Home > Coronavirus > डेल्टा अधिक डेंजरस: WHO

डेल्टा अधिक डेंजरस: WHO

जगाला लागलेला कोरोनाचा घोर संपायला तयार नाही. भारतीय अवताराच्या डेल्टा प्रकाराने जगभरात धुमाकूळ घातला आहे. १०० देशांमध्‍ये ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे संपूर्ण जगासाठी कोरोनाच्या जागतिक साथीचा हा सर्वांत धोकादायक काळ आहे, असे चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस व्यक्त केली आहे.

डेल्टा अधिक डेंजरस: WHO
X


'कोरोनाचा डेल्टा अवतार अनेक देशांत मुख्य विषाणूच्या रूपात वेगाने परावर्तित होत आहे.कोरोनाचा अतिशय घातक काळ सध्या आपण अनुभवत आहोत. हा प्रकार धोकादायक असून त्यात सातत्याने बदल दिसून येत असल्याने आपल्याला सार्वजनिक आरोग्यसेवेकडे सातत्याने लक्ष देऊन ती बळकट करण्यावर भर दिला पाहिजे. ज्‍या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे रुग्णालये भरून वाहत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. अद्याप एकाही देशाचा धोका टळलेला नाही.

'डेल्टा' हा अवतार ९८ देशांत दिसून आला आहे. लसीकरण कमी अथवा जास्त झालेल्या देशांतही तो वेगाने पसरतो आहे. या नव्या अवताराला रोखण्यासाठी देशांसमोर दोनच मार्ग आहेत ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाय. उदा. कठोर सर्वेक्षण, चाचण्यांवर भर देणे, लवकरात लवकर निदान होणे, विलगीकरण आणि वैद्यकीय उपचार हे महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे व बंदिस्त जागांमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करणेही गरजेचे आहे, असे घेब्रेयेसूस म्हणाले. संरक्षक उपकरणे, ऑक्सिजन, चाचण्या, उपचार आणि लसीकरण यात जगाला समान वाटा मिळायला हवा. पुढील वर्षात या काळापर्यंत ७० टक्के नागरिकांना लस मिळावी यासाठी सर्व जगाने एकत्र काम करायला हवे, असे आवाहन मी यापूर्वीच केली होती, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाबद्दल 'WHO' काय म्हणाले...

- संपूर्ण जगासाठी ११ अब्ज डोसची गरज

- साथीचा प्रभाव कमी करणे, अर्थव्यवस्था सुरळीत करणे व आणखी घातक प्रकारांना रोखण्यासाठी लसीकरण आवश्‍यकच

- सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक देशातील दहा टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्व व्हावे

- लस निर्मात्या कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान खुले करावे. यातून नव्या उत्पादनाला गती मिळेल

- जेवढ्या वेगाने लसीकरण क्षमता वाढवू, तेवढ्या लवकर साथीचा नायनाट करणे शक्य

- गरीब देशांमध्ये लशींचे दोन टक्क्यांपेक्षा कमी डोस उपलब्ध

Updated : 4 July 2021 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top