Home > हेल्थ > मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २०० दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २०० दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २०० दिवसांवर
X

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी आता २०० दिवसांवर आला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील २४ विभागांपैकी ४ विभागांमध्ये ३०० पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी झाला आहे. तर ११ विभागांमध्ये २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुपटीचा कालावधी झाला आहे. एवढेच नव्हे तर रुग्ण वाढीची साप्ताहिक सरासरी दर देखील आता घसरुन ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

पण तरीही नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मास्कचा नियमित वापर, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, यासाठी जनजागृती करुन भर देण्यात येतो आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी रुग्ण दुप्पटीचे शतक गाठले होते. तर दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला आहे.

महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये ४ विभागांनी ३०० दिवसांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये 'जी-उत्तर' ३५१ दिवस, 'एफ-दक्षिण' ३१६ दिवस, 'ए' विभाग ३०८ दिवस आणि 'सी' विभाग ३०६ दिवस यांचा समावेश आहे. तसेच, एकूण ११ विभागांनी २०० दिवसांपेक्षा जास्त रुग्ण दुप्पटीचा कालावधी गाठला आहे. त्यात 'जी-दक्षिण' विभाग २८३, 'एल' विभाग २४५, 'ई' विभाग २४२, 'एस' विभाग २३८, 'डी' विभाग २३३ दिवस, 'एफ-उत्तर' विभाग २१३ दिवस, 'एम-पूर्व' विभाग २०७ दिवस, 'के-पूर्व' विभाग २०७ दिवस, 'एच-पश्चिम' विभाग २०६ दिवस, 'एच-पूर्व' विभाग २०३ दिवस आणि 'के-पश्चिम' विभाग २०० दिवस यांचा समावेश आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्येमदील वाढही कमी होते आहे. २९ ऑक्टोबर २०२० रोजी असलेला ०.४४ टक्के इतका रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.३३% इतका झाला आहे.

Updated : 6 Nov 2020 5:38 PM GMT
Next Story
Share it
Top