Home > Fact Check > Fact Check: योगी आदित्यनाथ यांनी खरंच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली का?

Fact Check: योगी आदित्यनाथ यांनी खरंच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली का?

Fact Check: योगी आदित्यनाथ यांनी खरंच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली का?
X

सध्या सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ आणि एका मुलाचा फोटो भलताच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मुख्यमंत्री योगी मुलासोबत बोलताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून असा दावा केला जात आहे की, "योगी आदित्यनाथ यांनी काशी यात्रेदरम्यान या मुलाला पाहिलं, या मुलाचे आई-वडिल आणि मामाचं निधन झाल्याने मुलाला कोणाचाच आधार नव्हता. या प्रकरणाची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी मुलाच्या पालनपोषणाचा खर्च मुख्यमंत्री निधीमधून देण्याची घोषणा केली."

'सोनू ठाकूर योगी भक्त' (टीम योगी आदित्यनाथ) या फेसबुक ग्रुपमध्ये हा फोटो शेअर केला गेला आहे.

काय आहे व्हायरल मेसेज -




"काल काशी यात्रेदरम्यान योगींनी एका मुलाला रडताना पाहिलं. ते मुलाकडे गेले आणि त्याला रडण्याचं कारण विचारलं. मुलाने सांगितलं की, माझ्या आई - वडिलांचं निधन झालं आहे, मी मामा सोबत राहत होतो, पण काल त्यांच सुद्धा निधन झालं. यावर योगी म्हणाले, "आज पासून मी तुझा मामा आहे." त्यांनी डीएमला आदेश दिला की, जोपर्यंत हा मुलगा मोठा होऊन त्याला नोकरी मिळत नाही. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निधीतून त्याच्या जेवणाची व शिक्षणाची काळजी घेण्यात यावी.

'RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या फेसबुक पेजवरही याच मेसेज सह हा फोटो शेअर करण्यात आला आहे.





फेसबुक आणि ट्विटरवर अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे.














काय आहे सत्य -

रिव्हर्स ईमेज सर्च केल्यानंतर हा फोटो २७ ऑक्टोबर २०१९ च्या लाईव्ह हिंदुस्थानच्या एका रिपोर्टमध्ये पाहायला मिळाला. रिपोर्टनुसार योगी आदित्यनाथ दिवाळीनिमित्त गोरखपूरला गेले होते. वनटांगिया समुदायाची वस्ती असलेल्या तिनकोनिया येथे त्यांनी दिवाळी साजरी केली होती. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुलांना मिठाई वाटली होती.





दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे १६ व्या वेळेस वनटांगिया समाजातील लोकांमध्ये गेले होते. त्यांनी तिथे काही विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले होते.

दरम्यान पंजाब केसरीच्या रिपोर्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या भेटींदरम्यानचे फोटो पाहायला मिळतात. ज्यामध्ये व्हायरल होणाऱ्या या फोटोचा सुद्धा समावेश आहे. तसेच हा फोटो २७ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या गोरखपूर दौऱ्यादरम्यानचा असल्याचं सांगत ट्विटर वर शेअर सुद्धा केला होता.






जुलैमध्ये नरेंद्र मोदी वाराणसीत येणार असल्याने योगी आदित्यनाथ तिथे तयारीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र, या भेटी दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कोणत्याही मुलासाठी आर्थिक मदतीची घोषणा केल्याचं पाहायला मिळत नाही.

निष्कर्ष:

एकूणच, योगी आदित्यनाथ यांचा २०१९ मधील दिवाळीच्या निमित्ताने वनटांगिया समाजातील लोकांच्या भेटींदरम्यानचा फोटो खोटा दावा करत शेअर केला जात आहे.

Updated : 11 July 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top