कोरोना आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्याने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातील सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी केला आहे. खास करून गुजरात-महाराष्ट्र सीमेवर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास लगेच माघारी पाठवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून सुरतला जाणाऱ्या एका खाजगी बसमधील 52 जणांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गुजरात प्रशासन हादरलं आहे. यामुळे गुजरातच्या सीमा भागात जागोजागी गुजरात पोलीस तसेच आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान बेड फुल असल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक मधील रुग्ण गुजरातमध्ये उपचारासाठी जात असल्याचं समोर आलंय.
सीमा भागात कडक आरोग्य तपासणी
कोरोनाने गंभीर स्वरूप धारण केल्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश प्रशासन सतर्क झाले आहे. खास करून गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर प्रवेशावेळी प्रवाशांची कसून चौकशी केली जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशांना परत पाठवले जात आहे. नवापूर चेकपोस्ट, वाका चेकपोस्ट, उच्छल चेक पोस्टवर गुजरात प्रशासन तर धुळे-सुरत महामार्गावरील नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा चेक पोस्टवर महाराष्ट्राचे आरोग्य पथक, शिक्षक, महसूल, पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात आहे. गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन करण्यात येते आणि रिपोर्ट निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येतो.
गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या बहुतांश खासगी वाहनातील प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केलेली असते. त्यामुळे अँटिजेंन टेस्टची गरज पडत नाही. महाराष्ट्रापेक्षा गुजरातची आकडेवारी कमी दिसत असल्याचं आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं .
खाजगी बसमध्ये 52 प्रवाशी पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातून गुजरातमधील सुरतला जाणाऱ्या एका खाजगी बसची पलासना चेक पोस्टवर तपासणी केली असता बसमधील मधील 52 प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सुरत प्रशासन हादरून गेलं आहे. ही बस पुन्हा परत पाठवण्यात आल्याच बोललं जातं आहे. यामुळं गुजरात प्रशासनाने परराज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत आहे.
महाराष्ट्रात बेड फुल , रुग्ण गुजरातला उपचारासाठी रवाना
कोरोनामुळे जळगाव-धुळे-नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील सरकारी दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटल फुल्ल झाल्याने अतिगंभीर रुग्णांना बेड मिळणं मुश्किल झालं आहे. यामुळे लोक सुरत येथे उपचारांसाठी मोठया संख्येने जात आहेत. सुरतच्या सरकारी रुग्णालयात 900 रुग्णांपैकी 300 रुग्ण हे महाराष्ट्रातील असल्याची नोंद माहिती समोर आली आहे.