Home > हेल्थ > रेडीओथेरपीचे उपचार आणि घ्यावयाची काळजी

रेडीओथेरपीचे उपचार आणि घ्यावयाची काळजी

रेडीओथेरपीचे उपचार आणि घ्यावयाची काळजी
X

रेडीओथेरपी दुष्परिणामांचे मुख्यत : दोन प्रकार असतात. रेडिएशन सुरु असताना किंवा संपल्यावर पहिल्या तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या दुष्परिणामांना acute असे संबोधले जाते. 6 महिन्यांनंतर होणाऱ्या दुष्परिणांमाना chronic संबोधले जाते.

तोंड किंवा गळ्याच्या रेडीओथेरपीचे दुष्परिणाम व उपचार : रेडीओथेरपीचे उपचार दीर्घ काळापर्यंत चालतात. तसेच त्यामुळे होणाऱ्या जखमा नवीन पेशी न बनल्यामुळे लवकर भरून येत नाहीत. रेडीओथेरपी दरम्यान तोंडाला छाले येणे, गिळताना त्रास होणे, थुंकी येणे, तोंड कोरडे पडणे, चव बदलणे, इत्यादी त्रास होतात. हे सर्व त्रास टाळण्यासाठी तोंडाची निगा राखणे, सतत गुळण्या करणे गरजेचे असते.

दातांची निघा : तोंडाला रेडीओथेरपीचे उपचार सुरु करण्यापूर्वी सर्व रुग्णांना दाताच्या डॉक्टरांकडे पाठविणे गरजेचे असते.

1. फ्लोराईड जेल दाताला लावणे.

2. दातांची स्केलिंग करणे.

3. दात हालत असल्यास काढणे.

4. दात काढल्यावर जखम भरण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देवून मगच रेडीओथेरपीचे उपचार करावेत.

5. रेडीओथेरपीचे उपचार झाल्यानंतरदेखील दातांची समस्या उद्भवल्यास किमान वर्षभर दात काढू नयेत. तसेच दातांचे उपचार करण्यापूर्वी रेडीओथेरपीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी.

रेडीओथेरपीचे उपचार सुरु असताना घ्यावयाची काळजी :

1. तंबाकू, बिडी, सिगारेट, मिशारी तत्सम पदार्थ बंद करावेत

2. दिवसाला ७ ते ८ वेळा बीटाडीन / हेग्झिडीन / benzidamine (अल्कोहोल फ्री) पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात. तसेच पाणी, मीठ व चिमुटभर खाण्याचा सोडा घेवून ७ ते ८ वेळा गुळण्या कराव्या. दोन्ही मिळून १५ ते १६ वेळा गुळण्या कराव्या.

3. रेडीओथेरपीमुळे त्वचा नाजूक होते. त्यामुळे त्वचेची काळजी घ्यावी.

4. रेडीओथेरपी उपचारादरम्यान दाढी करू नये, कात्रीने इजा न होता केस कापू शकता.

5. तिखट / तेलकट पदार्थ वर्ज्य करावे.

6. मऊ इजा न होणारे टूथ ब्रश वापरावे.

7. पाणी भरपूर प्यावे (३ ते ४ लीटर रोज).

तोंड कोरडे पडणे (xerostomia) : पॅरोटिड ग्रंथी तसेच salivary ग्रंथींमध्ये लाळ बनवली जाते. तोंडाची निघा राखणे, अन्न चावण्यास मदत करणे, अन्न पचन होण्यास मदत करणारी एन्झाईम्स बनवणे, तोंडाला इजा तसेच इन्फेक्शन होऊ न देणे इत्यादी साठी लाळ मदत करते. रेडीओथेरपी उपचारादरम्यान वरील ग्रंथीना इजा झाल्यास लाळ कमी बनते किंवा इजा गंभीर असल्यास पूर्णतः बंद होते. त्यामुळे तोंड कोरडे पडून रुग्णाला जेवण्यास त्रास होतो. पॅरोटिड ग्रंथीना इजा टाळण्यासाठी आय.एम.आर.टी. रेडीओथेरपी उपचार पध्दती अधिक सोयीस्कर असल्याकारणाने तिचा आग्रह धरावा. कोबाल्ट मशीनवर उपचार शक्यतो टाळावे. वरील उपायाशिवाय खाली नमूद केलेल्या गोष्टी कराव्यात

1. चहा / कॉफी बंद करावी.

2. ज्याने तोंडाला पाणी सुटेल असे आंबट पदार्थ तोंडात धरावे.

3. कॅन्डीज / गम / मिंट खावे.

4. sorbitol गोळ्या किंवा wetmouth spray

शस्त्रक्रिया नंतर करावयाचे व्यायाम : तंबाकूजन्य पदार्थ खाल्यामुळे तोंडात फायब्रोसीस होऊन तोंड उघडण्यास कठीण जाते. याला ट्रीसमस (trismus) म्हटले जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तोंड कमी उघडणे, मान घट्ट होते. यासोबत रेडीओथेरपीचे उपचार केल्यास फायब्रोसीस होऊन मानेला आणखीनच घट्टपणा येतो. यासाठी गोळ्या ओषधे उपलब्ध नसून केवळ व्यायाम करणे ऐवढाच पर्याय रुग्णापुढे असतो.

तोंड उघडण्याचे व्यायाम : तोंड उघडण्यासाठी नियमित व्यायाम करावा त्यासाठी लागणारी उपकरणे stacked tongue depressor, corkscrew devices, therabite, dynasplint trismus system बाजारात उपलब्ध असून डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांचा वापर करावा.

मानेचे व्यायाम : दोन्ही खांदे न हलवता फक्त मान चोहू बाजूने हालवून व्यायाम करावे, youtube वर व्यायामाचे प्रकार उपलब्ध असून ते पाहून शिकता येईल.

ओटीपोटाचे रेडीओथेरपीचे उपचार आणि घ्यावयाची काळजी : गर्भाशय, सेर्विक्ष, रेक्टम, गुदद्वार, योनी, प्रोस्टेट, ब्ल्याडर, इत्यादी कॅन्सर रोगामध्ये ओटीपोटाला रेडीओथेरपीचे उपचार दिले जात असतात. अशावेळी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1. त्वचेची काळजी घ्यावी (त्वचेची काळजी लेख वाचवा)

2. कपडे घट्ट नसावे, गौण, लुंगी इत्यादी सैलसर कपडे घरी वापरावेत

3. पोट वाढलेल्या व्यक्तींना घड्या पडल्यास त्वचेला इजा होऊन जखम होऊ शकते, जखम झाल्यास खेळती हवा राहील असे कपडे वापरा

4. रेडीओथेरपीचे उपचार सुरु असताना जांगे मध्ये खाज आल्यास जखम होईल असे खाजवू नये, जखम झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

5. लागवीस जळजळणे, सारखे सारखे लागवी येतेय असे वाटणे, उन्हाळा लागणे, कधी कधी लाघवी वाटे रक्त जाणे आदी त्रास होत असल्यास पाणी भरपूर प्यावे (३ ते ४ लीटर रोज), सिरप cital किंवा डॉक्टरांच्या सल्लाने औषधी घ्यावी.

6. जुलाब होणे, गुदद्वार भोवती जखम होणे, दुखणे, रक्त येणे, मूळव्याधचा त्रास वाढणे आदी त्रास होत असल्यास लोमोटील, इम्मोडीयम, xylocaine जेल किंवा डॉक्टरांच्या सल्याने उपचार करावेत. लिम्फइडिमा/ हाताची सूज स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्तन तसेच बगलेत असणाऱ्या लिम्फ नोड गाठी देखील काढल्या जातात. त्यामुळे हाताला सूज येते, हाताची सूज कमी करण्यासाठी हाताचे व्यायाम करणे फार गरजेचे असते. योग्य व्यायाम केल्यास सूज कमी होते. जर कमी नाही झाल्यास मसाज करावा, मसाज करताना बोटाकडून सुरुवात करून वर खांद्याकडे करत जावे तसेच शाळेत पी.टी. चे व्यायाम शिकवितात ते करावेत. सूज कमी होत नसल्यास फिजिओथेरपिस्टच्या सल्याने उपचार करावेत.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग,

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 14 July 2017 2:10 PM GMT
Next Story
Share it
Top