Home > Fact Check > Fact Check | औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस?
X

चीनमधल्या कोरोना व्हायरस मुळे (Corona Virus) जगभरात भीतीचं वातावरण आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात या व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत या व्हायरसबद्दल अफवांचे पेव पसरले आहे. कोरोना व्हायरस औरंगाबाद शहरात पोहोचला असल्याचे मेसेज सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

न्यूज १८ लोकमत या चॅनेलच्या बातमीच्या स्वरुपात फिरत असलेल्या मेसेजनुसार, औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे २ संशयित आढळले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित शहरातील एन-३ भागातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. ही माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचंही या मेसेजमध्ये म्हटलंय.

(फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेला मेसेज)

(फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेला मेसेज)(फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेला मेसेज)

तथ्य पडताळणी

न्यूज १८ लोकमतच्या बातमीच्या स्वरूपात व्हायरल होत असलेली माहिती ही चॅनेलच्या वेबसाईटवर आहे, मात्र ती औरंगाबादची नसून मुंबईची आहे. दि. २४ जानेवारी संध्याकाळी ४ वाजता ही बातमी अपलोड करण्यात आली आहे. यामधील सर्व माहिती ही मुंबईशी संबंधित आहे. त्याचा औरंगाबादशी काहीही संबंध नाही.

या बातमीतील ‘मुंबई’, ‘कस्तुरबा रुग्णालय’, ‘मुंबई महानगरपालिका’, ‘नालासोपारा’ ही स्थळं बदलून त्याजागी अनुक्रमे औरंगाबाद, एमजीएम रुग्णालय, औरंगाबाद महापालिका आणि एन-३ असे लिहून हा खोटा मेसेज पसरविण्यात येत आहे.

यावरून हे सिद्ध होते की, औरंगाबाद शहरात अद्याप कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळलेले नसून, तसे सांगणारा व्हायरल मेसेज खोटा आहे. न्यूज-18 लोकमतच्या मुंबईतील बातमीला खोडासाळपणे औरंगाबादची म्हणून पसरविण्यात येत आहे.

(न्यूज १८ लोकमतने दिलेली बातमी. यामध्ये मुंबईतील ठिकाणांचा उल्लेख आहे)

(व्हायरल होत असलेली माहिती ज्यात मजकुर बदलून औरंगाबाद करण्यात आलं आहे)

शहरात कोरोना व्हायरस पोहोचला असल्याच्या अफवांचं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनीही खंडण केलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार करण्यासाठी अशी चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. असे मेसेज पसरवणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी सायबर विभागाला पत्र लिहील्याचंही घोडेले यांनी सांगितलं आहे.

यासोबतच औरंगाबाद महापालिका आरोग्य विभाग आणि एमजीएम रुग्णालय प्रशासनानेही हे वृत्त फेटाळलं आहे. एमजीएम रुग्णालयाचे संचाकल आणि क्रिटिकल केयर विभागाचे प्रमुख डॉ. आनंद निकाळजे यांनी एमजीएम रुग्णालयात करोना व्हायरसचे कोणतेही संशयित रुग्ण दाखल करण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलंय. यासोबतच औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस आल्याची बातमी खोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे आहे वास्तव

औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस पोहोचल्याचे आणि २ संशयित रुग्ण आढळ्याचे सांगणारा हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. न्यूज १८ लोकमतच्या बातमीशी खोडसाळपणा करून, त्यातील जागा बदलून हा व्हायरल करण्यात आल आहे. औरंगाबाद शहरात अद्याप अशाप्रकारचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही.

Updated : 4 Feb 2020 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top