Home > Fact Check > Fact check : आसामच्या सिलचर भागात जिहादी शक्तींमुळे महापूर?

Fact check : आसामच्या सिलचर भागात जिहादी शक्तींमुळे महापूर?

आसामच्या सिलचर भागात जिहादी शक्तींमुळे महापूर, सुदर्शन के आणि न्यूज एक्स दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा...

Fact check : आसामच्या सिलचर भागात जिहादी शक्तींमुळे महापूर?
X


महिन्यात दक्षिण आसाममधील बराक नदीच्या काठावरील तीन जिल्ह्यांचे प्रवेशद्वार असलेल्या सिलचर शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र या शहरात यापुर्वी कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तर द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 170 इतकी झाली आहे.

26 जुन रोजी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सिलचर शहरात निर्माण झालेली पुरस्थिती मानवनिर्मीत असल्याचे म्हटले होते. तर बेतकुंडी येथील तटबंदी नागरिकांनी तोडल्याशी या पुराचा संबंध जोडण्यात आला होता. यामध्ये सरमा यांनी म्हटले होते की, बेतकुंडीमधील तटबंदी जर तोडली नसती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. कारण सिलचरपासून बेतकुंडीचे अंतर दहा किलोमीटरपेक्षाही कमी आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात काबुल खान, मिठू हुसेन लस्कर, नजीर हुसेन लस्कर आणि रिपन खान या चार जणांना तटबंदी तोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की, नदीची तटबंदी ही नदीच्या समांतर असते. या तटबंदीचा उद्देश नदीच्या पात्र बदलण्यावर आणि पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा असतो.



या प्रकरणाची सुरूवात मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी मानवनिर्मीत आपत्ती असल्याचे वक्तव्य करून केली. तर पुढे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी या आपत्तीला जिहादी पूर असे नाव दिले.

5 जुलैच्या आसपास मुख्य प्रवाहातील एका वर्गाने या तटबंदीच्या उल्लंघनाला 'पुर जिहाद' म्हणत चॅनलवर डिबेट शो आयोजित केले. या डिबेट शोमध्ये माजी राजकीय मत्सुद्दी भास्वती मुखर्जी, गृह मंत्रालयाचे माजी अधिकारी आरव्हीएस मणी, राजकीय विश्लेषक म्हणून ऑरिलिएस कॉर्पोरेट सोल्यूशन्सचे संस्थापक सुमित पीर, ITV नेटवर्क्स ( न्यूज एक्सची मुळ कंपनी) संपादकीय संचालक माधव नलपत यांचा समावेश होता. तर या चर्चेत निर्माण झालेली पुरस्थिती ही पुर जिहादमुळे निर्माण झाली असल्याचा सूर दिसून आला. (Archived Link )

NewsX च्या डिबेट शोमध्ये पॅनलिस्टचे स्वागत केल्यानंतर अँकर मिनाक्षी उत्प्रेती सुरूवात करतानाच म्हटले की, हे अनावधानाने केल्यासारखं वाटत नाही. तुम्ही याला एक साधारण छेडछाड म्हणून पाहत असाल. पण ही एक भयावह षडयंत्र नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का की भारत सरकारने सतर्क व्हायला हवे. या प्रश्नांनंतर भास्वती मुखर्जी यांनी हे देशांतर्गत हानी पोहचवण्याचा प्रकार आणि देशद्रोहाचे कृत्य असल्याचे म्हटले. त्यावर प्रतिक्रीया देतांना माधव नलपत यांनी ही घटना पुर्वनियोजित सामूहिक हत्येचा कट असल्याचे म्हटले.



सुदर्शन न्यूज या चॅनलनेही या घटनेला पुर जिहाद म्हणत एक तासाचा शो केला. यामध्ये सुदर्शन के यांनी आपल्या बिंदास बोल या कार्यक्रमात पुर हा नैसर्गिक नसून जिहादींमुळे आल्याचे वक्तव्य केले.

दैनिक जागरण या दैनिकाने आपल्या वृत्तात 'पुर जिहाद' असा उल्लेख केला नाही. मात्र या घटनेमागे मोठं षडयंत्र असल्याचे संकेत मिळत आहेत, असं म्हटले आहे.



वन इंडियाच्या विक्की नानजप्पा यांनी एक लेख प्रसिध्द केला होता. ज्याचे हेडिंग पूर जिहाद : आसाममध्ये जे दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. तसेच द फस्ट्रेटेड इंडियन सारख्या भाजप समर्थक प्रोपगंडा चालवणाऱ्या संघटनांनी अशाच प्रकारे रिपोर्ट दिला.

वेगवेगळ्या माध्यमसंस्थांच्या प्रसिध्द पत्रकारांनी या घटनेला पुर जिहाद असल्याचे म्हटले. ज्यामध्ये लाईव्ह हिंदूस्थानचे डिप्टी चीफ कंटेंट प्रोड्यूसर हिमांशू झा, इंडिया टुडे चे अँकर गौरव सी सावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरचे वरिष्ठ पत्रकार अश्विनी मिश्रा आणि पत्रकार विक्की नानजप्पा यांचाही समावेश आहे.










भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी राहुल नागर यांनीही अशाच प्रकारे दावा केला आहे. तसेच नागर यांनी एक व्हिडीओ क्लिप शेअर करत म्हटले आहे की, 'पूरे असम को डुबोने में कामयाब, क्या नाम दें इसे अब. #floodjihad."



न्यूज एक्स, सुदर्शन न्यूज आणि अन्य माध्यमांनी सिलचरमध्ये आलेल्या महापुराला सांप्रदायिक अँगल दिला.

न्यूज एक्स आणि इतर माध्यमसंस्थांनी कथित बेतकुंडी तटबंदी तोडल्या जाण्याच्या घटनेला पुर जिहाद असे म्हटले. या दाव्याच्या दोन दिवसानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा म्हणाले की, ही काही मोठी गोष्ट नाही. जिहादसारखे शब्द वापरण्याची कोणतीही गरज नाही. कमी बुध्दीच्या लोकांनी अशा प्रकारचे काम केले आहे. सरमा यांनी जिहादी अँगल फेटाळून लावला. मात्र ही आपत्ती मानवनिर्मीत असल्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

द हिंदूने दिलेल्या रिपोर्टमध्ये भारतीय हवामान विभागाचा दाखला देत सांगितले की, आसाममध्ये पुर्व मोसमी पावसापेक्षा 41 टक्के अधिक पाऊस झाला. तसेच 25 जुनपर्यंत होणाऱ्या पावसापेक्षा 71 टक्के अधिक पाऊस झाला. तर रिपोर्टमधील माहितीनुसार 1961 ते 2010 या काळातील सरासरी वार्षिक पर्जन्य 2 हजार 239.4 मिलिमीटर इतका होते. मात्र गेल्या तीन महिन्यातील पाऊस हा एकूण वार्षिक पर्जन्याच्या आसपास झाला.

७ जुलैच्या एका मुलाखतीत कछारचे एसपी रमनदीप कौर यांनी सांगितले की, मी माझ्या आयुष्यात प्रथमच पुर जिहाद शब्द ऐकला आहे. सोबतच त्यांनी या घटनेला देण्यात आलेल्या सांप्रदायिक अँगलचे खंडण केले. तसेच माध्यमांनी आणि इतर जबाबदार नागरिकांनी या घटनेला सांप्रदायिक वळण न देण्याचे आवाहन केले. या व्हिडीओत 1 मिनिट 15 सेकंदांच्या दरम्यान म्हटले की, काही दिवसांपुर्वी आम्हाला जलसंपदा विभागाकडून तटबंदी तुटल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्यांना हे माहिती नव्हते की, तटबंदी कशाने तुटली. मात्र प्राथमिक तपासणीत समोर आलेल्या माहितीनुसार काही लोकांनी तटबंदी तोडल्याचे समोर आले. त्यानुसार चार जणांना अटक केले आहे.

४ जुलै रोजी एसपी रमनदीप यांनी टेलिग्राफशी बोलताना सांगितले की, जलसंपदा विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार 23 मे रोजी काही समाजकंटकांनी बेतकुंडी येथील बांध तोडला होता. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला होता. हा कथीत ब्रीच 30 मीटर लांबीचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, आरोपीने बेतुकंडीमध्ये पाणी साचू नये म्हणून कथीत बांध तोडला असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याबरोबरच ईस्ट मोजो ने 19 मे रोजी दिलेल्या अहवालात बारक खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अचानक महापुर आल्याने शेकडो लोक प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.

टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बेतकुंडीच्या नागरिकांनी पाणी साचण्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक वेळा विनंती केल्याचे म्हटले आहे. तसेच अल्ट न्यूजने महापुराने प्रभावित भागाचा दौरा केला. यावेळी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यापैकी दोन राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यांच्या पोर्टलसाठी काम करणारे पत्रकार होते. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पाणी साचण्याच्या समस्येमुळे हा समुदाय कठोर उपाय करण्यासाठी आणि कथीत पध्दतीने बांध तोडण्यासाठी प्रेरीत झाला. याव्यतिरीक्त त्यांनी सांगितले की, राज्यातील अधिकाऱ्यांनी बांध लवकर दुरूस्त करायला हवा होता. तसेच एका सोर्सने टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, त्यांनी या तटाचे नुकसान करायला नको होते. तसेच प्रशासनानेही समाजकंटकांविरोधात वेळेवर कारवाई करायला हवी होती आणि वेळेवर ब्रीच बंद करायला हवा होता.

प्रादेशिक फोटोजर्नालिस्ट पार्थ शील यांनी 23 मे आणि 4 जुलै रोजीच्या बांधाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी संवाद साधताना म्हटले की, माझ्या माहितीनुसार तुटलेल्या बांधाची दुरूस्ती ही 26 जूनच्या आसपास सुरू करण्यात आली होती. तर 6 किंवा 7 जुलै पर्यंत पुर्ण झाला होता.






मे महिन्यात स्थानिक माध्यम आऊटलेट वे टू बराक ने रिपोर्ट केला होता की, सिलचर WR विभागातील एक एक्झिक्यूटीव्ह इंजिनियरने राज्य सरकारला एक फॉर्मल मेसेज दिला होता. त्यामध्ये म्हटले आहे की, सिलचर शहराच्या बेतुकंडी, बेरेंगा, रिंगबंड, बगदाहर परिसरात कमकुवत बांध आहे. तसेच या भागात महापुराचा धोका आहे. तसेच आणखी एका रीजनल मीडिया आऊटलेट ने सूचना दिली होती मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर प्रभावित क्षेत्रात महापुर येऊ शकतो.

अनेक मीडिया आऊटलेट्स ने सांगितले आहे की, आसाम आणि अन्य राज्यात तटबंध पुराच्या धोक्यात आले आहेत. तसेच टाईम्स नाऊ ने म्हटले आहे की, पुर नियंत्रणासाठी तटबंध निर्माण करण्याचे काम 1950 च्या दशकापासून सुरू झाले होते. तर आता या स्थितीमुळे एका तटबंध अर्थव्यवस्थेला जन्म दिला आहे. ज्यामध्ये दरवर्षी तटबंदीची निर्मीती, व्यवस्थापन आणि दुरूस्ती यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पुराच्या वेळी पाणी सोडले जाते. त्यामुळे सोडलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

सेंटिनल ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आसाममध्ये जवळपास 70 टक्के घाटांनी आपली सीमा पार केली आहे. तसेच ज्यामध्ये गेल्या काही वर्षात येणाऱ्या पुराच्या लाटेत भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणारा विध्वंस दिसून येत आहे. तर फर्स्टपोस्ट च्या एका रिपोर्टमधील माहितीनुसार फक्त घाट बांधणं एवढंच महत्वाचं नाही तर घाट कातरण्याच्या घटना थांबवण्यासाठी पाऊल उचलायला हवं आणि हा उपाय हे दोन्ही उपाय एकत्रित करणे आवश्यक आहे.

अल्ट न्यूजने आसाम विश्वविद्यापीठाचे सिलचर येथील परिस्थितीकी आणि पर्यावरण विज्ञान विभागाचे प्राध्यापक पार्थंकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जर तटबंदी तुटणे हे पुराचे एकमेव कारणे होते तर मग संबंधीत विभाग आणि प्रशासनाने या समस्येवर तातडीने ध्यान का दिले नाही? हे काम युध्दस्तरावर होणे आवश्यक होते. तसेच प्रचंड मोठा (1900 मिलीमीटर ) पाऊस झाला. तर मे महिन्यातच पुराच्या पहिल्या टप्प्याचा अनुभव आला होता. मात्र त्यानंतर सरकारने सिलचर भागात पुर नियंत्रणासाठी पायाभूत सुविधांचा विचार करायला हवा होता, असे मत व्यक्त केले.

पुढे पार्थंकर चौधरी यांनी असंही म्हटलं की, त्यानंतरही पुन्हा काही राष्ट्रीय वृत्तांमध्ये या घटनेला पुर जिहाद असं म्हटलं गेलं. लोकांना पुराचा त्रास होत असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट केला नाही. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारत असताना या घटनेला सांप्रदायिक रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पार्थंकर यांनी म्हटले. तसेच हा प्रकार खूप लज्जास्पद असल्याचेही पार्थंकर चौधरी अल्ट न्यूजशी बोलताना म्हणाले.

सिलरचमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि एसपी रमणदीप कौर यांनी घाट नदीचा तट तोडण्याची घटना सांप्रदायिक असल्याच्या घटनेचा इन्कार केला. त्यानंतर अल्ट न्यूजने प्रादेशिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये प्रादेशिक पत्रकारांनी सांगितले की, बेतुकंडीमध्ये पाणी साचू नये म्हणून स्थानिक लोकांनी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून जिहाद शब्द वापरून एखाद्या घटनेला सांप्रदायिक रंग देऊन विष पेरण्याच्या घटनेचे हे पहिले उदाहरण नाही. तर 2020 मध्ये झी न्यूजने जिहादचे वेगवेगळ्या प्रकारांवर रिपोर्ट सादर करत शो केला होता. यामध्ये लव जिहाद पासून, आर्थिक जिहाद ते फिल्म आणि संगीत जिहाद पर्यंतच्या सगळ्या प्रकारांचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी झी न्यूजचे तात्कालीन प्रमुख सुधीर चौधरी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्याच वर्षी सुप्रीम कोर्टाने कार्यक्रमाला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्यानंतर भाजप समर्थक न्यूज चॅनल सुदर्शन यूज ने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुस्लिम घुसखोर या विषयावर एक वादग्रस्त शो प्रसारित केला. तसेच अल्ट न्यूजने या एक तासाच्या प्रसारणामध्ये ६ खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला होता. सुदर्शन न्यूज या चॅनलच्या प्रसारणाला इंडियन पोलिस सर्व्हिस असोसिएशनने सांप्रदायिक आणि बेजबाबदार पत्रकारिता केल्याचा ठपका ठेवला आहे.

निष्कर्ष :

23 मे रोजी जलसंपदा विभागाने संबंधित पोलिस स्टेशनला सिलचरपासून 10 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असलेल्या बेतुकंडी येथील कथीत ब्रीचविषयी तक्रार केली होती. त्यानंतर 19 जूनच्या आसपास सिलचर शहर पुर्णपणे पाण्यात बुडाले होते. तसेच या शहराच्या इतिहासात याआधी कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात चार मुस्लिम युवकांना बांध तोडल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी साचण्यापासून दिलासा मिळावा म्हणून तटबंद तोडला होता. या घटनेच्या एक महिन्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सिलचर शहरात निर्माण झालेल्या पुरस्थितीला मानव निर्मीत आपत्ती असं म्हटलं आहे. यानंतर अनेक मीडिया आऊटलेट्नी या घटनेला अँटी मुस्लिम अँगल दिला. त्यामध्ये ही आपत्ती एक मोठा कट असल्याचे म्हटले आहे. तसेच आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याऐवजी माध्यमांनी मुस्लिम समुदायाला दोषी ठरवण्याचे काम केले. तसेच या घटनेला पुर जिहाद असे म्हटले. तर हे रिपोर्ट देशात सांप्रदायिक तणाव निर्माण झालेला असताना प्रसारित केले.

मात्र एसपी रमनदीप कौर आणि मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी या घटनेला कोणत्याही समाजाचा सहभाग असल्याचा पुर्णपणे इन्कार केला आहे.


Updated : 6 Sep 2022 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top