Home > हेल्थ > ऋतु आणि पथ्यापथ्य अथवा जीवनचर्या

ऋतु आणि पथ्यापथ्य अथवा जीवनचर्या

ऋतु आणि पथ्यापथ्य अथवा जीवनचर्या
X

6 Seasons And Diet/ Lifestyle In Ayurveda

शिशिर / हेमंत ऋतु

पथ्यापथ्य : गोड, आंबट आणि खारट पदार्थ खाणे या ऋतुमध्ये हितकर आहे. हेमंत ऋतुमध्ये पचनक्रिया प्रखर होते. वाढलेला वात थंडीमुळे अवरोधित होतो आणि शरीरातील धातूंना नष्ट करू शकतो. अधिक गोड, आम्ल आणि तिक्त पदार्थांचे सेवन हितकर आहे. गहू, डाळी, बेसन, दुग्धजन्य पदार्थ, उसाचा रस, मका, खाद्यतेल आदींचे सेवन या ऋतुमध्ये हितकर असते.

जीवनचर्या : तेलाने अभ्यंग करणे, केसर, कुमकुम, बेसनापासून बनवलेल्या उटण्याने मालिश करणे, नियमित हलका व्यायाम, नित्य धूपसेवन हे उपयुक्त. चामड्यापासून, रेशीम किंवा लोकरीपासून बनवलेले कपडे घालणे या ऋतुमध्ये उचित असते.

वसंत ऋतु

या ऋतुमध्ये सूर्याची तीव्रता वाढल्याने कफ विरघळायला लागतो, ज्यामुळे शरीरातील अग्नी खासकरून जठराग्नी मंद होऊ लागतो.

पथ्यापथ्य: जवस, मध, आमरस खाणे हितकर. किण्वित आसव, अरिष्टे अथवा काढ़ा किंवा उसाचा रस पिणे या ऋतुमध्ये लाभदायक. उशिरा पचणारे कडक, थंड, खूप गोड, आम्लीय, तेलकट असे पदार्थ खाणे चांगले नाही.

जीवनचर्या: व्यायाम, हलके घर्षण करून मालिश, नस्य, मालिशनंतर कापूर, चंदन आणि कुमकुमयुक्त पाण्याने स्नान आदींनी या ऋतुमध्ये आरोग्यास फायदा होतो. या ऋतुमध्ये एका दिवसात अनेक वेळा स्नान करू नये.

ग्रीष्म ऋतु

या ऋतुमध्ये सूर्याच्या किरणांची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाते. कफ कमी होत जातो आणि वात सतत वाढत राहतो.

पथ्यापथ्य : गोड, हलके व पातळ पदार्थ खाणे हितकर आहे. थंड पाण्याचे सेवन गर्मीमध्ये हितकारी आहे. ठंडाई आणि पानक पंचकर जे पाच प्रकारच्या मधुर पदार्थांपासून बनवले जाते, त्याचे सेवन करायला हवे. मदिरापान या ऋतुमध्ये निषिद्ध आहे कारण त्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा आणि जळजळ उत्पन्न होऊ शकते.

जीवनचर्या : शरीराला चंदनाचा लेप लावून स्नान केल्याने या ऋतुमध्ये लाभ मिळतो. थंड ठिकाणी राहणे आणि हलकी व सुती वस्त्रे परिधान करणे हितकर असते.

वर्षा ऋतु

या ऋतुमध्ये पचनशक्ति अधिकच क्षीण होते. सर्व दोषांच्या विकृतींमुळे पचनक्रिया अधिकच क्षीण होते. म्हणूनच जठराग्नी प्रदिप्त करणे तसेच दोषांचे शमन करणे यास आयुर्वेदामध्ये नेहमीच महत्त्व देण्यात आले.

पथ्यापथ्य : जठराग्नीला प्रदिप्त करण्यासाठी हलका आहार किंवा लगेच पचणारा आहार घेणे उचित असते. डाळी, भाज्यांचे सूप, जुनी धान्ये, ताक यांचे सेवन या ऋतुमध्ये श्रेयस्कर.

जीवनचर्या : पंचकर्माने शरीरशुद्धी, सुगंधित वस्तूंचा प्रयोग हेसुध्दा या ऋतुमध्ये करणे योग्य आहे. दिवसा झोपणे, खूप थकणे, उन्हात फिरणे या ऋतुमध्ये वर्ज्य सांगितले आहे.

शरद ऋतु

वर्षा ऋतुमध्ये शरीरात पित्ताचा संचय होतो. भोजनामध्ये तिक्त, मधुर, कषाय पदार्थांचे सेवन करणे हितकर आहे.

पथ्यापथ्य: हलका आहार म्हणजे लवकर पचणारे अन्न उदा. तांदूळ, हरभरा, आवळा, मध, शर्करा या घटकांचे सेवन हितकर आहे. जड अन्न, उशिरा पचणारे अन्न वा भोजन, दही, तेल आणि मदिरापान या ऋतुमध्ये वर्ज्य आहे.

जीवनचर्या : चंदनयुक्त उद्वर्तन, गरम पाण्याने स्नान आणि मोत्याची आभूषण या ऋतुमध्ये परिधान करण्यास आयुर्वेदात सांगितली आहे.

Updated : 21 July 2017 11:17 AM GMT
Next Story
Share it
Top