News Update
Home > Fact Check > Fact Check : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर सनातन हिंदू एक झाले आहेत का?

Fact Check : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर सनातन हिंदू एक झाले आहेत का?

कर्नाटक राज्यातील उडूपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. तर त्याचे पडसाद देशभर उमटले. तर त्यानंतर बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. तर ही हत्या हिजाब वादातूनच झाल्याचा दावा उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी व्यक्त केला. तर त्यानंतर सनातन हिंदूंची एकजूटीचा दावा करत एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शिवमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर सनातन हिंदू एक झाले आहेत का? याबाबत जाणून घेण्यासाठी वाचा....

Fact Check :  बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर सनातन हिंदू एक झाले आहेत का?
X

कर्नाटक राज्यातील उडूपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. तर त्याचे पडसाद देशभर उमटले. तर त्यानंतर बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. तर ही हत्या हिजाब वादातूनच झाल्याचा दावा उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी व्यक्त केला. तर त्यानंतर सनातन हिंदूंची एकजूटीचा दावा करत एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शिवमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर सनातन हिंदू एक झाले आहेत का? याबाबत जाणून घेण्यासाठी वाचा....

कर्नाटक राज्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. तर ही हत्या हिजाब वादातून झाल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला. मात्र कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही हत्या हिजाब वादातून झाली नसल्याचे म्हटले. त्यानंतर या हत्येचे कर्नाटक राज्यात तीव्र पडसाद उमटले. तसेच या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. त्यामध्ये @D_ikshu नावाच्या ट्वीटर हँडलवर म्हटले आहे की, कर्नाटकच्या मुलांना पाहून असं वाटत आहे की, नवी पीढी सनातनच्या रक्षणासाठी जागी झाली आहे. तर आता मुले देश संभाळण्यायोग्य बनले आहेत.जय हिंदूत्व जय श्रीराम असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर त्यासोबतच एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यात भगव्या रंगाचे झेंडे घेऊन लाखो लोक पुल पार करत आहेत. तसेच व्हिडीओत घोषणांचा आवाजही येत आहे. तर या कर्नाटक राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादानंतर हिंदू युवकांनी भगवी रॅली काढल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेमसागर देसाई यांनी याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर पोस्ट करत म्हटले आहे की, आरंभ है प्रचंड..! कर्नाटकच्या मुलांना पाहुन असं वाटत आहे की, नवी पीढी सनातन रक्षणासाठी जास्त शक्तीशाली आहे. आमच्यापेक्षा जास्त जागरुक आहे. तसेच आमची जबाबदारी ही आहे की आम्ही मुलांना धर्म रक्षणापासून थांबवू नये तर त्यांना प्रेरीत करावे, असे सांगत पुढे एक शेर सांगितला आहे. त्यामध्ये हिंदू मुले जागरुक झाले असल्याचे म्हटले आहे. तर आता हिंदुस्थान हिंदूराष्ट्र म्हणून उदयाला येत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मनमोहन प्रसाद यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहीले आहे की, कर्नाटकात हिंदू युवकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत रॅली काढल्याचा दावा केला आहे.

कर्नाटक राज्यात सुरू झालेल्या हिजाब वादातून बजरंग दलाच्या हर्षा याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. तर हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरील व्हिडीओ कर्नाटक राज्यात हिंदू मुले जागे झाले असल्याचे सांगत हिंदू रॅलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मात्र त्यादरम्यान अनिर्बन भट्टाचार्य याने दोन फोटो ट्वीट केले आहेत. त्यामध्ये फेक अलर्ट असे सांगत 2017 सालचा मराठा क्रांती मोर्चाचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. तर हा व्हिडीओ 2017 पासून इंटरनेटवर असल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रने या दोन्हीपैकी कोणता दावा सत्य याची पडताळणी केली.

पडताळणी :

मॅक्स महाराष्ट्रने या व्हिडीओची सत्यता पडताळणी सुरू केली. त्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेजचा वापर केला. त्यामध्ये ही पोस्ट 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चा दरम्यानची असल्याचा समजले. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने आणखी शोध घेतला. तर त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या फेसबुक पेजवर हा फोटो मिळाला. त्यामध्ये मुंबईतील उड्डाणपुलावरून जात असलेली रॅली आणि इमारती दिसत आहेत. तर अशाच प्रकारचे दृष्य व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा असण्याची शक्यता वाढली.

त्यानंतर विविध की वर्डस् च्या माध्यमातून या फोटोची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये मुंबई मिररच्या फोटो गॅलरीतून एक हा फोटो मिळाला. तर त्या पोस्टची तारीख 9 ऑगस्ट 2017 असल्याचे दिसून आले. तर त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये फोटो मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी क्लिक केला असल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर विविध कि-वर्डसच्या माध्यमातून व्हिडीओचा शोध घेतला. तर त्यामध्ये झी 24 तास या वृत्तवाहिनीवर भगवा झेंडा घेतलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी मुंबईतील उड्डाणपुलावरून जात आहे. त्याबाबतचे वृत्तांकण आणि हा व्हिडीओ अपलोड करण्याची तारीख 9 ऑगस्ट 2017 असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेला शांततापुर्ण मोर्चा आहे.

मराठा समाजाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 58 मोर्चे काढले होते. या मोर्चांची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे झालेल्या सामुहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर 2016 साली झाली होती. त्या मोर्चांपैकी 58 वा मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. तेव्हा या मोर्चा दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी जोडून पोस्ट केला जात आहे.

निष्कर्ष :

2017 सालच्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चातील व्हिडीओ कर्नाटक राज्यात हिजाब वादावरून बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याच्या झालेल्या हत्येशी जोडून शेअर केला जात आहे. याआधीही अशाच प्रकारचे व्हिडीओ शेअर करून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या प्रकरणातही अशा प्रकारचा व्हिडीओ शेअर करून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे.


Updated : 28 Feb 2022 2:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top