Home > हेल्थ > प्लेटलेट्स वाढवणारा गुणकारी आहार

प्लेटलेट्स वाढवणारा गुणकारी आहार

प्लेटलेट्स म्हणजे काय आणि त्यांचं आरोग्यात महत्त्व कोणतं हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं. या भागात प्लेटलेट्सची संख्या योग्य होण्यासाठी आहार कसा असावा, यांसंबंधी जाणून घेऊ.

प्लेटलेट्स वाढवणारा गुणकारी आहार
X

प्लेटलेट्स म्हणजे काय आणि त्यांचं आरोग्यात महत्त्व कोणतं हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं. या भागात प्लेटलेट्सची संख्या योग्य होण्यासाठी आहार कसा असावा, यांसंबंधी जाणून घेऊ.

प्लेटलेट्स कमी झाल्यास :

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय आजही खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.

सकस आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण चांगलं राखता येतं. शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवता येतात.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हणतात. निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट १५० हजार ते ४५० हजार प्रती मायक्रोलिटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट १५० हजार प्रती मायक्रोलिटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानलं जातं. काही विशिष्ट प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अतिरिक्त मद्यपान व काही प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे ७ पदार्थ :

१. पपई

पपईचं फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग आहारात केल्यास कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवता येतात. २००९ मध्ये मलेशिया इथं वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचं सेवन केल्याने वाढू शकते. पपईची पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

२. गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करावे. तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्त्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्त्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये सहजपणे उपलब्ध होते.

३. आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा हा लोकप्रिय आयुर्वेदिक घटक आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेलं व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचं व प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचं कम करतं. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी ३-४ आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४. भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेट्सचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५. पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने ब्लड क्‍लॉटिंग होण्यासाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये ४ ते ५ पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. याव्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरूपात करू शकता.

६. नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरल्सचा (खनिज द्रव्ये) उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७. बीट

बीटचे सेवन करून प्लेटलेट वाढवणे हा सर्वाधिक प्रमाणात केला जाणारा घरगुती उपचार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट हे प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

- डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 31 Aug 2017 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top