Fact Check: १४० पासून सुरू होणाऱ्या नंबरचे गौडबंगाल

1051

आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांना असा मेसेज आला असेल की, १४० पासून सुरू होणाऱ्या मोबाईल नंबरवरून फोन आला तर तो उचलू नका. मात्र आता याविषयी वेगळीच माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपासून फेसबुक, व्हाट्सअपसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर एक मेसेज आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये १४० पासून सुरू होणाऱ्या नंबरवरून फोन आला तर तो उचलू नये असं आवाहन करण्यात येतंय. फोन उचलला तर मोबाईलमधील डेटा चोरीला जाईल किंवा बँकेतील पैसे लंपास होतील असा दावा करण्यात येतोय.

या नंबरवरून फोन उचलू नका असं आवाहन करणारे पोलिसांचेही काही व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत. या प्रकारामुळे युझर्समध्ये घबराट पसरली असून नेमकं कारण स्पष्ट होत नाहीय.

व्हायरल पोस्ट्स :

काय आहे प्रकरण :

१४० पासून सुरू होणारे क्रमांक हे टेलीमार्केटिंगचे असतात. टेलीफोनच्या माध्यमातून उत्पादक ग्राहकांकडे आपल्या उत्पादनाची जाहिरात करत असतात.

दोन दिवसांपूर्वी १४० पासून सुरू होणाऱ्या क्रमांकाने काही लोकांना फोन गेले. फोन उचलल्यावर एक व्यक्ती घाबरलेल्या आवाजात सांगतो की, त्याने एक खून होताना पाहिला आणि फोन कट झाला. अशा विचित्र आणि भीतीदायक कॉल आल्यामुळे अनेकजण त्रस्त झाले.

त्यातील काही जणांनी मुंबई पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

हे आहे सत्य :

अशाप्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं की, हे कॉल ‘सोनी LIV’ नावाच्या चॅनेलने चालविलेल्या जाहिरात मोहिमेचा एक भाग आहे. या चॅनेलवरील एका मालिकेच्या प्रोमोशनसाठी असे कॉल करण्यात आले होते.

सोनी LIV ने आपल्या मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकांना १४० नंबरने सुरवात होणाऱ्या फोनवरून फोन करून लोक घाबरतील असे मेसेज देणं सुरू केलं.

त्यामुळे काही वेळातच १४० नंबरचे फोन स्वीकारू नये, असे मेसेज व्हायरल व्हायला सुरवात झाली. त्यात काही लोकांनी खोडासाळपणाने फोन उचलल्यास डेटा चोरी, बँकेतील पैसे चोरी जातील असा प्रसार सुरू झाला.

लोकांमध्ये घबराट पसरल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सोनी चॅनेलला ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गंभीर झालेली परिस्थिती पाहिल्यानंतर सोनी टीव्हीनेही स्पष्टीकरण देत यासंदर्भात माफी मागितली आहे.

निष्कर्ष :

१४० पासून सुरू होणारे आक्षेपार्ह कॉल्स हे सोनी LIV वरील मालिकेच्या प्रमोशनसाठी होते. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि या नंबरवरील फोन उचलू नये असा प्रसार सुरू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here