Home > हेल्थ >  आरोग्य म्हणी

 आरोग्य म्हणी

 आरोग्य म्हणी
X

पथ्य आणि आहार हा असा प्रकार आहे की डॉक्टरांनी कितीही सांगितले तरी तो टाळण्याकडे रुग्णांचा कल असतो. आपल्या जिभेला पसंत पडेल ते खावे, प्यावे असे वाटत राहाते आणि मला आता काहीच त्रास नाही, असे व्यक्ती स्वत:लाच खोटे खोटे सांगते.

पण रोजच्या खाण्यापिण्यात सगळ्यांनीच सामान्यपणे पाळायच्या गोष्टी नीरसपणे न सांगता थोड्या गंमतीशीर पद्धतीने मांडल्या तर त्यांची मनात उजळणी होत राहाते आणि फास्ट लाइफमध्ये त्या लक्षात ठेवणे शक्य होते. मग काही पथ्ये पाळावी असे आपोआप वाटू लागते. ‘आरोग्य म्हणीं’च्या रूपाने आहाराचे गमक अशाच रंजक शब्दांत आज वाचकांसमोर ठेवत आहे. घरातल्या लहानांच्या तोंडीही हे शब्द सहज रुळतील...

१. खाल दररोज गाजर-मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेली कडधान्ये करावी फस्त.

३. डाळी भाज्यांचे करावे सूप, अखंड राहील सुंदर रूप.

४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त, आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटातील वाजंत्री.

६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.

७.पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका, आरोग्य धोक्यात आणू नका.

९. दररोज एक फळ खाऊ या, आरोग्याचे संवर्धन करूया.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास, थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि क्षार, आहारात यांचे महत्त्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज, राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३. जेवणानंतर केळी खा, पाचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप (बाजारचे) यांचे अतिसेवन नको, मधुमेह, लठ्ठपणाला आमंत्रण नको.

१५. खावी रोज रसरशीत फळे, सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुखा मेवा ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्त्वांचा नाश करू नका.

२०.दिवसभरात प्या पाणी १५/२० ग्लास, थकव्याचा कायमचा होईल ऱ्हास

२१. जो घईल सकस आहार, दूर पळतील सारे आजार.

२२. भाजीपाल्याचं एकच महत्त्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व

२३. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग...तिचा पाला तिचं अंग...सत्त्व आहे तिच्या संगं!

२४. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबीवाणी!

२५. जेवणानंतर तासाभरात गरम पाणी प्या, उत्तम आरोग्याचा लाभ घ्या.

डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 11 Aug 2017 6:45 AM GMT
Next Story
Share it
Top