Home > हेल्थ > सामूहिक ध्यानसाधनेचे महत्त्व

सामूहिक ध्यानसाधनेचे महत्त्व

सामूहिक ध्यानसाधनेचे महत्त्व
X

जेव्हा १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी.पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय तत्त्व मांडले होते की एका अणूचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. हाच अणुविस्फोट होय.

हे तत्त्व मानवी ऊर्जेच्या बाबतीत ऋषीकालात मांडण्यात आले होते. पृथ्वीवरील केवळ ४% लोक ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आजच्या काळातील माणसांनी जर ९० दिवस सलग ध्यान केले तर कुटुंबातील इतर व्यक्तींवर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञांना यामागचे कारण कळले नाही म्हणून त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

ध्यान कसे करावे?

आयुष्याचा बहुतेक काळ आपण चेतनेच्या तीन अवस्थांत जगत असतो.

१- जागृती

२- स्वप्न

३- निद्रा

चेतनेच्या जागृतावस्थेत आपण पंचेद्रियांच्या मार्फत जगाचा अनुभव घेत असतो. उत्कर्ष आणि आनंद या ज्ञानेंद्रियांमार्फत शोधत असतो. जर यातले एकही ज्ञानेंद्रिय काम करत नसेल तर त्या ज्ञानेंद्रियाचे सगळे परिमाणच बदलून जाते. ज्याला ऐकू येत नाही तो ध्वनीच्या सगळ्या जगालाच मुकतो. तसेच ज्याला दिसत नाही तो दृश्य दुनियेला, रंगांना मुकतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय हे त्या अनुभूतीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

मन हे ज्ञानेंद्रियापेक्षा उच्च आहे. मन हे असीम आहे. त्याच्या इच्छा-आकांक्षा अनेक. पण आनंद भोगण्याची ज्ञानेंद्रियांची कुवत मर्यादित. हाव म्हणजे इंद्रियगोचर वस्तूंची अधिक प्रमाणात मागणी. जरी माणसाला त्याच्या आयुष्यभरात एका मर्यादेतच उपभोग घेता येत असेल तरी त्याला जगातली सगळी संपत्ती हवी असते.

इंद्रियगोचर बाबींना अतिमहत्त्व देण्याने हाव वाढते. ज्ञानेंद्रियांना अतिमहत्त्व देण्याने तीव्र वासना वाढते आणि मनाला आणि त्याच्या आकांक्षांना अतिमहत्त्व देण्याने विभ्रम वाढतो.

आपण मनातल्या संकल्पनांना धरून ठेवतो आणि गोष्टी एका ठराविक पद्धतीने व्हायची वाट बघत बसतो. अशा प्रकारे मनातल्या कल्पनांमुळे, आपलाच भाग असलेली असीम चेतना अनुभवण्यास अडथळा येतो. याचा अर्थ असा नाही की ज्ञानेंद्रिये किंवा मन वाईट आहे. पण आपण सतत गोष्टींमध्ये भेद करायला शिकले पाहिजे आणि जे घडते आहे त्याबद्दल सजग राहिले पाहिजे. मगच मनात स्पष्टता येईल. चेतनेच्या उच्च स्तरावर पोहोचण्याची ही पहिली पायरी आहे.

जागृतावस्थेत माणूस सतत बघण्यात, खाण्यात, कार्य करण्यात वगैरे गुंतलेला असतो. दुसरे टोक म्हणजे निद्रावस्था. ज्यात माणूस पूर्णपणे सगळ्यापासून अलग आणि सुस्त असतो. तो सुस्तपणा आणि जडत्व जागे झाल्यानंतरही रेंगाळत राहते. माणूस जितका झोपेल तितकी जास्त सुस्ती येते. कारण झोपेत बरीच ऊर्जा खर्च होते.

त्यानंतर येते स्वप्नावस्था. जेथे माणूस धड झोपलाही नसतो आणि जागाही नसतो. इथे तुम्हाला विश्रांतीही मिळत नाही आणि भोवतालच्या परिसराची जाणीवही नसते.

चेतनेचा उच्च स्तर कुठेतरी जागृतावस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्था यांच्या मध्ये असते. इथे आपल्याला माहीत असते की आपण ‘आहोत,’ पण हे माहीत नसते की आपण कुठे आहोत. मी ‘आहे’ पण मला माहीत नाही ‘कुठे’ आहे किंवा ‘ काय’ आहे... या अवस्थेला ‘शिव’ म्हणतात. ही अवस्था जितकी जास्तीत जास्त विश्रांती मिळणे शक्य असेल तितकी गहिरी विश्रांती देते. आणि ती ध्यानातून मिळू शकते.

ध्यानाने दोन प्रकारे फायदा होतो. ते तणावाला आपल्या यंत्रणेत शिरकाव करून देत नाही आणि त्याचवेळी जमा झालेला तणाव काढून टाकते. ध्यानाचा रोजच्या जीवनात अंतर्भाव केल्याने ज्याला 'वैश्विक चेतना' म्हणतात, त्या चेतनेच्या उच्च स्तराचा, आपल्यात उदय होतो. संपूर्ण विश्व हा आपला प्रत्येकाचा भागच आहे असे वैश्विक चेतना मानते. आपल्यात आणि जगात प्रेम अगदी जोशाने वहात असते. हेच प्रेम आपल्याला आपल्या विरोधात असलेल्या आणि त्रासदायक असलेल्या गोष्टींवर मात करण्याचे बळ देते. क्रोध आणि अपेक्षाभंग या क्षणभंगुर भावना बनतात, ज्या क्षणभर येतात आणि नाहीशा होतात.

चेतनेचा उच्च स्तर अचानक कधीतरी येत नाही. चेतनेचे रोपटे तुमच्यातच आहे. ध्यानासारख्या आध्यात्मिक साधनेने त्याचे पोषण केले पाहिजे. काही नारळाची झाडे तीन वर्षांनी फळ देतात तर काही दहा वर्षांनी. आणि ज्यांचे पोषण झाले नाही ते कधीच फल देत नाहीत ते फक्त असतात.

चेतनेचा उच्च स्तर गाठण्यासाठी काही गुंतागुंतीची योजना लागत नाही. फक्त सोडून देण्याची कला शिकावी लागते. ज्ञानाचा योग्य मेळ घालणे, समजण्याची पात्रता आणि साधना याने जीवनास परिपूर्णता येते. तुम्ही जेव्हा चेतनेच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचता तेव्हा तुमच्या लक्षात येते की वेगवेगळ्या परिस्थितीत आणि त्रासात तुमचे संतुलन जाऊन तुम्ही कोलमडत नाही. तुम्ही मजबूत तरीही नरम असता, एक नाजूक आणि सुंदर व्यक्ती. जीवनातील मूल्ये अगदी सहज अंगीकारू शकता. जशी तुमची चेतना खुलत जाते आणि सगळी यंत्रणा शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या उन्नत होते तसे तुमचे जीवन जगण्यायोग्य होते.

डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 3 Aug 2017 7:25 PM GMT
Next Story
Share it
Top