Home > हेल्थ > अवयवदानच श्रेष्ठदान!

अवयवदानच श्रेष्ठदान!

अवयवदानच श्रेष्ठदान!
X

दान करणं ही आपली भारतीय संस्कृती. दान करणं आपण सर्वश्रेष्ठ मानतो. दान केल्याने आपण सुखी, समाधानी, समृद्ध होतो हा भाबडा विश्वास… दुसऱ्याचं पोट भरणं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला की आपण समाधानी. पण आपण आपली ही दानशूर वृत्ती आपल्या अवयवदानातून दाखवत नाही. हे सत्य आहे. कुणीही नाकारणार नाही. मरताना किंवा मेल्यानंतर शरिराचा एखाद भाग नसला की नरकयात्रा भोगावी लागते. मुक्ती मिळत नाही. ही अंधश्रद्धा आजही आपल्यात आहे. एक सांगू...कोणी पाहिलंय की मेल्यानंतर माणूस नरकात गेला की स्वर्गात? आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्याला जर आपल्या अवयवातून जीवनदान मिळालं तर तो त्याचं आयुष्य अगदी सुदृढ आणि आनंदाने घालवू शकतो. हे मोठं समाधान नाही का?

पाश्चात्य देशात हजारामागे 3 लोक अवयवदान करतात. तर दान सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या आपल्या देशात 10 लाखांमध्ये एकच व्यक्ती अवयवदान करतो. आपल्या महाराष्ट्रात तर 2016 मध्ये फक्त 132 अवयवदान झालेत. आता डोळेच पाहा... नुसती डोळ्यात धूळ जरी गेली तरी आपण डोळस व्यक्ती अस्वस्थ होतो. मग ज्यांच्याकडे दृष्टीच नाही त्यांचं काय? विचार केला कधी? आपल्या एका निर्णयाने दृष्टीहीन सुंदर जग पाहू शकतो. सुखावणारा विचार. मात्र डोळे दानाची खरी परिस्थिती काय? हे जाणून घेण्यासाठी मी जे.जे.हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहानेंशी संपर्क केला. लाखो लोकांना, गरिब, अबालवृद्धांना दृष्टी देणारे लहाने सर. एका कॉलवर लगेच त्यांनी माहिती दिली. आपल्या देशात वर्षाला 80 ते 90 लाख लोकांचा मृत्यू होतो. सुजाण नागरिकांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे 50 हजार डोळे मिळतात. खरी गरज ही 2 लाख डोळ्यांची आहे. खरं पाहता महाराष्ट्राला 25 हजार डोळ्यांची गरज आहे. पण प्रत्यक्षात 7 हजारच डोळे मिळतात. ही आपल्या दानशूर देशाची अवयवदानासंदर्भातली परिस्थिती तर याउलट श्रीलंकेतलं चित्र वेगळंच! भारताच्या तुलनेत छोटासा देश...वर्षाला 1 लाख मृत्यू मात्र 2 लाख डोळ्यांचं दान...त्यातले 10 हजार डोळे आपल्याला मिळतात. लहाने सरांच्या माहितीनंतर एक चित्र स्पष्ट झालं की आज आपण कितीही संवेदनशील असलो तरी अवयवाचं काम अवयवच करतो.

स्वतःवर बेतल्याशिवाय वेदना कळत नाहीत. स्वतःला ठेच लागली की होणारा त्रास हे आभाळाएवढं दुःख वाटतं. कधीही, कोणावरही, कोणतीही वेळ ओढवू शकते. अपघातात अनेकदा रक्तदात्याची गरज भासते. मात्र आज आपल्याकडे रक्दान करणाऱ्यांची संख्या किती आहे? रक्तदान केलं की अशक्तपणा येतो, चक्कर येते, दुसऱ्याचं रक्त वापरलं तर नको ते आजार जडतात असे एक ना अनेक नको ते विचार आणि समज आपल्या समाजात आजही आहेत. यातूनच कदाचित रक्तदात्यांची संख्या वाढत नाही आहे.

2 दिवसांपूर्वी #SaveAaradhya हे कॅम्पेन सुरु झालं. गोंडस मुलगी...अवघी 4 वर्षांची... तिचा हसतानाचा, बगडतानाचा फोटो आणि तिचा हॉस्पिटलच्या बेडवर निपचित पडलेला फोटो...काळजाचं पाणी पाणी होतं... आज या गोंडस मुलीला गरज आहे ती ह्रदयाची.. गोंडस मुलीला ह्रदय हवं आहे 2 ते 8 वयोगटातल्या दात्याचं.. तिचे बाबा योगेश मुळ्ये अथक प्रयत्न करत आहेत... आपल्या मुलीला पुन्हा बागडताना पाहण्यासाठी! विचार करा, ज्यावेळी या आई-बापाला कळलं असेल की आपल्या मुलीचं आयुष्य हे आता दुसऱ्या ह्रदय दात्याच्या हाती आहे तेव्हा काय अवस्था झाली असेल त्यांची? पायाखालची जमीनच निसटली असणार...आज हे आईबाप हरतऱ्हेनं प्रयत्न करत आहेत आपल्या चिमुकलीसाठी.. त्यांची धडपड, त्यांची वणवण फक्त आणि फक्त सुरु आहे ती आपल्या आराध्यासाठी. गडगंज श्रीमंती आहे असंही नाही. आराध्याचे बाबा महेंद्रा ऑटोमोबाईल्समध्ये होते. नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा कन्सल्टन्सी व्यवसाय सुरु केला. काहीच दिवसात आपल्या लाडक्या छकुलीसाठी त्यांनी हा व्यवसायही सोडला. आणि एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की काहीही झालं तरी आपल्या लाडकीला पुन्हा पहिल्यासारखं सुदृढ, निरोगी आयुष्य द्यायचं.

सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एक ह्रदय या चिमुकलीसाठी मिळू शकत नाही? आराध्याच्या निमित्ताने #अवयवदान #OrganDonation ही आपली नैतिक जबाबदारी, आपलं कर्तव्यच मानलं पाहिजे. पाप, पुण्य, मुक्ती, स्वर्ग, नरक यातून बाहेर पडून माणुसकीच महत्वाची हे अंगिकारलं पाहिजे. अवयवदान हे श्रेष्ठदान समजून दुसऱ्याचं आयुष्य फुलवलं पाहिजे! चला! वज्रमुठ उभारू! या अमुल्य मोहिमेत सहभागी होऊ! अवयवदान करु!

वृषाली यादव

जय महाराष्ट्र न्यूज

मेल आयडी : [email protected]

ट्विटर हँडल: @VrushaliGYadav

Updated : 12 April 2017 5:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top