Home > Fact Check > मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड, आरोपी अब्दूल असल्याचा व्हायरल दावा खरा आहे का?

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड, आरोपी अब्दूल असल्याचा व्हायरल दावा खरा आहे का?

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे मणिपूर पोलिसांनी या प्रकरणातील चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. त्यामधील मुख्य आरोपी अब्दुल असल्याचा दावा व्हायरल होत आहे. पण नेमकं काय खरं आहे? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचे फॅक्ट चेक....

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड, आरोपी अब्दूल असल्याचा व्हायरल दावा खरा आहे का?
X

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडले. तर अशा प्रकारे मणिपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने देशभर या घटनेचा निषेध केला जात आहे. मात्र ANI या वृत्तसंस्थेने एक ट्वीट करून या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव Md Ibungo Abdul Hilim असल्याचं म्हटलं आहे.

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाने पॅरोडी अकाऊंटवरूनही अशाच प्रकारचा दावा करत ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बडी खबर मणिपूर से है...

मणिपूर पुलिस ने अब्दुल के बेटे मोहम्मद ईबुंगो को गिरफ्तार किया, मणिपूर का अब्दुल क्या भारत के और अब्दुल्लो से अलग है, असं म्हणत कोणत्याही प्रकारे डिफेंड करण्याआधी मणिपूर पोलिसांची प्रेसनोट तपासा असं सुद्धा या अकाऊंटवरून म्हटले आहे. ( Archived Link - https://twitter.com/Sudanshutrivedi/status/1682118658573869061?s=20)

राजकीय विश्लेषक आणि स्वतःला Activist म्हणणाऱ्या @ChandanSharmaG यांनीही अशाच प्रकारचे ट्वीट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, येथेही अब्दुल. पोलिस सर ठोकून द्या या डुक्कराला. मणिपूरमध्ये झालेल्या जघन्य अपराध प्रकरणी अब्दुलला अटक केल्याचे म्हटले आहे.

अशाच प्रकारे 49.8 K ट्वीटसह अब्दुल देशभरात काल तिसऱ्या तर आज सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

पडताळणी-

आम्ही यासंदर्भातील ट्वीट पाहत असताना आम्हाला हा दावा खोटा असल्याचे ट्वीटही वाचायला मिळाले. त्यामुळे आम्ही आणखी शोध घेतला.

@swati_mishr यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मणिपूर गँग रेप प्रकरणी ANI ने फेक बातमी चालवली. त्यानंतर याच फेक न्यूजच्या नंतर भाजप नेते आणि ट्रोल्स यांना मणिपूर गँग रेप प्रकरणी अब्दुलला ट्रोल करण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही वेळातच अब्दुल ट्विटरवर तिसऱ्या नंबरवर ट्रेंड करू लागला. मात्र ही एएनआयने पसरवलेली फेक न्यूज होती.

मणिपूर पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली आहे. त्यामध्ये 7 ठिकाणी कारवाई आणि परिस्थिती संदर्भात सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रेसनोटच्या दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितले आहे की, मणिपूर गँग रेप प्रकरणात 3 म्हणजेच आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रेसनोटच्या 4 थ्या पॉईंटमध्ये म्हटले आहे की,पोलिसांनी प्रेपाक प्रो संदर्भातील अब्दुल हिलीम ला अटक केली आहे. या चौथ्या मुद्द्यात कुठेही गँग रेपचा उल्लेख करण्यात आला नाही.

दोन्ही पॉईंटमध्ये वेगवेगळे जिल्हे आणि पोलिस स्टेशन येथे अटक करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत.

त्यानंतर एएनआयने मणिपूर गँग रेप प्रकरणी अटक केलेला आरोपी अब्दुल नसल्याचे ट्वीट केले. मात्र यानंतर आतापर्यंत एएनआयने यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी विना माफी मागता ट्वीट डिलीट केले आहे. मात्र त्यापुर्वीच अनेक न्यूज चॅनलने या ट्वीटवरून बातम्या चालवल्या. भाजप नेत्यांनीही अब्दुलचं नाव पाहताच ट्वीट करायला सुरुवात केली. त्यामध्ये अब्दुल देशभरात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करायला लागला. इतक्या संवेदनशील प्रकरणातही अशा प्रकारे मुस्लिम व्यक्तीचं नाव मिळण्याची वाट पाहिली जात आहे. विचार करा. काय लोक आहेत, असं स्वाती मिश्रा यांनी म्हटलं आहे.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने एएनआयचे ट्विटर हँडल पाहिले. त्याठिकाणी हे ट्विट डिलीट केल्याचे दिसून आले.
काय आहे सत्य?

मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात मणिपूर पोलिसांचं ट्वीट पाहिलं. त्यामध्ये प्रेपाक प्रो च्या एका कॅडर Md Ibungo Abdull hilim (वय 38) याला मणिपूर ईस्ट पोलिसांनी अटक केली.

मणिपूर पोलिसांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी व्हायरल व्हिडीओ केसमध्ये चार आरोपींना अटक केल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी एक आरोपीला आधी अटक केली होती. मात्र त्यानंतर तीन आरोपींना मणिपूर पोलिसांनी थोबाळ जिल्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली.

या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. तसंच अटक केलेले आरोपी हे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यामुळे एएनआयने आणि भाजप नेत्यांनी केलेले ट्वीट गैरसमज पसरवणारे आणि चुकीचे आहेत. त्यामुळे या घटनेतील आरोपी अब्दुल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Updated : 21 July 2023 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top