Home > Fact Check > Fact Check : अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झटापट? पण व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का?

Fact Check : अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झटापट? पण व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का?

गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर आता अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्य भिडल्याचे समोर आले आहे. त्याचे पडसाद देशभर उमटत आहे. त्यापार्श्वभुमीवर अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात हाणामारी झाल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नेमका हा व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी केलेले फॅक्ट चेक...

Fact Check : अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झटापट? पण व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का?
X

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागातील यांगत्से येथे 9 डिसेंबर रोजी भारत चीन सैन्यात हाणामारी झाल्याचे समोर आले. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 13 डिसेंबर रोजी संसदेत माहिती दिली. दरम्यान अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात झालेल्या झटापटीचा व्हिडीओ असल्याचा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ABP News च्या निवेदिका रुबिका लियाकत यांनीही हाच व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये हे भारतीय सैनिक आहेत आणि जे मार खात आहेत ते दुश्मन असल्याचे म्हटले आहे.

लय भारी या पोर्टलनेही बातमी प्रसारित करताना हाच दावा केला आहे.

रुबिका लियाकत यांच्या ट्वीटवर रिप्लाय करताना @shaikhshameela या ट्विटर वापरकर्त्यांनी एका बातमीचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ 2021 मधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट चेकनुसार हा व्हिडीओ जुना आहे. तुम्ही सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यात नवल नाही. कारण तुम्ही पत्रकार नसून भाजपचे नोकर आहात, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उत्तराखंडमधील @DevbhoomiMedia या न्यूज पोर्टलने आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ भारत आणि चीनी सैनिकांमध्ये तवांग येथे झालेल्या झटापटीचा असल्याचे म्हटलं आहे.

रुबिका लियाकत यांच्या ट्वीटच्या रिप्लायमध्ये शमीला शेख यांनी टाकलेला स्क्रीनशॉट पाहिल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रच्या फॅक्ट चेक टीमने काही कीवर्ड सर्च केले. त्यानुसार मॅक्स महाराष्ट्रच्या टीमला ही CNBC ची बातमी मिळाली. यामध्ये भारत चीन सैनिकांमध्ये झटापट झाल्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. तसेच या बातमीची तारीख 19 फेब्रुवारी 2021 असल्याचे दिसून येत आहे.

वरील व्हिडीओवरून असे दिसून येत आहे की, भारत चीनमध्ये झटापट झाल्याचा दावा करत व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना असून तो अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात चीन सैन्याशी झालेल्या झटापटीचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे.

Updated : 14 Dec 2022 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top