Home > Fact Check >  Fact Check: पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला तो हॉल सेमिनार रूम की हॉस्पिटल वॉर्ड?

 Fact Check: पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला तो हॉल सेमिनार रूम की हॉस्पिटल वॉर्ड?

 Fact Check: पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला तो हॉल सेमिनार रूम की हॉस्पिटल वॉर्ड?
X

भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लेहचा अचानक दौरा केला आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा एका वेगळ्याच कारणाने गाजला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले. एवढेच नाही तर पंतप्रधान जवानांशी बोलत असल्याचा एक व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला जखमी जवानांशी संवाद

या फोटोमध्ये आणि व्हिडिओ मध्ये पंतप्रधान मोदी जवानांशी बोलत असताना सर्व जवान लष्करी शिस्तीनं बसलेले दिसत आहेत. तर एका मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जवानांचे बेड असल्याचं दिसलं आणि यावरून पंतप्रधान मोदींसाठी हा सर्व इवेंट रंगवला गेला, अशी टीकादेखील सोशल मीडियावर झाली. या फोटोमध्ये सगळे बेड अगदी टापटीप दिसत होते, सर्व जण बसलेले होते आणि एकाही जवानाला जखम झालेली दिसत नाही असे आक्षेप घेणारे ट्विट वॉल स्ट्रीट जर्नल युरोपचे माजी संपादक राजू नरीसेटी यांनी केले.

या वादात मग काँग्रेसने देखील उडी घेतली. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक दत्ता यांनी ट्विट करत हे हॉस्पिटल वाटत नसल्याचं म्हटलं. "डॉक्टरांच्या ऐवजी तिथं फोटोग्राफर दिसत आहेत. पेशंटच्या जवळ औषधं किंवा पाण्याच्या बाटल्याही दिसत नाहीयेत." काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने हा केवळ प्रसिद्धीसाठीचा प्रकार होता अशी टीका केली.

या संपूर्ण गदारोळानंतर लष्करातर्फे ४ जुलै रोजी स्पष्टीकरण देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांची भेट घेतली तो हॉल लष्करी हॉस्पिटलचाच भाग आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. पण कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला हॉल हा ऑडिओ आणि व्हिडिओ प्रशिक्षणासाठी वापरला जात होता. पण लष्करी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याने हा हॉल नॉन कोव्हीड पेशंटसाठी आरक्षित करण्यात आला, असं लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनंतर 'द वायर' ने काही लष्करी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला. त्यांनी काय माहिती दिली पाहूया...

तो हॉस्पिटलचा वॉर्ड आहे की कॉन्फरन्स रूम?

हा हॉल कॉन्फरन्स रूम म्हणूनच आधी वापरला जात होता. पण या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू झाल्याने काही रूम या आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरित करण्यात आल्या. त्यामुळे या हॉलमध्ये नॉन कोव्हीड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. लष्करप्रमुखांनीही २३ जून रोजी या जवानांची याच हॉलमध्ये भेट घेतल्याचे देखील या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जर इथे जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत तर मग नर्सिंग स्टेशन कुठे आहे, जवानांच्या बाह्य जखमा का दिसत नाहीत, त्यांचे बँडेज कुठे आहे?

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "या जवानांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत आणि आता ते बरे होत आलेले आहेत." त्यांना पायाला, हाताच्यावर किंवा छातीला जखमा झाल्या असतील पण कपडे घातल्यामुळे त्या दिसू शकत नाहीयेत".

गंभीर जखमी झालेल्या जवानांवर हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे कुठेतरी उपचार सुरू असतील असेही त्यांनी सांगितले. ही घटना घडून आता तीन आठवडे उलटले आहेत. किरकोळ जखमा झालेले जवान आता बरे झाले असतील, त्यामुळे किती जवान जखमी झालेले आहेत, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल का याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे का, अशी विचारणा केली तेव्हा, याचा विचार केला जाईल असे उत्तर लष्करी अधिकाऱ्यांनी दिले.

ही घटना घडल्यानंतर इंडिया टुडे ने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिलं होतं. त्यानुसार 76 जवान जवान जखमी झाले होते. त्यापैकी अठरा जवानांवर लेहच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या जखमा या किरकोळ असल्याने पंधरा दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीच्या वेळी या जवानांच्या अंगावर एकही बँडेज न दिसण्याचं हे सुद्धा कारण असू शकतं. पंतप्रधान मोदींनी भेट दिली त्यावेळी 18 पेक्षा जास्त रुग्ण त्या हॉलमध्ये दिसत आहेत. पण कदाचित गलवान घटनेशी संबंध नसलेल्या जवानांवर देखील येथे उपचार सुरू असतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी जवानांना लष्करी शिस्तीत बसण्याची गरज होती का?

या फोटोमध्ये सगळे जवान एकाच पद्धतीने बसल्याचं दिसत असल्याने त्यांना कदाचित तसं बसण्यास सांगितले गेले असणार अशी टीका करत काही टीकाकारांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लष्करी जवानांची भेट घेतल्याचे फोटो देखील प्रसिद्ध केले. यामध्ये जवान बेडवर झोपले असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील मीममध्ये डॉक्टर मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची तुलना करण्यात आलेली आहे.

असं असलं तरी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी श्रीनगरमध्ये 2003 साली ज्यावेळी जखमी जवानांची भेट घेतली होती, तेव्हाही हे जवान लष्करी शिस्तीत बसले असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

दरम्यान काही लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी किंवा व्हीआयपी व्यक्ती भेटायला येते आणि जर जवानांना लष्करी शिस्तीत बसणं शक्य असेल तर ते तसे बसतात.

ही विशेष वृत्तमालिका इथे संपली. या विशेष वृत्तमालिकेची इंग्लीशमधील आवृत्ती ने प्रकाशित केली आहे. तुम्ही ती https://thewire.in/ वर वाचू शकता.

Updated : 4 July 2020 2:39 PM GMT
Next Story
Share it
Top