क्रोमोफोब (chromophobe RCC), ५टक्केप्यापिलरी (papillary) पॅथॉलॉजीचे उपप्रकार आढळतात. किडनी कॅन्सरमध्ये सार्कोम्याटोइड (sarcomatoid) किंवा रहाब्डोम्याटोइड (rhabdomatoid) पेशी आढळतात.

किडनी कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

१. लघवी मध्ये रक्त येणे

२. पोटात / पाठीत दुखणे

३. पोटात गाठ/ सूज येणे

४. पोट सुमारणे व पोटात पाणी होणे

५. पाय सुमारणे/ इडिमा होणे

६. भूक न लागणे व वजन कमी होणे

७. रक्तदाबाचा त्रास होणे

८. ॲनेमिया होणे

तपासणी:- रक्त व युरीन तपासणी, छातीचा एक्सरे, सी.टी. स्कॅन, बोन स्कॅन, रीनल अँनजिव्होग्राफी इत्यादी तपासण्या कराव्यात. तसेच सी.टी. स्कॅन किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनखाली किंवा ल्यापरोस्कोपी द्वारे तुकडा काढून रोग असल्याची खात्री करावी.

केवळ ३० टक्केच रुग्ण सुरुवातीच्या स्टेज मध्ये आढळतात. ते ही रुग्ण जेव्हा दुसऱ्या कारणासाठी पोटाची सोनोग्राफी किंवा सी.टी. स्कॅन सारख्या तपासण्या करतो तेव्हा किडनीमध्ये गाठ निदर्शनास येते. जवळपास ७० टक्के रुग्ण ॲडव्हांस स्टेज मध्ये आढळतात. कारण पोटामध्ये किडनीच्या रोगाला वाढण्यासाठी कमी अटकाव होतो. त्यामुळे रोग बऱ्याच वेळा वेगाने वाढल्यानंतर माहिती पडतो. साधारणपणे किडनीचा कॅन्सर ५० वर्षानंतर आढळतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये पोटात दुखत असल्यास किंवा लघवीमध्ये रक्त येत असल्यास लगेच तपासण्या कराव्यात.

किडनी कॅन्सरचे उपचार कसे करावे?

शस्त्रक्रिया, टार्गेट थेरपी आणि इमुनोथेरपी यासर्व प्रकारच्या उपचार पध्दती किडनीचा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. किडनीच्या कॅन्सर चे उपचार, रोग ऐकाच किंवा दोन्ही किडनी मध्ये आहे, रोगाचा टप्पा, रोगाची पॅथॉलॉजीचा प्रकार, रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता, व शस्त्रक्रिया द्वारे रोग संपूर्णपणे काढला जावू शकतो कि नाही या गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे कुठली उपचार पध्दती केव्हा वापरायची हे रोग कितव्या टप्पात आहे यावरून ठरविले जाते.

शस्त्रक्रिया

रोग संपूर्णपणे बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया ही मुख्य उपचार पध्दती असून रोग सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास किंवा रोग आकाराने लहान असल्यास किंवा शस्त्रक्रिया करून रोग पूर्णपणे काढता येत असल्यास रोगाने बाधित झालेली किडनी व आजूबाजूचे लीम्फ नोडच्या गाठी काढणे गरजेचे असते. या शस्त्रक्रियेला नेफ्रोकटोमी असे म्हणतात.

काही वेळा शस्त्रक्रिया करून रोग पूर्णपणे काढता येत नसल्यास दुखणे कमी व्हावे म्हणून पालियटीव नेफ्रोकटोमी केली जाते.

टार्गेट थेरपी:

रोग शस्त्रक्रियेद्वारे संपूर्णपणे काढणे शक्य नसल्यास किंवा रोग पसरलेला असल्यास टार्गेट थेरपीचे उपचार केले जातात. टार्गेट थेरपी मध्ये सुनीटीनिब ( sunitinib) हा ड्रग वापरला जातो. सुनीटीनिब PDGFR, VEGF, KIT, FLT३ सारखे रीसेप्टर द्वारे काम करून कॅन्सर पेशींची वाढ रोखते तसेच कॅन्सरला होणारा रक्तपुरवठा बंद करून रोग कमी करते. सुनीटीनिब तोंडाने घेण्याची गोळी असल्याने सुरुवातीला रुग्णाची या उपचार पद्धतीला पसंती असते. परंतु अति रक्तदाब, फुट सिन्ड्रोम, त्वचे वर रॅशेस, थकवा, रक्तस्त्राव होणे, जुलाब होणे इत्यादी दुष्परिणामामुळे रुग्ण उपचार अर्धवट सोडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे उपचार दोन आठवडे देऊन एक आठवडा सुट्टी दिली जाते. जेणेकरून दुष्परिणाम कमी करता येतील.

इमुनोथेरपी

कॅन्सर रुग्णामध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे कॅन्सर पेशींची भरमसाट वाढ होते. इमुनोथेरपीद्वारे कॅन्सर प्रती शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवून कॅन्सर पेशी मारल्या जातात. निवोलुम्याब (nivolumab) हा ड्रग PD१ रिसेप्टर बंद करून कॅन्सर पेशी मारतो. निवोलुम्याबचे दुष्परिणाम फार कमी असतात केवळ ज्या रुग्णांना अलर्जीचा त्रास होतो त्यांना ही उपचार पध्दती दिली जात नाही.

रेडिओथेरपी

किडनीचा कॅन्सर हाडामध्ये, फुफ्फुसात, किंवा ब्रेन मध्ये पसरू शकतो. अशा वेळी रुग्णाला केवळ त्रास होऊ नये म्हणून प्यालिएटीव रेडिओथेरपीचे उपचार करावेत. रुग्णांच्या शारीरिक तंदुरुस्ती चा अंदाज घेऊन, उपचार सहन करू शकत असल्यास प्यालिएटीव रेडिओथेरपी साधारणपणे पाच किंवा दहा दिवस दिली जाते. कधी कधी रुग्णाची प्रकृती फारच खालावलेली असते अशा वेळी एक दिवसाचे उपचार दिले जातात.

डॉ. दिलीप निकम, विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई
[email protected]

Updated : 4 Feb 2023 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top