Home > हेल्थ > दिनचर्या कशी असावी?

दिनचर्या कशी असावी?

दिनचर्या कशी असावी?
X

अनेक आजारांचे मूळ आपल्या सवयी मध्ये लपलेले आहे. सदोष दिनचर्या, असंतुलित व अवेळी घेतला जाणारा आहार, असमाधानी वृत्ती, सततची चिडचिड, आजारात औषधे घेण्यात हानाकानी अशा अनेक कारणांनी आपले आयुष्य बिघडत असते. जेव्हा आरोग्य बिघडू लागते तेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार करून घेतो. दोन चार दिवसांनी बरेही वाटते, मात्र महिन्याभरात पुन्हा तब्बेत बिघडते. हे चक्र सतत चालूच राहते आणि पुढे एखादा दीर्घकाळ टिकणार आजार जडून जातो. औषधे वेळेची गरज असते, आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी व त्यातून बरे करण्यासाठी केलेली ट्रीटमेंट असते. मात्र आजारांचे सातत्य टिकवून ठेवण्यात आपल्या दिनचर्येचा फार मोठा हात असतो. म्हणून प्रथम दिनचर्या सुधरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कशी असावी दिनचर्या हे पाहू.

रात्रीची झोप किमान ७ ते ८ तास व्हायलाच पाहिजे. यासाठी रात्री लवकर बेडवर जाणे अतिशय गरजेचे आहे. केवळ लवकर झोपायला गेल्यानेच पूर्ण झोप मिळू शकते. कारण सकाळी उठून दिवसभराच्या कामाचा आराखडा आधीपासूनच तयार असतो, त्यात बदल करणे शक्य नसते, सगळीकडे वेळेवर पोहोचणे यासाठी आपण वचनबद्ध असतो. मात्र संध्याकाळी घरी आल्यानंतरचा काळ आपल्या हातात असतो. रोज ठरल्याप्रमाणे नव्हे, आरोग्यासाठी यात थोडा बदल केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत रात्री दहापर्यंत जर झोपायला जायला मिळाले तर समजा उत्तम आरोग्यासाठीची पहिली पायरी आपण जिंकलो. यासाठी बाहेरील काम संपवून घरी वेळेवर येता आले पाहिजे. घरी यायची ओढ असली पाहिजे. (लग्न वगैरे झाल्यावर सुरवातीला आपण हा प्रयत्न नेहमी केलेला आहे व इतरांनाही वेळेवर घरी पोहोचताना पहिले आहे) पत्नीची, आई वडिलांची, मुळाबाळांची ओढ असली की सर्व काही बरोबर होते. आपण मनात आणले तर घरी वेळेवर पोहोचू शकतो.

अनेकदा आपण घरी लवकर येतो मात्र जेवण वगैरे उरकल्यानंतर टीव्ही समोर तळ टाकून बसतो आणि कधी बारा वाजले ते लक्षातच येत नाही. बरं सकाळी पुन्हा पाच साडेपाचला उठायचे असते. ते उठले जात नाही. अरे उठ, उशीर होईल, असा आईचा सूर, तर कधी पत्नीचा अहो, उठा आता. किती वेळा उठवायचे ? रात्री वेळेवर का झोपत नाहीत? हे प्रेमाचे पण आपल्याला किरकिर वाटणारे शब्द कानावर घेत 'उठतो ग बाय' म्हणत वैतागत उठायचे. म्हणजे दिवसाची सुरवातच काहीशी नाराजीची, पुढे उशीर होत जातो आणि घाई गडबडीत ऑफिस किंवा इतर नोकरीसाठी न खातापिता पळावे लागते. इथेच आरोग्य बिघडण्याची सुरवात होते. आता मला सांगा, अशी जर आपली संध्याकाळ आणि सकाळ अश्या प्रकारची असेल तर यात व्यायामासाठी वेळ कसा काढला जाईल. दिवसाची सुरवात आणि शेवट दोन्हीही विचित्र. आपणच ठरवून ठेवलेला. मग कोणी वॉकला चला म्हटलं तर वेळ कुठे आहे ? असे म्हणत खरं तर आपणच आपले नुकसान करून घेत असतो. तर आता उद्यापासून रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे सुरु करा. (आपला उद्या कधीच येत नसतो, मात्र आता आळस नको)

इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की, आपल्याला कोणीही बदलु शकत नाही. आपण स्वतःच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करायचा असतो. आज जर आपण आपल्या आरोग्यासाठी चांगला विचार केला, त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले तर उतारवयात हेच शरीर ठणठणीत राहते. अन्यथा असाह्य म्हातारपण पदरात पडते. म्हणून आजच सुरवात करूया, चांगल्या सवयी लावून घेऊया. स्वतःही प्रयत्न करूया आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देऊया !

Updated : 10 Jun 2017 7:07 AM GMT
Next Story
Share it
Top