Home > हेल्थ >  कॅन्सर व आहार : भाग ३

 कॅन्सर व आहार : भाग ३

 कॅन्सर व आहार : भाग ३
X

कॅन्सर या आजाराच्या नियंत्रणासाठी उत्तम ठरणारा आहार आणि योग्य पोषक द्रव्ये कोणती हे पाहू.

पोटॅशियम सोडियम, पोटॅशियम, क्लोरा हे शरीराला आवश्‍यक क्षार आहेत.

त्यापैकी पोटॅशियम हा पेशींच्या पोषणासाठी तसेच स्नायूंचे आकुंचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कॅन्सरग्रस्त व्यक्‍तींमध्ये हे क्षार रोगनिवारक आणि रोगप्रतिबंधक म्हणूनही उपयुक्‍त ठरते. मेंदू व शरीर यांची कार्यक्षमता या क्षाराने वाढते.

पोटॅशियमयुक्‍त अन्नपदार्थ मनुका, खजूर, जर्दाळू, बदाम, खोबरे, अंजीर असा सुकामेवा. केळी, अंजीर, संत्री, द्राक्षे, शहाळे / नारळपाणी ही फळे. कोबी, फ्लॉवर, कोहळा, वाटाणा, भुईमूग, टोमॅटो, गाजर, काकडी, बीट, लिंबू, मेथी, चाकवत इ. भाज्या. जोंधळा, मका ही धान्ये. तसेच दूध,काकवी, उकडलेले अंडे इत्यादी पदार्थांमध्ये पोटॅशियम आढळते.

सोडियम/ क्लोराईड आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. रुग्णाला रक्तदाबाचा त्रास असल्यास मीठ वर्ज्य करावे.

लोह

पेशीला प्राणवायूचा योग्य पुरवठा करण्याचे काम लोह खनिज करते. हा पुरवठा कमी पडल्यास निरुत्साह, आळस, अशक्तपणा येतो. कर्करोगासारख्या आजाराशी मुकाबला करण्याची शक्‍ती शरीराला पुरवण्याचे काम लोह करते. पोटॅशियमसह लोहाचा पुरवठा व्हावा यासाठी बेदाणे, करवंदे, जांभळे, कांदा, पालक, मुळा, गहू, जवस हे पदार्थ आहारात असावेत.

कॅल्शियम

कॅल्शियम हे हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते. दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर यातून ते मिळते.

फॉस्फरस

कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्त्वाच्या कार्यात फॉस्फरस मदत करते. उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी ते आवश्यक असते.

दुग्धजन्य पदार्थ, पूर्ण धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम यातून फॉस्फरस मिळते.

मॅग्नेशियम

प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मॅग्नेशियम मदत करते. कॅल्शियमची आवश्यक पातळी ते कायम ठेवते. तणावाच्या परिस्थितीत या आहारघटकाचा उपचारात उपयोग होतो. हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ यांमधून मॅग्नेशियममिळते.

झिंक

उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्तनपान देणाऱ्या स्त्रियांना अत्यंत आवश्यक)

केळी, पूर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ यांमधून झिंकचा पुरवठा होतो.

पालेभाज्या

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा औषधांचा परिणाम किंवा आजाराचे लक्षण म्हणून पचनाच्या तक्रारी व बद्धकोष्ठता दिसून येते. यासाठी पालेभाज्या खाणे आवश्‍यक आहे. त्याबरोबर योग्य प्रमाणात तेल, तूपही शरीरात गेले पाहिजे. साजूक तूप आणि फिल्टर्ड तेल उत्तम, पण रिफाईंड तेलांचा वापर घातक ठरतो.

दूध

कर्करोगाचा सामना करणाऱ्यांनी जेवणानंतर एक कपभर दूध घ्यावे. दूध हे पूर्णान्न आहे. दूध एकदा तापवून कोमट केलेले असावे. त्याबरोबर कोणतीही फळे किंवा फळांचे रस मिसळून घेऊ नयेत.

चहा, कॉफी टाळणे योग्य

चहा, कॉफीच्या अतिसेवनाने जठर व आतड्याच्या अंतस्त्वचेचा दाह होतो. त्यामुळे आम्लपित्त, पचनाच्या तक्रारी, अल्सर निर्माण होतात व याचे कर्करोगातही रूपांतर होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी कर्करोग टाळायचा असेल, तर अति चहा, कॉफी घेणे टाळावे.

मद्यपान

अति मद्यपान, धूम्रपान हेही टाळले पाहिजे. कोणतेही व्यसन हे कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. आधुनिक जीवनशैलीत या व्यसनांचे उदात्तीकरण होताना दिसते, ते घातक आहे.

बेकरी प्रॉडक्‍टस

केक, पाव, बिस्किटे आणि इतर सर्व बेकरी प्रॉडक्‍टस ही पचायला कठीण असतात. त्यांच्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. त्यातील बेकिंग पावडरचा जादा वापर हानीकारक ठरत असल्याने अकाली वृद्धत्वाबरोबरच कर्करोगालाही आमंत्रण मिळते.

तेलकट पदार्थ

शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्‍यकता असते. त्यामुळे तेला-तुपाचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा. परंतु हा वापर तळकट आणि मसालेदार पदार्थांच्या रूपात करणे अहितकारक आहे. कॅन्सर उपचारादरम्यान जास्त मसलेदार किंवा तिखट पदार्थ वर्ज्य करावे.

कडधान्ये

कडधान्ये शरीराची प्रथिनांची गरज पूर्ण करतात. त्यामुळे आहारात कडधान्यांचा वापर असावा. कडधान्ये नेहमी मोड आलेली खावीत.

काय नको

कर्करोगात दही आहारातून वर्ज्य करावे. ताक चालेल. अतिमीठाचे सेवन टाळावे. मांसाहार करू नये. अति शिजवलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नयेत. फ्रोझन पदार्थ तसेच थंड पेये, अति गरम पदार्थ नसावेत.

डॉ. दिलीप निकम

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 1 Sep 2017 1:12 PM GMT
Next Story
Share it
Top