Home > Coronavirus > 12 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण ऑक्टोबरपासून

12 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण ऑक्टोबरपासून

12 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण ऑक्टोबरपासून
X

कोरोन विरोधातल्या युद्धात देशात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पण लहान मुलांसाठीची लस नसल्याने १८ वर्षांखालील मुलांना अजून लस देण्यात आलेली नाही. पण आता Zydus Cadila च्या ZyCoV-D या लसीला मान्यता मिळाल्यानंतर १२ ते १७ वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ZyCoV-D ही प्रौढांसह १२ ते १७ वर्षांच्या आतील मुलांनाही देता येणार असल्याने आता या वयोगटातील मुलांना लस लवकर मिळू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या National Technical Advisory Group चे प्रमुख एन.के.अरोरा यांनी १२ ते १७ वयोगटातील गंभीर आजार असलेल्या मुलांना ऑक्टोबरपासून लस देण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती दिली आहे. DCGIने Zydus Cadilaच्या लसीला परवानगी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना ही लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाची गरज नाही, असेही अरोरा यांनी सांगितले आहे. नुकत्याच आलेल्या सीरो सर्व्हेमध्ये लहान मुलांना कोरोनामुळे गंभीर आजाराचा धोका नसल्याचे दिसत आहे, असेही अरोरा यांनी म्हटले आहे. देशात १८ वर्षांखालील मुलांचा संख्या ४४ कोटी आहे. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे, असे मत अरोरा यांनी व्यक्त केले आहे.

देशात १२ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे १२ कोटी मुलं असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच यापैकी १ टक्क्यापेक्षाही कमी मुलांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. "१२ ते १७ वर्षे वयोगटातील १२ कोटी मुलांना कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर आजाराचा किंवा मृत्यूचा धोका नाही. याउलट पालकांना किंवा १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लहान मुलांपेक्षा संसर्गाचा धोका १० ते १५ पटींनी जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याआधी या वयोगटातील लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे" असेही अरोरा यांनी म्हटले आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण लगेच झाले नाही तरी चालेल, पण मुलांच्या पालकांचे आणि शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन या मुलांभोवती सुरक्षा कवच तयार करणे गरजेचे असल्याचेही अरोरा यांनी म्हटले आहे.

Updated : 26 Aug 2021 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top