Home > Fact Check > ५०० रूपयांच्या नोटांवर स्टार * चिन्हं, नोट खरी की खोटी ?

५०० रूपयांच्या नोटांवर स्टार * चिन्हं, नोट खरी की खोटी ?

५०० रूपयांच्या नोटांवर स्टार * चिन्हं, नोट खरी की खोटी ?
X

सध्या चलनामध्ये असलेल्या ५०० रूपयांच्या नोटांवर जिथं नोटांचा नंबर लिहिलेला असतो त्याच्या पुढेच स्टार * हे चिन्हं असल्यास ती नोट असली की नकली, याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र, याबाबत खुद्द भारतीय रिजर्व बँकेनंच खुलासा केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये संपूर्ण देशात नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर आता अचानक ५०० रूपयांच्या नोटा बँका स्विकारत नसल्याचा एक मेसेज व्हायरल होतोय. त्यासंदर्भात रिजर्व बँकेनं खुलासा केलाय.



https://www.rbi.org.in/commonman/Marathi/scripts/pressreleases.aspx?id=2015


‘हा’ मेसेज व्हायरल होतोय

“मागील दोन-तीन दिवसांपासून * चिन्हं असलेल्या नोटांचा बाजारात वापर सुरू झालाय. असं चिन्हं असलेल्या नोटा काल इंडसइंड बँकेनं परत केल्या आहेत. ही नोट नकली आहे. आज देखील एका मित्राला ग्राहकाकडून स्टार * चिन्हं असलेल्या दोन-तीन नोटा मिळाल्या. मात्र, लक्षात आल्यानंतर त्या मित्रानं ग्राहकाला त्या नोटा तात्काळ परत केल्या. ग्राहकानं सांगितलं की, त्यालाही कुणीतरी सकाळीच या नोटा दिल्या. आपलं लक्ष असू द्या, बाजारात नकली नोटा घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे”. अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर एका नोटेच्या फोटोसह व्हायरल होतोय.

प्रत्यक्षात नोटबंदीनंतर डिसेंबर महिन्यात रिजर्व बँकेनं ५०० रूपयांच्या नोटांवर जिथं अंकफलक असतो तिथं पहिल्यांदाच स्टार * हे चिन्हं उपयोगात आणायला सुरूवात केली होती. तेव्हापासूनच ५०० रूपयांच्या नोटांवर स्टार * हे चिन्हं वापरात येऊ लागलंय. यासंदर्भात रिजर्व बँकेनं १६ डिसेंबर २०१६ रोजी एक प्रसिद्धीपत्रकही जारी केलं होतं. त्यात यासंदर्भातला खुलासा करण्यात आला होता.

५०० रूपयांच्या नोटांवरील स्टार * संदर्भात रिजर्व बँकेचा खुलासा

भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंकफलकांमध्ये ‘ई’ हे इनसेट अक्षर असलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि बँक नोटेच्या मागील बाजूवर स्वच्छ भारत लोगो व ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.500 च्या नोटा वितरीत करणार आहे.

वरील नोटांपैकी काही नोटांवर ‘*’ (स्टार) हे अतिरिक्त चिन्ह, अंकफलकातील प्रिफिक्स व अंक ह्यांच्या मधील जागेत असेल. ह्या नोटा असलेल्या गड्डीत (पॅकेट) नेहमीप्रमाणेच 100 नोटा असतील, परंतु त्या अनुक्रम-निहाय नसतील. स्टार असलेल्या नोटांची पॅकेट्स सुलभतेने ओळखता येण्यासाठी, ह्या स्टार युक्त नोटा असलेल्या पॅकेट्स वरील पट्ट्या (बँड्स), त्या पॅकेटमध्ये अशा नोटा असल्याचे स्पष्टपणे दर्शवतील. स्टार असलेल्या रु.500 च्या नोटा सर्वप्रथम आताच वितरित केल्या जात आहेत. स्टार असलेल्या, रु.10, 20, 50 व 100 मूल्याच्या बँक नोटा ह्यापूर्वीच प्रसारात आल्या आहेत. ह्या स्टार युक्त नोटांबाबतची मिमांसा व सुरुवात, आमच्या वृत्तपत्र निवेदन 2005-2006/1337 दि. एप्रिल 19, 2006 मध्ये आधीच सविस्तरपणे देण्यात आली आहे. नोव्हेंबर 8, 2016 पासून देण्यात आलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या सर्व बँक नोटा, वैध चलन असणे सुरुच राहील.

फॅक्टचेक – स्टार * चिन्हं असलेल्या ५०० रूपयांच्या नोटा नकली असल्याचा व्हायरल मेसेज हा खोटा असल्याचं रिजर्व बँकेंच्या १६ डिसेंबर २०१६ च्या प्रसिद्धीपत्रकानुसार खोटा असल्याचं सिद्ध होतंय.

Updated : 26 July 2023 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top