News Update
Home > Fact Check > Fact Check : शरद पवार यांनी भाषणात हिंदू देव-देवतांचा बाप काढला का?

Fact Check : शरद पवार यांनी भाषणात हिंदू देव-देवतांचा बाप काढला का?

राज्यात भोंग्यांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाषणात हिंदू देवदेवतांचा बाप काढला असल्याचा कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण शरद पवार यांनी हिंदू-देवदेवतांचा बाप काढला का? जाणून घेण्यासाठी वाचा...

Fact Check : शरद पवार यांनी भाषणात हिंदू देव-देवतांचा बाप काढला का?
X

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या भाषणात ब्रम्ह, विष्णू, महेश यांचा बाप काढल्याचे दिसत आहे. तर यासंदर्भात महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शरद पवार यांचा कथीत व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या ट्वीटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देव-देवतांचे बाप काढले आहेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करताता. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असा सल्ला या ट्वीटमध्ये शरद पवार यांना दिला आहे.

गोपिचंद पडळकर फॅन्स क्लब नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरूनही अशाच प्रकारे शरद पवार यांच्या व्हिडीओबाबत वक्तव्य केले आहे.

श्रीकांत थिटे ऑफिशियल या नावानेही शरद पवार यांचा व्हिडीओ ट्वीट करून शरद पवार यांनी हिंदू देव-देवतांचा बाप काढला असल्याचे म्हटले आहे.

जय नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरूनही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही मुर्ती घडवल्या. पण तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत-शरद पवार. पण अजूनही अशा नीच, हिंदू द्वेषी माणसाला आधारवड, लोकनेता आणि स्वतःचा बाप समजणाऱ्या लोकांची लाज वाटते. षंढ हिंदूंनो याच्या नजरेत हीत तुमची औकात, असे ट्वीट केले आहे.

अनेकांनी या विषयावर शरद पवार यांच्या व्हिडीओवरून ट्रोल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, काल शरद पवार साहेबांनी जी कविता वाचून दाखवली ती जवाहर राठोड या बंडखोर कवीची आहे. या देशामध्ये विद्रोहाचा इतिहास हा 5000 वर्षे जुना आहे. इथली संत परंपरा ही विद्रोहाची कायम जाणीव करून देत असते. तुकाराम असो नाहीतर जनाबाई, फुले,शाहू ,आंबेडकर हे सुद्धा विद्रोही होते विद्रोह म्हणजे समाजव्यवस्थेविरुद्ध मांडलेलं मतं. आणि समाजाने मोठ्या मनाने स्वीकारायचं देखिल असतं. कारण ह्या व्यवस्थेचा ज्यांना त्रास झालेला आहे ते आपलं मतं व्यक्त करत असतात आणि समाजव्यवस्था सुधारविण्यासाठी ह्याची गरज आहे.

भाजपने व्हिडीओ प्रसिध्द केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून राष्ट्रवादीनेही व्हिडीओ शेअर करून भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता.. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही.. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती.

भाजपने व्हिडीओ शेअर केल्यानंतर राष्ट्रवादीने आपली भुमिका मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या व्हिडीओची तोडमोड करून, आपल्या सोयीचे अर्थ काढून, अपप्रचार करणाऱ्या भाजपच्या गलिच्छ खेळीची पोलखोल करणारे सत्य...,असे सांगत व्हिडीओ शेअर केला आहे.

भाजपने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर पत्रकार विनायक गायकवाड यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र भाजपचा IT सेल नेमकं कोण चालवतं? त्यांनी हे पूर्ण ऐकलंय की नाही माहित नाही पण तुम्ही हा व्हीडिओ पूर्ण नक्की पाहा. मग संदर्भ लागतो की पवार काय बोलतायत. सोशल मीडियाच्या जमान्यात पहिली 10 सेकंद ऐकून मत बनवलं आणि मांडलं की मग काय होतं याचं हे उदाहरण मानायचं का?

जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनीही भाजपच्या व्हिडीओवर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामध्ये निखील वागळे म्हणाले आहेत की, भाजपवाले लबाड नाहीत, तर विकृतही आहेत.साताऱ्याच्या ज्या कार्यक्रमात शरद पवार यांनी 'पाथरवट' ही कविता वाचली तिथे मी हजर होतो.जवाहर राठोड यांच्या या कवितेत एका पाथरवटाचं दुःख मांडलंय. पण भाजपला ते कसं कळणार?कारण राजकीय फायद्यासाठी प्रत्येक गोष्टीचं विकृतीकरण करणं हा भाजपचा धंदा आहे.

सकाळ माध्यम समुहाचे सम्राट फडणीस यांनीही याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, फॉरवर्ड करण्याआधी...

एखादी गोष्ट आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कशी सांगावी, याचा वस्तुपाठ म्हणजे आजचं सोशल मीडियावर फिरणारं शरद पवारांचं भाषण.

जवाहर राठोड यांच्या कवितेचा संदर्भ पवारांनी साताऱ्यातल्या भाषणात दिला. त्या कवितेचा आधार घेऊन त्यांनी जातीयवादावर टिका केली. कवितेच्या चार ओळी पवारांच्याच, असं भासवून 'साल्यांनो मी तुमचा बाप आहे,' अशा शीर्षकाचा व्हिडिओ फिरवला जातोय.

कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणारी ही विद्रोही कविता. पवार ती कविता वाचून दाखवत नव्हते; त्या कवितेचा आशय सांगत होते. पिढ्यान् पिढ्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या मनात जातीयवादाचं, धर्मवादाचं विष कालवण्याचा आणि त्यांच्यातलं अंतर वाढवण्याचा प्रयत्न प्रयत्न एक वर्ग करतोय, असं पवारांच्या व्हिडिओचं सार.

प्रथमदर्शनी बरोबर उलटं चित्र व्हिडिओ दाखवतो. पवार जातीयवादी आहेत, असं चित्र उभं करतो. भाषणाची सुरूवातच जणू पवार मत मांडताहेत, अशी होते आणि सोशल मीडिया- व्हॉटस्अॅप युनिर्व्हसिटीत १० सेकंदांवर पेशन्स नसलेली मंडळी पवारांना जातीयवादी ठरवून मोकळी होताहेत !

'पाथरवट' नावाच्या कवितेत राठोड म्हणतातः

तुमच्या ब्रह्मा, विष्णू, महेशाला

लक्ष्मीला अन् सरस्वतीला

आम्हीच की रुपडं दिलंय.

आता तुम्हीच खरं सांगा-

ब्रह्मदेव आमचा निर्माता की

आम्हीच ब्रह्मदेवाचे बाप?

पवार असोत किंवा मोदी; पूर्ण वाचा, पाहा आणि एेका. फॉरवर्ड करण्यात दहा मिनिटं घालवण्याआधी किमान इतकं तरी करा ! मग ज्याला जो जातीयवादी ठरवायचाय, त्याला तो ठरवू दे की !

राष्ट्रवादीने आणि शरद पवार यांनी भाजपने ही अर्धवट क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करत शरद पवार यांच्या भाषणाबाबत चौकशी करण्याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये अतुल भातखळकर म्हणाले, एखाद्या कवितेच्या आडून कवीच्या भावाचा विपर्यास करून त्यात साल्या, बाप हे नको ते शब्द घुसडून पवारांनी पुन्हा एकदा हिंदू सामाजाच्या भावना दुखवण्याचे काम केलेले आहे.

पडताळणी-

भाजपने पोस्ट केलेला व्हिडीओ पुर्ण पाहिला असता. त्यामध्ये शरद पवार यांनी जवाहर राठोड या विद्रोही कवीची कविता भाषणात वाचून दाखवली होती. त्या कवितेतील शब्द हे जवाहर राठोड यांचे होते. तर त्या कवितेमध्ये जवाहर राठोड या विद्रोही कवीने शोषित वंचितांची भुमिका आणि विद्रोह मांडला आहे. या कवितेचा संदर्भ शरद पवार यांच्या भाषणात होता.

जवाहर राठोड यांची कविता-

जवाहर राठोड यांनी पाथरवट या आपल्या कवितेमध्ये विद्रोह मांडला आहे.


जवाहर राठोड यांची शरद पवार यांनी जी पाथरवट ही कविता वाचून दाखवली. ती कविता पुर्ण वाचली असता त्यामध्ये शरद पवार यांनी काही समानार्थी शब्दांचा वापर केला आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी पिता या शब्दाऐवजी बाप हा शब्द वापरला आहे. मात्र शरद पवार यांनी आपल्या भाषणात वापरलेला साल्यांनो हा शब्द मुळ कवितेत आढळून येत नाही.

मात्र भाजपने पोस्ट केलेला व्हिडीओ हा एडिट केलेला असुन त्यातील भाजपला हवी तेवढीत क्लिप त्यांनी व्हिडीओत वापरली आहे. त्यामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो.


निष्कर्ष : जवाहर राठोड यांच्या कवितेचा संदर्भ शरद पवार यांनी आपल्या भाषणात दिला आहे. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ भाजप महाराष्ट्र या अकाऊंटवर एडिट करून आणि हवा तेवढाच भाग घेऊन व्हायरल केला आहे. त्यामुळे ही व्हिडीओची मोडतोड आहे. त्यामुळे यातून भ्रम निर्माण होऊ शकतो. तर शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी समानार्थी शब्द वापरले आहे. (उदा. पिता या शब्दाला बाप हा समानार्थी शब्द वापरला आहे). मात्र शरद पवार यांच्या भाषणात वापरण्यात आलेला साल्यांनो हा शब्द मुळ कवितेतील नाही.

Updated : 2022-05-13T08:28:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top