Home > Video > Bharat Jodo Yatra : अन्यथा भारत जोडो यात्रा अपयशी ठरेल- निखील वागळे

Bharat Jodo Yatra : अन्यथा भारत जोडो यात्रा अपयशी ठरेल- निखील वागळे

राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड येथे असताना मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांनी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्याशी भारत जोडो यात्रेचा राजकीय फायदा कुणाला? याविषयी संवाद साधला आहे.

X

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी आहेत. पण ही यात्रा काँग्रेसला उभारी देईल का? या प्रश्नावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी काँग्रेसचे सरंजामी नेते काँग्रेससाठी मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य केले.

कन्याकुमारी इथून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही कुठल्याही निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून नाही, तर ही यात्रा काँग्रेस पक्षाला एका वेगळ्या भवितव्याकडे घेऊन जाणारी असेल. राजकारणात एखाद्या पक्षाचं पुढचं भविष्य काय असेल हे सांगायला मी काही भविष्यकार नाही,पण गेल्या तीन दिवसातला नांदेड जिल्ह्यातला सर्वसामान्य लोकांमध्ये दिसणारा उत्साह आणि सर्वसामान्य लोकांची राहुल गांधी यांच्याकडून असलेली अपेक्षा ही फार मोठी गोष्ट आहे. २००४ किंवा २००९ मध्ये निवडणूक लढविलेले राहुल गांधी वेगळे होते पण ,२०२२ मध्ये राहुल गांधी यांच्यात मोठा बदल दिसतो आहे ,प्रचंड ऊर्जा आहे. त्यांनी १५० वेगवेगळे भारतयात्री निवडून एक वेगळी वाट तयार केली आहे. हेच सर्वसामान्य घरातले १५० लोक उद्याचे नेते असतील. पण काँग्रेस पक्षाने जुन्या सरंजामी लोकांना बाजूला केले पाहिजे. स्वतःच्या मुलांना प्रोजेक्ट केलं तर काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, असंही मत निखिल वागळे यांनी व्यक्त केलं आहे.

या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या स्तरावरील लोक राहुल गांधी यांना भेटत आहेत. महिलांशी हस्तांदोलन करीत आहेत. महिलांना राहुल गांधी यांच्यात एक वेगळा विश्वास वाटतो आहे. नाहीतर आपल्या देशात महिलांना दुय्यम मानणारे किंवा महिलांना अपमानित करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यातला नवा बदल खूप काही सकारात्मकता निर्माण करणारा आहे, असा विश्वास वागळे यांनी व्यक्त केला.

या यात्रेदरम्यान मला काही शेतकरी भेटले, तरुण भेटले, अनेक क्षेत्रातले लोक भेटले. त्यांनी २०१४ साली भाजपाला मतदान केले होते. ते सांगत होते की, मोदी सरकारने खात्यावर २ हजार रुपये टाकुन काही होणार नाही,आमच्या मालाला भाव कधी मिळणार? हा खरा प्रश्न आहे. ही भावना महत्वाची असल्याचे वागळे यांनी सांगितले.

बेरोजगारी कधी संपणार?,मुले आयटी क्षेत्रातल्या पदव्या घेऊन भटकत आहेत,त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीय ,धार्मिक द्वेष वाढत असताना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे या सगळ्या लोकांमध्ये एक आश्वासक भावना निर्माण होताना दिसत आहे, असं मत निखील वागळे यांनी व्यक्त केले.

याबरोबरच २०१४ पुर्वीचा पप्पू आता पप्पू राहिला नाही, अशी टिपण्णी वागळे यांनी केली. पुढे बोलताना वागळे म्हणाले, जर काँग्रेसने युवकांना संधी दिली नाही आणि सरंजामी नेत्यांना हाकलले नाही तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अपयशी ठरेल.

Updated : 11 Nov 2022 5:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top