Fact Check | कोरोनामुळे २ दिवस व्हॉट्सअप बंद? चुकीची माहिती होतेय व्हायरल
X
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर येत आहे.
असं असतांना सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कोरोनाविषयक अनेक विनोद आणि Memes ही व्हायरल होत आहेत. फेसबुक, ट्विट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर हे विनोद मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जात आहेत.
ही सर्व परिस्थिती बघता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येणार असून त्यानंतर शासकीय कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांनी कोरोनाविषयी काहीही माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणं गुन्हा असेल. यासोबतच कोरोनाविषयी विनोद करणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करणार असून ग्रुप ऍडमीन यांनी २ दिवसांसाठी व्हॉट्सअप ग्रुप बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, आशा आशयाचे मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल आहे.
हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर व्हॅट्सअप ग्रुप ऍडमीनमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारवाईच्या भीतीने अनेकांनी ग्रुप सेटिंग 'ओन्ली फॉर ऍडमीन' अशी केलीय तर अनेकांनी खरंच ग्रुप बंद केले आहेत.
तथ्य पडताळणी :
वरील माहिती ही livelaw.in या वेबसाईटच्या बातमीच्या स्वरूपात व्हायरल होत आहे. बातमीची लिंक उघडून बघितली असता ही बातमी ३१ मार्च २०२० ला प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र आता या बातमीत 'फेक न्यूज अलर्ट' येत आहे.
व्हायरल होत असलेल्या बातमीची लिंक
देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी अधिकृत सरकारी माहितीशिवाय कोरोनविषयी कसलंही वार्तांकन करू नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात livelaw.in ने ३१ मार्चला बातमी प्रकाशित केली होती. या बातमीचा संदर्भ देत ही माहिती व्हायरल होत आहे. वास्तविक पाहता या माहितीचा आणि त्या बातमीचा काही संबंध नाही.
हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर livelaw.in ने याबाबत खुलासा केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणी कोरोनविषयी पोस्ट करणे हा गुन्हा आहे, या आशयाची माहिती पूर्णपणे चुकीची आणि खोटी असल्याचं livelaw.in ने म्हटलंय.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1247168556485103617?s=19
दुसरीकडे PIB (केंद्रीय पत्र सूचना कार्यालय) यांनीही याबाबत खुलासा केला आहे. कोरोनाविषयी विनोद करणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुप ऍडमीनवर पोलीस कारवाई करणार असल्याच्या वृत्ताचं पीआयबीनं खंडण केलंय. २ दिवसांसाठी ग्रुप बंद करण्याची माहितीही खोटी असून अशा कोणत्याही सूचना सरकारकडून दिल्या गेल्या नसल्याचं पीआयबीनं सांगितलं आहे.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1247106003906072578?s=19
यासोबतच, देशात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू झालेला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणी कोरोनविषयी माहिती पोस्ट केल्यास गुन्हा होऊ शकतो, या माहितीचंही खंडण करत ही माहिती खोटी असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलंय.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1245643028951228416?s=19
निष्कर्ष :
देशात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू झालेला नाही. वरील व्हायरल होत असलेली माहिती चुकीची आहे. व्हॉट्सअप ग्रुप २ दिवस बंद करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या नाहीत. कोरोनावर विनोद केल्यामुळे कोणत्याही ग्रुप ऍडमीनवर कारवाई होणार नाही. ही सर्व माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.
'मॅक्स महाराष्ट्र'चे आवाहन :
कोरोनाविषयी विनोद करणं गुन्हा नसला तरी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणे, मेसेज फॉरवर्ड करणे हा निश्चित गुन्हा ठरू शकतो. याशिवाय कोरोनविषयी चुकीची माहिती फॉरवर्ड केल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आलेल्या कोणतीही माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. माहिती पोस्ट आणि फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहा. 'फेक न्यूज'चे बळी ठरू नका आणि 'फेक न्यूज' पसरवू नका.