Home > हेल्थ > औरंगाबाद छावणी परिसरात गॅस्ट्रोचं थैमान

औरंगाबाद छावणी परिसरात गॅस्ट्रोचं थैमान

औरंगाबाद छावणी परिसरात गॅस्ट्रोचं थैमान
X

औरंगाबाद छावणी परिसरात गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले असून गेल्या दोन दिवसात गॅस्ट्रोच्या लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता २५००च्या घरात गेला आहे. आतापर्यंत १८०० रूग्णांवर उपचार करण्यात आल्याचे रूग्णालाकडून सांगण्यात येत असून अजूनही बाधीत रूग्ण छावणीतील सामान्य रूग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रूग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहरातील पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून छावणी परिसरात नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असून या पाण्याच्या सेवनामुळे गॅस्ट्रो लागण झाली आहे.

नागरिकांना रात्रीतून अचानक पोटदुखी, उलट्या, जुलाब यांनी त्रस्त झाले आहेत. सततच्या उलट्या, जुलाबामुळे बाधीत रूग्णाला अशक्तपणा येत असल्याने रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. लहान मुले, महिला- पुरुष, वयस्क अशा सर्वांनाच याची लागण झाली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता नसल्याने अनेक रूग्णांना जमिनीवर उपचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संपूर्ण रूग्णालयात जिथे जमेल तिथे रूग्णाला दाखल करून घेऊन सलाईन देण्यासह इतर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करून अनेक रूग्णांना सुटी देण्यात येत असली तरी, नव्याने तेवढेच रूग्ण दाखल होत असल्याचं सांगण्यात येतंय.

गॅस्ट्रोबाधितांचा आकडा २५०० पोहोल्याने जिल्हा आरोग्य विभागही हादरले असून रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लष्कर, घाटी रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मात्र रूग्णांची संख्या जास्त असली तरी यात कुणीही गंभीर रूग्ण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात पहिल्यांदाच एकाचवेळी एवढ्या जणांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

Updated : 13 Nov 2017 9:41 AM GMT
Next Story
Share it
Top