Home > हेल्थ > संपूर्ण पंचकर्म

संपूर्ण पंचकर्म

संपूर्ण पंचकर्म
X

पंचकर्माच्या ५ मुख्य प्रक्रीया आहेत.

रोगाच्या स्वरूपानुसार त्या त्या दोषासाठी वेगवेगळ्या प्रक्रीया केल्या जातात.

पंचकर्म

१) वमन

२) विरेचन

३) बस्ती

४) नस्य

५) रक्तमोक्षण

हे शोधन कशा पद्धतीने करतात?

पूर्वकर्म :-

ह्या प्रक्रीया करण्यापूर्वी शरीरातील वाढलेले दोष जे शरीर घटकांना काही वेळा चिकटून बसलेले, त्यात लपून बसलेले असतात त्यांना त्यापासून मोकळे करून मध्य मार्गात (आतड्यात) आणले जातात. जेणेकरुन ते सहजरित्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना करावी लागते. ह्यालाच पूर्वकर्म म्हणतात. ही २ प्रकारची आहेत.

१) स्नेहन २) स्वेदन

स्नेहन - काही दिवस आधीपासून पोटातून औषधी तुपं एका विशिष्ट मात्रेत प्यायला देउन, तसेच अंगाला मालिश करून (थोडक्यात शरीराला आंतरबाह्य स्निग्ध करून) चिकटून बसलेले दोष सुटे केले जातात. जसे तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही, किवा स्निग्धतेमुळे चिकटून बसलेले घटक सुटे होतात त्याचप्रमाणे हे घडते.

स्वेदन - शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने घाम येईल असे उपाय करून (वाफेचा शेक, सोना किवा स्टीम बाथ ई.) देउन उष्णतेमुळे सुटे झालेले दोष वितळून पाझरत पाझरत मध्यमार्गात येतात. दोषांच्या शक्तीनुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार हे पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ७ दिवस करावे लागते. त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना शरीरातून बाहेर काढले जाते.

मुख्य कर्म

वमन - दोषाना उर्ध्व मार्गाने (वरच्या बाजूने) शरीराबाहेर काढणे- अर्थात उलटी वाटे तोंडावाटे दोषाना बाहेर काढणे. ही क्रिया प्रामुख्याने ज्या रोगात दुषित कफ दोषाचे प्रमाण शरीरात वाढलेले असते अशा रोगात करतात. (अनेक प्रकारचे त्वचारोग, आम्लपित्त, दमा ई.) पूर्वकर्मानंतर आतड्यात वरील बाजूला किवा जठरात जमा झालेले दोष उलटीचे औषध, सहज उलटी होइल अशा काढ्याबरोबर/दुधाबरोबर प्यायला देवून तोंडातून बाहेर काढले जातात. प्यायला दिलेला काढा, औषध याचे प्रमाण मोजलेले असते. उलटीवाटे बाहेर पडलेले द्रव्य ही मोजले जाते त्याचे स्वरूप वास याची नोंद ठेवली जाते.

विरेचन - खालच्या बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन. विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे. अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली जळजळ असते, पित्ताची डोकेदुखी, आंगावर गांधी उठणे, काही प्रकारचे अर्श (पाईल्स), कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते. यांच्यातही मलवेगाची त्याच्या स्वरूपाची नोंद ठेवली जाते.

बस्ती - ही वात दोष वाढलेला असल्यास मुख्य उपचार म्हणून दिली जाते. बस्ती म्हणजे औषधी काढे, कधी केवळ तेल असे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडले जाते. यामुळे आतडयातील कोरडे मलाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. अनेक वातव्याधी (सांधेदुखी, कंबरदुखी), हाडांचे रोग, आतड्यातील विकार, त्वचारोग यात बस्तीची उपाययोजना केली जाते.

नस्य - नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे. मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो. ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात पक्षाघात, आर्दीत(facial palsy) याचा बराच चांगला उपयोग होतो.

रक्तमोक्षण - रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्ताला शरीराबाहेर काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण त्वचाविकारात जेथे चिकट स्त्राव होत असतो तिथे जळवा लागत नाहीत अशाठिकाणी काही वेळा सिरीन्जीन्ग करून रक्त काढले जाते

वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार, शेकाचे-स्वेदनाचे प्रकार, शिरोधारा, कटीबस्ती, जानुबस्ती हे सुद्धा पंचकर्माशी निगडीत काही उपचार आहेत. जे कहीवेळा एखादा पंचकर्मापैकीचा उपचार करताना सहाय्य म्हणून केले जातात किंवा काहीवेळा मुख्य उपचार म्हणूनही करावे लागतात.

Updated : 25 May 2017 12:30 PM GMT
Next Story
Share it
Top