Home > हेल्थ > गडचिरोलीच्या विकासात बंदुकीच्या गोळीपेक्षा औषधाची गोळी महत्वाची !

गडचिरोलीच्या विकासात बंदुकीच्या गोळीपेक्षा औषधाची गोळी महत्वाची !

गडचिरोलीच्या विकासात बंदुकीच्या गोळीपेक्षा औषधाची गोळी महत्वाची !
X

घनदाट जंगलात वसलेल्या एका गावातील घरासमोर एक व्यक्ती आणि त्याच्या समोर काही लोक बसलेले. समोर लाकडाचा एक पाट व त्यावर अनेक बिया पसरलेल्या. तोंडात तो मंत्र पुटपुटत होता आणि पाटावर बियांची विशिष्ट मांडणी करत होता. त्या बिया दोन दोन, तीन तीन अशा लाऊन ठेवत होता. लोकांना विचारल्यावर समजल की, तो माणुस त्या समोरील लोकांचा आजार शोधुन त्यावर उपचार करत होता. त्याच्या मनात वेगवेगळ्या रोगांची नावे होती मनातील नावे आणि बियांच्या विशिष्ट जोड्या जुळल्या की त्याला समजायच की समोरच्या व्यक्तिला कोणता रोग झाला आहे हे त्याला समजचतं आणि त्यावर तो उपचार करायचा. लोक त्यानं सांगितलेले उपाय करायचे.

आज वैद्यकीयशास्त्र इतकं पुढं गेलं आहे की शस्त्रक्रिया शरीराला कोणतीही इजा न करता लेजर तंत्रज्ञानाद्वारे केली जाते. डॉक्टर म्हटलं की, त्याच्या गळ्यात स्टेथोस्कोप, हातात बीपी तपासायची मशिन दिसते. पण अजुनही आदिवासी भागात लोकं डॉक्टर ऐवजी अशा पुजाऱ्यांवर उपचारांसाठी अवलंबून राहतात. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांच चांगलं इंन्फ्रास्ट्र्क्चर उभं राहीलेलं आहे. परंतू आजही लोकं केवळ साप चाऊन मरतात. साध्या साध्या आजारांनी लोकं मृत्युमुखी पडतात.

सर्वसाधारण ठिकाणी एखादा रुग्ण गंभीर असल्यास दवाखान्यात उपचार करत असताना त्याला मरणाशी संघर्ष करावा लागतो. परंतू येथील रुग्णाचा संघर्ष घरातून निघल्यापासूनच सुरु होतो. गावातून दवाखान्यात जाण्यासाठी चारचाकी गाडीची सोय नसते. कारण ती गाडी चालायला इथं रस्ता उपलब्ध नाही. जंगलातील गावातुन टु व्हीलर कशीबशी जाते. बऱ्याच गावात बैलगाडीतुनच रुग्णाला न्यावे लागते. अनेक रुग्ण दवाखान्यात नेण्यापुर्वीच जीव सोडतात. या सगळ्या परीस्थितीमध्ये मुख्य रस्त्यापर्यंत येईपर्यंत अ‍ॅम्ब्युलंसला कॉल करायला गावात नेटवर्क उपलब्ध नसतं. जरी या सर्व परीस्थितीतून रुग्ण जवळच्या सरकारी दवाखान्यात पोहोचला तरी त्याच्या मरणाशी सरकारी संघर्ष सुरु होतो. दवाखान्यात अत्याधुनिक सुविधा उपल्ब्ध नसतात. साधा ऑक्सीजनच्या सिलेंडरचा स्टॉक नसतो. एक ओळखीचा रुग्ण दगावल्यावर मी त्या दवाखाण्यातील डॉक्टरशी संवाद साधला व त्याला विचारलं की “डॉक्टर हा पेशंट अन्य ठिकाणी कोठे असता तर बचावला असता का” ? डॉकटरने उत्तर दिले, का नाही? त्याला लावायला ऑक्सीजनचा सिलेंडर उपल्ब्ध असता तरी तो जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचला असता व तेथे त्यावर उपचार करणे शक्य झाले असते.

मी त्यांना बोललो, डॉक्टर एवढ्या साध्या उपचाराविना लोकांना जीव द्यावा लागतो. तुम्हाला जराही वाईट वाटत नाही का ? तो म्हणाला खुप वाईट वाटतं. वाईट वाटल्यावर मस्त दोन सिगारेट ओढुन देतो. ही परिस्थिती अगदी खरीय. ग्रामिण रुग्णालयात केवळ दोन ऑक्सीजनचे सिलेंडर उपलब्ध असतात. पैकी एक अ‍ॅंब्युलंसमध्ये तर दुसरा रुग्णालयात अशावेळी अनेक रुग्ण आले तर त्यांना तो लावणे अशक्य असते. ते संपले तर स्टॉकला तो ही नसतो. या रुग्णालयांमध्ये वर्षाचा औषधाचा साठा दिला जातो. उपल्ब्ध औषधे डॉक्टरांना पुरवुन पुरवुन वापरावी लागतात. वास्तविक पाहता रुग्णालयातील अधिक्षकांनी ती औषधे संपल्यानंतर तत्परतेने त्यांची मागणी करणे आवश्यक असते. पण तसे घडत नाही. परिणामी किडे मुंग्याप्रमाणे लोकं मरत असतात. याच ना कुणाला वाईट वाटत ना कुणाला खेद.

सरकारी दवाखाण्यात अत्याधुनिक सोयी उपलब्ध नसल्यास नाईलाजाने डॉक्टर संबंधित रुग्णाला नागपूर वा अन्य खाजगी रुग्णालयात रेफर करतो. परंतू येथील लोकांची अर्थिक परीस्थिती नसल्याने ते त्याच डॉक्टरला सांगत्तात डॉक्टर येथीच काय व्हायच ते होउंद्या. नातेवाईकांची मानसिकता रुग्णाला बाहेर नेण्याची नसते. परिणामी रुग्णाच्या जीवाला धोके संभवतात.

आजही बहुसंख्य डीलेवरीज घरातच होतात. तानीबाई कांदो नावाची एक सुईन सांगत होती, आजपर्यंत तिने जवळपास पन्नास डीलेवरी घरातच केल्या आहेत. बाईला दवाखान्यात पोहचवायचं असल्यास बैलगाडी जुंपुन त्यात तनीस (मउ गवत) टाकले जाते. त्यातून त्या बाईला दवाखान्यात पोहचविले जाते. बऱ्याचदा बाई या गाडीतच बाळंत होते.

आरोग्याच्या या सर्व समस्यांना सामोरे जात असताना या भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या जनतेला उत्कृष्ट आरोग्याच्या सुविधा प्राप्त करुन देणे हे आपल्या सरकरचे आद्य कर्तव्य असले पाहीजे. या भागात रस्त्याचे जाळे नसल्यांमुळे जंगलातले अनेक रुग्ण दवाखान्यात पोहचुसुध्दा शकत नाहीत. आरोग्याच्या सुविधा न मिळणं हे लोकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. सरकारने यावर मार्ग काढला पाहीजे. डीप भागात अत्याधुनिक सुविधा पुरविल्या पाहीजेत. बऱ्याचदा या भागात काम करायला डॉक्टर तयार नसतात. कारण स्टॅन्डर्ड ऑफ लिव्हींगशी कॉम्प्रमाईज करायला सहसा कुणी तयार होत नाही. त्यांच्या कुटुंबाला योग्य सुविधा देणे मुलांना योग्य शिक्षण भेटलं तरच ते या भागात योग्य रीतीने सुविधा पुरवू शकतील.

या भागात रस्त्याच्या सुविधा उपलब्ध असल्याने गावात अ‍ँब्युलंस जाउ शकत नाहीत. परंतू यावर उपाय शोधला गेला पाहीजे. लोकांचा प्रवास कमी व्हावा यासाठी मेट्रो बुलेट ट्रेन सुरु करणाऱ्या सरकारला प्रत्येक भागात हेलीकॉप्टर अ‍ँब्युलंस सुरु करणे फार अवघड नाही. लोकांना टेलीफोनची साधने उपलब्ध करुन दिली गेली पाहीजेत. कितीही कठीण परीस्थितीत लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देणे ही जबाबदारी सरकारची आहे आणि ते ही पार पाडत नसतील तर लोकांच्यात असंतोष निर्माण करण्यास सरकारच जबाबदार आहे.

सागर गोतपागर

9421248492

Updated : 13 July 2017 6:51 PM GMT
Next Story
Share it
Top