News Update
Home > Fact Check > मेळघाट मध्ये बालमृत्यू वाढले का?

मेळघाट मध्ये बालमृत्यू वाढले का?

मेळघाट मध्ये बालमृत्यू वाढले का?
X

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन मेळघाटात झालेल्या बालमृत्यूंबाबत पत्र दिलं. राणा यांनी दावा केला आहे की, गेल्या 2-3 महिन्यात कुपोषणामुळे 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. राणा यांचा आरोप आहे की मेळघाटात आदिवासी भागातील महिला आणि बालकांसाठी असलेला निधी कंत्राटदार खात आहेत. त्यामुळे कुपोषण वाढलं आहे.राणा यांना यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

मी मंत्री झाल्यापासून; कुपोषणाच्या विरोधात व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरी सुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहेत.तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं. आता ज्या 49 बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. फक्त चमकोगिरी करायची यासाठी नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे. असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचं मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या प्रत्युत्तरात म्हटलं आहे.

मात्र, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सत्यपरिस्थिती नक्की काय आहे. हे आम्ही आकडेवारीनुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आता गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील कुपोषणाचा आकडा पाहिला तर…

वर्ष मृत्यू

2016-17 20237

2017-18 20105

2018-19 20096

2019-20 19185

2020-21 16197


आता या आकडेवारीचा विचार केला तर कोरोना काळात 2021-21 मध्ये 2019-20 च्या तुलनेत बालमृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचं पाहायला मिळतं. कारण 2016-17 ते 2017-18 यामध्ये 132 बालमृत्यूंची संख्या वाढली होती. तर 2017-2018 ते 2018-19 मध्ये बालमृत्यूंच्या संख्येत 9 ने घट झाली. 2018-19 ते 2019-20 मध्ये बालमृत्यूंच्या संख्येत 1 हजार रुग्णांची घट झाली. ही गेल्या काही वर्षांमधील झालेली मोठी घट होती. मात्र, 2019-20 ते 2020-21 बालमृत्यूंच्या संख्येत 2 हजार 988 ने घट झाली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात बालमृत्यूंच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वांत मोठी घट आहे. त्यामुळं प्रशासन योग्य दिशेन काम करत आहे. हे म्हणण्यास वाव जरी असला तरी आता वरील काळात कोणाचं सरकारं होतं. कोणाच्या काळात घट झाली? हे जरी आपल्या लक्षात येतं असलं तरी एकाही बालकाचा मृत्यू होणं ही सरकार म्हणून लाजीरवाणी बाब आहे.

साधारण मेळघाटातील बालमृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते 0 ते 1 वर्षांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतं.

वर्ष वयोगट 0 ते 1 1 ते 6 वर्षे

2016-17 280 127

2017-18 217 51

2018-19 245 64

2019-20 196 50

2020-21 172 41

आता वरील आकडेवारी पाहिली असता 0 ते 1 वर्षे वयोगटातील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण 2016-17 ते 2017-18 पर्यंत 63 ने घट झाल्याचं दिसून येतं. मात्र, 2018-19 मध्ये 2017 – 18 च्या तुलनेत 28 ने वाढ झाल्याचं दिसून येतं. मात्र, 2018-19 ते 2019-20 या कालावधीत बालमृत्यूंच्या संख्येत 49 ने घट झाल्याचं दिसून येतं. अशीच परिस्थिती 2019-20 आणि 2020-21 ची तुलना केली असता 24 ने घट झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरींत मेळघाटामध्ये 0 ते 1 वयोगटात होणाऱ्या बालकाच्या मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये सातत्याने घट होत आहे.0 ते 1 वयोगटापेक्षा 1 ते 6 वयोगटांमध्ये बालमृत्यूंचं प्रमाणा कमी असलं तरी तो देखील चिंतेचाच विषय आहे.

0 ते 9 वर्षे वयोगटातील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण 2016-17 ते 2017-18 पर्यंत 76 ने घट झाल्याचं दिसून येतं. मात्र, 2018-19 मध्ये 2017 – 18 च्या तुलनेत 13 ने वाढ झाल्याचं दिसून येतं. मात्र, 2018-19 ते 2019-20 या कालावधीत बालमृत्यूंच्या संख्येत 14 ने घट झाल्याचं दिसून येतं. अशीच परिस्थिती 2019-20 आणि 2020-21 ची तुलना केली असता 09 ने घट झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरींत मेळघाटामध्ये 0 ते 1 वयोगटात होणाऱ्या बालकांच्या मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे.

आता वरील सगळी आकडेवारी आपण पाहिली असता, यामध्ये सातत्याने घट होत असल्याचं दिसून येतं. मात्र, 49 बालकांचा झालेला मृत्यू ही गंभीर बाब आहे. सध्या या बातमीने खळबळ उडाली आहे. मात्र, या बालमृत्यूंच्या संख्येबाबत अमरावती जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांनी दिलेली माहिती वस्तुस्थितीवर आधारित नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार...

49 बालमृत्यूचे विश्लेषण पाहता 8 इतर आजार, 6 जंतुसंसर्ग, 4 कीटकदंश, 3 जन्मत: व्यंग, 3 न्यूमोनिया, दोन अपघाती मृत्यू अशी कारणं त्यामध्ये त्यांनी दिली आहेत. इतर आजारांनी झालेल्या मृत्यूचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत आहे. बालमृत्यू, कुपोषण टाळण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या समन्वयाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचं पंडा यांचं म्हणणं आहे.

त्यामुळं खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटामध्ये कुपोषणाने 49 बालकांचा मृत्यू झाला असा जो दावा केला आहे. तो खोटा ठरतो.

Updated : 21 Aug 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top