Home > हेल्थ > चला, बोलू या, नैराश्य टाळू या !

चला, बोलू या, नैराश्य टाळू या !

चला, बोलू या, नैराश्य टाळू या !
X

''चला, बोलू या, नैराश्य टाळू या!'' हे या वर्षाच्या जागतिक आरोग्य दिनाचं घोषवाक्य आहे. दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असतो आणि या आरोग्य दिनानिमित्त वेगवेगळ्या आजारांविषयी वेगवेगळी घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटना ठरवित असते. परंतु जगात दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि अजूनही मानसिक आजार लपविण्याकडेच किंवा ते ओळखता येत नसल्याने या समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ''चला, बोलू या, नैराश्य टाळू या!'' हे घोषवाक्य ठरवलं आहे.

आधुनिक, वैज्ञानिक, तांत्रिक, भौतिक प्रगतीमुळे एकीकडे माणसाचे शारीरिक कष्ट कमी होत असून सोयी-सुविधांमध्ये वाढ होत आहे. पण, दैनंदिन जीवनातील वाढते ताणतणाव, स्पर्धा, संयमाचा अभाव, मोडकळीस येत चाललेली कुटुंब व्यवस्था, वाढते शहरीकरण, अनुवांशिकता, निसर्गाचा लहरीपणा, युद्धजन्य परिस्थिती अशा विविध कारणांनी मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.

काही शारीरिक आजार झाल्यास, अपघात झाल्यास संबंधित व्यक्ती डॉक्टरकडे स्वत:हून जाते किंवा अशा व्यक्तीस कुटुंबिय डॉक्टरांकडे घेऊन जातात व उपचार करुन घेतात. पण मानसिक आरोग्याकडे बघण्याची नकारात्मक वृत्ती, मुळात मानसिक आजार झाला आहे हेच न समजणे, याविषयी जागरुकता नसणे अशा विविध कारणांमुळे वेळीच मानसिक आजारांवर उपचार करुन घेतले जात नाहीत आणि असे आजार पुढे बळावत जातात. खूप असहाय्यता निर्माण झाल्यावर वैद्यकीय मदत घेतली जाते. पण, तो पर्यंत बऱ्याचवेळा खूप उशीर झालेला असतो. म्हणून वेळीच उपचार घेणे खूप महत्वाचे असते.

एखाद्या व्यक्तीस मानसिक आजार झाला आहे, ही ओळखण्याची काही लक्षणं म्हणजे व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकलकोंडेपणा, दैनंदिन कामकाजात टाळाटाळ किंवा चूका, वजन खूप कमी होणे किंवा वाढणे, खूप भिती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, कामकाजाची इच्छा कमी होणे, आत्महत्या करण्याची धमकी देत राहणे तथा प्रयत्न करणे, मनात आत्महत्येचा विचार येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

बालकातील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणूकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भिती इत्यादी लक्षणे दिसून येतात. विद्यार्थी असल्यास शिक्षणावर विपरीत परिणाम होणे, त्यांची संगत बिघडणे, खोटे बोलणे, स्वच्छता टापटीपपणाकडे दुर्लक्ष होणे, चेहरा चिंताग्रस्त दिसणे आदी मानसिक आजाराची लक्षणे आहेत. महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित तसेच बाळंतपणापूर्वी, बाळंतपणानंतर उद्भवणारे मनोविकार दिसून येतात. जेष्ठ नागरिकांमध्ये सर्व साधारणपणे वरील विकारांबरोबर नैराश्य, स्मृतीभ्रंश आदी लक्षणे दिसतात.

मानसिक आजाराचे प्रमुख प्रकार म्हणजे मनाची दूभंग अवस्था (स्किजोफ्रेनिया) नैराश्य किंवा उदासिनता (डिप्रेशन), सतत वाटणारी चिंता (ऍनेक्झीटी), मनोलैगींक विकार, मानसिक शारिरीक विकार, अतिआनंदी, अतिदु:खी अवस्था (बायोपोलर), इ. प्रमुख प्रकार आहेत.

मानसिक आजाराची लक्षणे म्हणजे स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो.

कॅटॉटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस राहतो. एका पायावर उभे राहिला तर तसेच उभे राहील, एकटक पहात राहिला तर तसेच पहात राहील. अशा रुग्णांना प्रसंगी शॉक ट्रिटमेंट देखील द्यावी लागते. पण अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.

पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयखोर असतो. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा संशय घेत राहणार. त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती शेवटी घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण आत्महत्या करतात किंवा जोडीदाराची हत्या करतात. ते सतत डोक्यात कटकारस्थाने रचत असतात. कधी तरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.

नैराश्य (डिप्रेशन) हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही येऊ शकते. यासाठी घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडी बनते. त्यामुळे ती नैराश्यामध्ये लवकरच जाते. काही वेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाही आणि एकलकोंडेपणा वाढत जातो.

फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भिती वाटत राहते. ही भिती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची असते. एका मर्यादेपलिकडे भिती गेली की, त्याला फोबिया म्हणतात.

रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे.

मुळातच मानसिक आजार झाल्यावर त्याची लक्षणं ओळखून तात्काळ उपचार घेणे आवश्यक असले तरी मानसिक आजार होऊ नये यासाठी आपण सजग राहिले पाहिजे. यासाठी काही उपाय म्हणजे योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य विश्रांती, योगासने, ध्यानधारणा, चांगली संगत, वेळेचे व्यवस्थापन, विधायक कृतीमध्ये सहभाग आणि काही ना काही छंद जोपासणे हे होय. या शिवाय आपल्या जीवनाचे निश्चित उद्दिष्ट ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नपूर्वक कष्ट केले पाहिजे. या कष्टांमुळे यश मिळाल्यास या यशाच्या नशेत न राहता भविष्याचा सकारात्मक वेध घेऊन सतत कार्यरत राहिले पाहिजे. आपले उद्दिष्ट साध्य न झाल्यास व अपयश आल्यास आपण ते पचविले सुद्धा पाहिजे आणि हे अपयश पचवून पून्हा यशसिद्धीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. मिळालेले यश किंवा अपयश हे कायमस्वरुपी नसून ते तात्कालिक आहे आणि यापुढेही राहिलेली वाटचाल सुरुच ठेवावयाची आहे, याचे भान व्यक्तीने ठेवले पाहिजे.

आपल्या कुटुंबातील, कार्यालयातील, वर्गातील एखाद्या व्यक्तीत मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास अशा व्यक्तीस आपण त्वरित मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या मानसोपचार तज्ज्ञाने दिलेली औषधं, सांगितलेले उपचार नियमित घेतले पाहिजेत. याशिवाय आवश्यकता असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन देखील घेतले पाहिजे.

एका संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, आत्महत्या करणाऱ्या किंवा आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये 60 टक्केहून अधिक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मानसिक आजाराने ग्रस्त असतात. परंतु त्यांनी वेळीच उपचार न घेतल्याने किंवा पूर्णपणे उपचार न घेतल्याने त्याची परिणती आत्महत्येत होते.

महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी, येथे मोठी शासकीय मानसोपचार रुग्णालये आहे. अन्य शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये देखील मानसोपचार उपलब्ध आहेत. या आरोग्य दिनापासून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये अंतरंग समूपदेशन केंद्रे सुरु करण्यात येत असून आदर्श उपचार पद्धती लागू करण्यात येत आहे. मानसिक आजारांशी संबंधित मोफत चाचण्यांची व्यवस्थाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील 30 आरोग्य उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद उपचार केंद्र देखील सुरु करण्यात येणार आहे. या शिवाय खाजगी मानसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. राज्य सरकारने 24 फेब्रुवारी, 2015 पासून 104 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे. रुग्ण व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबिय, मित्र, सहकारी या हेल्पलाईनवर संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करु शकतात.

शेवटी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त राहिली तर कुटुंब, कार्यालय, समाज आणि पर्यायाने आपला देश सशक्त राहील, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

- देवेंद्र भुजबळ

लेखक राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Updated : 6 April 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top