Home > हेल्थ > अहो फडणवीस, नाशिकचं गोरखपूर झालंय!

अहो फडणवीस, नाशिकचं गोरखपूर झालंय!

अहो फडणवीस, नाशिकचं गोरखपूर झालंय!
X

गोरखपूरमध्ये सराकारी रुग्णालयात ७० बालके दगावण्याचे प्रकरण ताजे असतानाच आपल्याकडे महाराष्ट्रातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच महिन्यात 187 अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची खालावलेली स्थितीच समोर आली आहे. नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे .

नाशिक जिल्हा रुग्णालयात 5 महिन्यात 187 बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 39, जून महिन्यात 25, जुलै महिन्यात 36 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 बालकं दगावली आहेत. देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी 40 असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हेच प्रमाण दीडशेच्या वर गेले आहे.. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवलं जातं असल्याचं समोर आलं आहे.

ज्या अतिदक्षता विभागाची क्षमता 18 बालकं ठेवण्याची आहे, तिथं तब्बल 52 बालकांवर उपचार सुरु आहेत. लाखो रुपये खर्च करुन खाजगी रुग्णालयात मुलांवर उपचार करणं शक्य होत नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने चिमुकल्यांना मरणाच्या दारात उभं करावं लागतं आहे.

दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्यासाठी 21 कोटींचा निधी वर्षभरापासून पडून आहे. मात्र अजूनही या विस्ताराला आरोग्य विभागाला मुहूर्त सापडलेला नाही.उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातही अर्भकांचा मृत्यू झाला असून फडणवीस सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Updated : 9 Sep 2017 6:34 AM GMT
Next Story
Share it
Top