Home > Coronavirus > डेल्टा व्हेरीयंट अधिक वेगाने का पसरतोय?

डेल्टा व्हेरीयंट अधिक वेगाने का पसरतोय?

डेल्टा व्हेरीयंट अधिक वेगाने पसरण्याचं कारण काय? डेल्टा व्हेरियंटची नवीन लक्षणे कोणती? लसीचा या व्हेरियंटवर परिणाम होतो का? डेल्टा व्हेरियंटपासून वाचण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी. जाणून घ्या साथरोगतज्ज्ञ प्रिया प्रभू देशपांडे यांच्याकडून…

डेल्टा व्हेरीयंट अधिक वेगाने का पसरतोय?
X

डेल्टा व्हेरीयंट चा प्रसाराचा वेग जास्त आहे. सध्या जगभरातील १०० हुन अधिक देशांमध्ये डेल्टा हा व्हेरीयंट प्रामुख्याने रुग्णसंख्या वाढवत आहे. एका अभ्यासानुसार डेल्टा व्हेरीयंट हा मूळ वूहान व्हायरस पेक्षा साधारण २२५% अधिक जास्त प्रमाणामध्ये संसर्ग पसरवतो. (What do we know about the Delta variant)

वूहान व्हायरस ची R0 संख्या २ ते ३ एवढीच होती. मात्र, डेल्टा व्हेरीयंट ची R0 संख्या ५ ते ८ इतकी जास्त आहे. म्हणजे एका रुग्णापासून आता ५ ते ८ नवे रुग्ण तयार होऊ शकतात. (Why Delta is more contagious than the other virus strains)

असे असताना संसर्ग थांबवण्यासाठी सर्वांनाच एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला कुटुंबेच्या कुटुंबे संसर्गित झालेली आढळून आली. डेल्टा अधिक का पसरतो या प्रश्नाचे उत्तर देणारा एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. (https://tinyurl.com/yg4haact ) यामध्ये पुढील बाबी आढळून आल्या. (What are the symptoms of the new strain of Covid?)

१. डेल्टा व्हेरीयंट मुळे संसर्ग झाल्यास शरीरामधील विषाणूंची संख्या जास्त असते.

२. तसेच रुग्णाच्या शरीरामधून बाहेर पडणाऱ्या विषाणूंची संख्या देखील खूप जास्त असते

३. विषाणू शरीरामध्ये शिरल्यावर सहजपणे पेशीमध्ये प्रवेश करू शकतो.

४. तसेच, संसर्गापासून संसर्गक्षम बनण्यासाठी कमी कालावधी लागतो.

५. तसेच, जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये प्रवेश करत असल्याने लसीकरण झाले असले तरी देखील आजार दिसून येतो.

या कारणांमुळे याचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

१. नॉर्मल व्यक्तींनी मास्क चा वापर योग्य रीतीने करावा. नकळत होणारा प्रसार टाळण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

२. कुटुंबामध्ये रुग्ण असेल तर १४ दिवस संपेपर्यंत सर्वांनी मास्क वापरावा आणि बाहेरील व्यक्तींशी संपर्क टाळावा. अलगीकरण करणे हे सर्वात उत्तम आहे.

३. बंदिस्त जागा नसेल किंवा कमी कालावधीसाठी संपर्क आला असेल तरी देखील नवा विषाणू संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे इतरांच्या भेटी घेणे, समारंभ आयोजित करणे, गर्दीमध्ये जाणे कटाक्षाने टाळा.

४. कुटुंबातील कोणालाही कोविड-सदृश्य लक्षण दिसून आले कि त्यांनी लगेच घरामध्ये मास्क वापरायला सुरुवात करणे आवश्यक आहे. तसेच लगेच तपासणी करून घ्यावी. कारण लक्षण सुरु झाल्यानंतरचे दोन दिवस आणि त्यापूर्वीचे दोन दिवस संसर्ग सर्वाधिक पसरतो.

५. ज्या व्यक्तींना घराबाहेर पडावे लागते तसेच ज्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे अश्या व्यक्तींनी कुटुंबातील इतरांसोबत जेवण करणे टाळावे किंवा सुरक्षित अंतर राखून जेवायला बसावे.

६. कामाच्या ठिकाणी कोणीही मास्क काढू नये. तसेच जेवताना एकत्र जवळ बसू नये.

७. सौम्य आजार जरी असेल तरी देखील समुदाय विलगीकरण केंद्र अथवा कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे जेणे करून संसर्ग पसरणार नाही.

८. कामाच्या ठिकाणी व घरामधील वायुविजन सुधारणे आवश्यक आहे. हवा नेहमी खेळती असायला हवी. (मात्र डासांपासून काळजी घ्या.)

डेल्टा व्हेरीयंट मुळे आजाराची गंभीरता वाढते असे अद्याप आढळून आलेले नाही. मात्र जर रुग्णसंख्या वाढली कि मृत्यूचा धोका नक्कीच वाढतो कारण मग ऑक्सिजन बेड सहजपणे मिळत नाही. डेल्टा व्हेरीयंट पासून लस घेतलेल्या तसेच न घेतलेल्या , दोन्ही प्रकारच्या जनतेने सावधान रहाणे आवश्यक आहे. (Does the Delta variant evade vaccines?) नियम पाळल्याने कोणत्याही नव्या व्हेरीयंटपासून देखील सुरक्षा मिळू शकते. जास्तीत जास्त नियम पाळून स्वतःचा व कुटुंबियांचा बचाव करा!

अधिक माहितीसाठी :

https://tinyurl.com/ygxl8gar

https://tinyurl.com/yhdqng2y

https://tinyurl.com/ygq96cym

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.

(साभार @UHCGMCMIRAJ page)

Updated : 21 July 2021 10:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top