Home > Fact Check > Fact Check : अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या पार्थिवाला क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याने खांदा दिला आहे का?

Fact Check : अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या पार्थिवाला क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याने खांदा दिला आहे का?

Fact Check :  अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या पार्थिवाला क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याने खांदा दिला आहे का?
X

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे 4 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील रूग्णालयात निधन झाले. तर त्यानंतर 5 जानेवारी 2022 रोजी सिंधुताई सपकाळ यांचा अंत्यविधी करण्यात आला. मात्र त्यानंतर अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर याने खांदा दिल्याचा फोटो व्हायरल होत आहे. तर या फोटोवर लिहीले आहे की, 'आज एक गोष्ट समजली... पुरस्कार महत्वाचा नसून कर्तृत्व महत्वाचं असतं. कारण एका पद्मश्रीला भारतरत्नने खांदा दिला. भावपुर्ण श्रध्दांजली माई', अशा आशयाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी वाचा...
वर्धा जिल्ह्यात जन्म झालेल्या सिंधुताईंनी स्वतःच्या संघर्षातून हडपसर येथे बाल निकेतन या संस्थेची स्थापना केली. तर त्यांनी आजपर्यंत 1200 मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ केला. या त्यांच्या समाजसेवेतील कार्याबद्दल सिंधुताईंना 2021 च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचा संदर्भ देत भारतरत्नने पद्मश्रीला खांदा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

फेसबुकनंतर, व्हॉट्सएपवरही हे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही बाब मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांनी निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत मॅक्स महाराष्ट्र टीमने पडताळणी केली आहे.

पडताळणी


मॅक्स महाराष्ट्रने आजवर अनेक व्हायरल होणाऱ्या दाव्यांची पडताळणी करून सत्य वाचकांसमोर आणले आहे. त्याच प्रकारे क्रिकेटर सचिन तेंडूलकर याने सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा दावा केला जात आहे. त्याची पडताळणी करताना मॅक्स महाराष्ट्र टीमने गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून त्या फोटोची पडताळणी केली. त्यामध्ये हा फोटो आताचा नसल्याचे समोर आले. तर हा फोटो 3 जानेवारी 2019 रोजी सचिन तेंडूलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे निधन झाले होते. तेव्हा सचिन तेंडूलकर याने आणि त्यांच्या मित्रांनी रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. मात्र आता तो फोटो सिंधुताईंच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा असल्याच्या दाव्याने शेअर केला जात आहे.


3 जानेवारी 2019 रोजी सचिन तेंडूलकरने गुरू रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. तेव्हा कोरोनाची साथ आली नव्हती. त्यामुळे आचरेकर यांच्या अंत्ययात्रेत कोणाच्याही तोंडाला मास्क लावल्याचे दिसत नाही. या घटनेचा व्हिडीओदेखील उपलब्ध आहे.


याऊलट सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू असल्याने सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी होती. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंच्या निधनानंतर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याची आदेश दिले होते. त्यामुळे सिंधुताईंच्या अंत्ययात्रेत कोरोना निर्बंध पाळून लोक सहभागी झाले होते. यामध्ये सचिन तेंडूलकर याचा सहभाग असल्याच्या कोणत्याही प्रकारच्या बातम्या आढळल्या नाहीत. तर व्हिडीओमध्येही सचिन तेंडूलकर असल्याचे दिसले नाही. मात्र सचिन तेंडूलकर याने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर ट्वीट करून श्रध्दांजली वाहिली होती.निष्कर्ष

मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पडताळणीत स्पष्ट झाले की, अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला सचिन तेंडूलकर याने खांदा दिल्याचा दावा खोटा आहे. तर सचिन तेंडूलकर याचा व्हायरल होत असलेला फोटो 3 जानेवारी 2019 रोजी रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा आहे.

यापुर्वीही सचिन तेंडूलकरसंबंधी फेक न्यूज व्हायरल होत होत्या. त्यामध्ये सचिन तेंडूलकर याने कोंबडी कापताना पाहिल्यानंतर तो शाकाहारी झाल्याचा दावा व्हायरल होत होता. तर त्यानंतर काँग्रेसने कितीही दबाब टाकला तरी मी नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य सचिन तेंडूलकर याचे नाव जोडून व्हायरल करण्यात येत होते. याबरोबरच सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्या नावाने ट्वीटरवर फेक अकाऊंट तयार केले होते. त्यावेळेस सचिन तेंडूलकर याने सारा आणि अर्जुन तेंडूलकर यांच्या नावाने तयार केलेल्या फेक अकाऊंटविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. तर सारा तेंडूलकर आणि अर्जुन तेंडूलकर यांचे ट्वीटरवर अधिकृत अकाऊंट नसल्याचे म्हटले होते. तर सचिनने या फेक अकाऊंट काढणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.सचिन तेंडूलकर हा प्रसिध्दीच्या झोतात असणारा क्रिकेटपटू आहे. त्यामुळे अनेकदा सचिन तेंडूलकर याचे नाव वापरून वेगवेगळ्या प्रकारचे खोटे दावे व्हायरल केले जातात. तर सचिन तेंडूलकरचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडूलकर आणि सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर चर्चेतील व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून खोटे दावे व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा खोडसाळपणा करणारांवर कारवाई करण्याची मागणी सचिन तेंडूलकर याने त्यावेळी केली होती.

तशाच प्रकारे सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर सचिन तेंडूलकर याने सिंधुताईंच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा खोटा दावा व्हायरल होत होता. अशा प्रकारच्या अनेक दाव्यांची पडताळणी करून सत्य जगासमोर आणण्याचे काम मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने केले आहे.

Updated : 2022-06-13T15:06:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top