Home > हेल्थ > सर्विक्स (Cervix)  कॅन्सर

सर्विक्स (Cervix)  कॅन्सर

सर्विक्स (Cervix)  कॅन्सर
X

ढोबळमानाने गर्भाशयाचे बॉडी (Body) व सर्विक्स (Cervix) अशा दोन भागात विभाजन केले जाते. मागच्या लेखात आपण गर्भाशय (बॉडी/ पिशवी) च्या कॅन्सरबद्दल माहिती घेतली. आता सर्विक्स कॅन्सरबद्दल माहिती घेऊ. गर्भाशयाच्या तोंडाजवळ ३ ते ५ से.मी. भागाला सर्विक्स म्हणतात. योनी मधील भागास ecto cervix तर गर्भाशयाच्या तोंडामधील भागास endo cervix म्हणतात. वरील दोन भाग ज्या रेषेने (transitional zone) वेगळे होतात तिथेच कॅन्सरचा उगम होतो असे मानले जाते. तसेच त्यामध्ये अनुक्रमे squamous cell carcinoma व adenocarcinoma कॅन्सरचे प्रकार आढळतात.

भारतातील स्त्रियांमध्ये सर्विक्स कॅन्सर पहिल्या क्रमांकावर होता. परंतु मागील काही वर्षात स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढल्याने आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रगत देशामध्ये (अमेरिका/युरोप) गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण फारच कमी आहे. दरवर्षी जगामध्ये ५ लाख स्त्रिया या रोगाने पीडित होतात. त्यातील जवळपास दीड लाख स्त्रिया भारतातील असतात. कुठल्याही क्षणाला भरतात जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त स्त्रिया या रोगाने पीडित आयष्य कंठीत आहेत. असे जरी असले तरी हा कॅन्सर उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो ही दिलासा देणारी बाब आहे. केवळ गरज आहे ती असे रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात शोधून वेळीच उपचार करण्याची.

सर्विक्स कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

वर उल्लेख केल्या प्रमाणे transitional zone या भागात नवीन पेशी बनत असताना गडबड होऊन कॅन्सरच्या पेशी बनतात. अशी गडबड HPV इन्फेक्शनमुळे होते. हे झुर हावसन (Zur Hausen) या शास्त्रज्ञांने शोधून काढल्या बद्दल त्यांना २००८ चे नोबेल मिळाले आहे.

HPV इन्फेक्शन व सर्विक्स कॅन्सर:

जवळपास २०० HPV व्हायरसचे उपप्रकार माहिती असून ते मुख्यतः शरीरात transitional zone असणाऱ्या भागात जसे सर्विक्स, गुदद्वार, पेनिस, स्त्री जानेन्द्रीय, घसा व टॉन्सिल कॅन्सर होण्यास मदत करतात. HPV इन्फेक्शन लैगिक संबध ठेवल्याने प्रसारित होते. सर्विक्स कॅन्सरमध्ये HPV १६, १८, ३१, ३३, ४५ हे व्हायरस आढळतात.

कोणाला HPV इन्फेक्शन होऊ शकते?

शारीरिक/लैंगिक संबंधाची सुरुवात झाल्यास HPV इन्फेक्शन जवळपास सर्वांनाच एकदा तरी होते तर काहींना पुन्हा पुन्हा होते. त्यामध्ये एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असणे हे कारण असू शकते. एकच लैंगिक साथीदार असणाऱ्यांना देखील इन्फेक्शन होऊ शकते. पण ते प्रमाण नगण्य असते. तसेच त्वचा एकमेकांच्या संपर्कात आल्याससुद्धा इन्फेक्शन होऊ शकते.

HPV इन्फेक्शन पुन्हा:पुन्हा होण्याची करणे काय आहेत?

१. कमी वयात शारीरिक/लैंगिक संबंधाची सुरुवात झाल्यास

२. एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असणे

३. तंबाकू खाणे/पिणे

४. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असल्यास

५. HIV इन्फेक्शन असल्यास

६. दोन पेक्षा जास्त मूलबाळ असणे

७. तोंडाची/ गुप्तांगाची स्वच्छता नसणे

HPV इन्फेक्शन मुळे सर्विक्स कॅन्सर कसा होतो?

HPV इन्फेक्शन पुन्हा:पुन्हा होत असल्यास सुरुवातीला नॉर्मल पेशीपासून प्री कॅन्सर होतो व शेवटी कॅन्सरमध्ये रुपांतर होतो. या सर्व प्रक्रियेला साधारणपणे १५ ते २० वर्ष इतका दीर्घ कालावधी लागतो. रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यास (HIV इन्फेक्शन/ औषधीने) ५ ते १० वर्ष कालावधी लागतो.

HPV इन्फेक्शन झाल्यास काय उपचार करावे?

HPV इन्फेक्शन झाल्यास घाबरून जाण्याचे काही कारण नसून ९० ते ९५ % वेळा ते अपोआप बरे होऊन जाते. सध्या स्थितीत इन्फेक्शनसाठी कुठलेही उपचार उपलब्ध नाहीत. प्री कॅन्सर लिजन असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित उपचार करून घ्यावेत.

HPV इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय काळजी घ्याल?

गुप्तांगाची अधिक स्वछता, एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार नसणे, नेहमी निरोध वापरण्याने इन्फेक्शन कमी होऊ शकते.

HPV इन्फेक्शन प्रतिबंधीत लस (vaccine) उपलब्ध आहे का?

gardasil व cervarix अशी दोन प्रकारची प्रतिबंधीत लस (vaccine) उपलब्ध आहेत. शारीरिक/लैंगिक संबंधाची सुरुवात होण्यापूर्वी लस घेतल्यास HPV इन्फेक्शन कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेने ९ ते १३ वर्ष वयाच्या मुलींसाठी लस देण्याची शिफारस केलेली आहे.

सर्विक्स कॅन्सर स्क्रिनिंग तपासण्या आणि मार्गदर्शक तत्वे

१. सर्विक्स (Cervical) कॅन्सर: २१ वर्ष किंवा शारिरीक संबंध ठेवल्यापासून ते ६५ वर्षापर्यंत सर्व स्त्रियांनी दर ३ वर्षांनी pap टेस्टिंग (cytology) करावी.

२. ३० वर्ष ते ४९ वर्षामध्ये किमान एकदा तरी स्क्रिनिंग करावी.

स्क्रिनिंग तपासण्या: खालील तीन तपासण्यापैकी कोणतीही एक तपासणी वापरली जाते.

१. PAP टेस्ट

२. VIA (visual inspection with acetic acid)

३. HPV टेस्ट

सर्विक्स कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

१. मासिक पाळी सारखा रक्तस्त्राव होणे

२. शारीरिक संबंध ठेवल्यास रक्तस्त्राव होणे

३. पिवळे पाणी जाणे/वास येणे

४. पोटात दुखणे/पाठीत दुखणे

५. लाघवीला त्रास होणे/पोट साफ न होणे

६. पायाला सूज येणे

७. वजन कमी होणे/अशक्तपणा येणे

(रक्तस्त्राव होत असल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांना दाखवून तपासण्या करणे गरजेचे असते. तसेच आपल्याला रक्तस्त्राव होतो म्हणून कॅन्सर झाला असे लगेच मानू नये. कारण, रक्तस्त्रावची बरीच करणे असू शकतात. त्यातील सर्विक्स कॅन्सर हे एक कारण असू शकते. त्यामुळे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या तपासण्या करून घ्यव्यात.)

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे व सोनोग्राफी करावी. आर्थिक दृष्टया शक्य असल्यास सी.टी. स्कॅन किंवा एम. आर. आय करावा. खरोखरच कॅन्सर आहे की नाही ते पाहण्यासाठी तुकडा काढून तपास करावा.

सर्विक्स कॅन्सरचे उपचार कसे करावे?

सर्विक्स कॅन्सर साधारणपणे स्त्रियांमध्ये पहिल्या किवा दुसऱ्या टप्प्यामध्ये माहिती पडल्यास रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण ७० ते ९० टक्के आहे. फक्त उपचार योग्य वेळी, योग्य ठिकाणीच आणि योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरकडे होणे गरजेचे असते.

शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, आणि केमोथेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती सर्विक्स कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. रोग सर्विक्स मध्येच आहे की सर्विक्स व गर्भाशयाच्या बाहेर पसरला आहे हे जाणून घेणे अतिशय गरजेचे असते त्यावरच उपचार पध्दती निवडली जाते.

रोग पिशवी मध्येच असल्यास शक्य तो सर्व रुग्णांमध्ये शत्रक्रिया करून गर्भाशय, अंडाशय तसेच बाजूच्या लिम्प नोड पेशी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पॅथोलॉजीस्टकडे पाठवणे गरजेचे असून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे रेडीओथेरपी उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते.

रोग पिशवी बाहेर पसरलेला असल्यास सर्व रुग्णांना रेडिओथेरपी देणे गरजेचे असते तसेच सोबत दर आठवड्याने केमोथेरपीचे उपचार दिले जातात. रेडीओथेरपी देण्याच्या पध्दतीवरुन ई.बी.आर.टी व ब्राकीथेरपी असे दोन प्रकार पडतात. ई.बी.आर.टी रेडिओथेरपी उपचारामध्ये किमान ३डी- सी. आर. टी उपचार पध्दती अनुसरून रेडीओथेरपीशी संबंधित दुष्परिणाम कमीत कमी ठेवता येतात.

ई.बी.आर.टी रेडीओथेरपी उपचार मिळालेल्या जवळपास सर्व रुग्णांना ब्राकीथेरपीचे उपचार करणे गरजेचे असून आठवड्यातून एकदा असे तीन ते पाच वेळा उपचार दिले जातात.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 12 May 2017 7:43 AM GMT
Next Story
Share it
Top