Home > हेल्थ > पंचकर्म कधी करतात?

पंचकर्म कधी करतात?

पंचकर्म कधी करतात?
X

१) आजारानुसार पंचकर्म -

आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे. पेशंटची आजाराची लक्षणे पाहून, नाडी आणि पोट तपासून डॉक्टरला व्याधीची अवस्था कळते. अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या, काढे औषधे देऊन व्याधी आटोक्यात राहणारा, बरा होण्यासारखा नसतो. अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.

२) आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.

उदा. खूप दिवस मलप्रवृत्ती न झाल्यास, मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून वमन द्यावे लागते.

३) ऋतूनुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते. अशावेळी काही आटोक्यात असलेल्या (सध्या लक्षणे न दिसणाऱ्या) व्याधी बळावतात. जोर धरतात. अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.

४) विशिष्ट आजार लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषाबदल पाहून ऋतूनुसार एखादा उपचार सुचवला जाऊ शकतो. उदा.स्थूल (obese) स्वेदन.

५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन उपचारापूर्वी हे उपचार केले जातात

ह्या पंचकर्माचा साधारण कालावधी काय?

प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे. व्याधीच्या गरजेनुसार, ऋतूनुसार, प्रकृती (body constitution) नुसार रुग्णास उपचार केला जातो. काहीवेळा शोधन उपचारापूर्वीचे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार) केल्यानंतर दोषांची गती (दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.

दोषांच्या शक्तीनुसार, प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते. त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते. बस्ती, नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात. रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते. काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात

पंचकर्मासाठी पथ्य :-

कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे. मग ती कोणतीही उपचार पद्धती असो. हे उपचार करण्यापूर्वी, ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारासंबंधीचे पथ्य पाळावेच लागते. यात अगदी खाण्यापिण्यापासून, गरम कपडे, आंघोळीसाठी गरम पाणी, थंड हवेत न जाणे, दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोरपणे पाळावेच लागते.

इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात. मात्र, अनुभवी वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात. ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने, काहीवेळा औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते. पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बऱ्याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलांचे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.

वेगवेगळ्या व्याधीत, लक्षणानुसार, वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे, काढे, शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात. या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत. आजाराच्या विशिष्ट अवस्था, वय, गर्भार स्त्री, अतिनाजूक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.

यासर्व उपचारापूर्वी, उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर (त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणांची, (vital signs) ची नोंद ठेवली जाते. हा एक वैद्यकीय उपचार आहे. प्रशिक्षीत डॉक्टरच्या सल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा.

Updated : 1 Jun 2017 6:54 PM GMT
Next Story
Share it
Top